New Delhi, 10 June : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात तरुण आणि ज्येष्ठांची सांगड घालण्यात आली आहे. यासोबतच प्रादेशिक संतुलन राखण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. केरळमधील दोघांना मंत्रिमंडळात स्थान देऊन दक्षिणेत आणखी जोरात धडक देण्याचा इरादा भाजपने जाहीर केला आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे यांना संधी न देता वाचाळपणाला थारा नसल्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधान म्हणून 9 जून रोजी तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांच्यासोबत 30 कॅबिनेटमंत्री, स्वतंत्र कार्यभार असलेले 5 राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. राज्यमंत्र्यांच्या यादीतील एक नाव लक्ष वेधून घेणारे आहे, ते म्हणजे बंडी संजयकुमार. बंडी संजयकुमार यांची ओळख आक्रमक नेते अशी आहे. ते भाजपचे (BJP) तेलंगणा प्रदेशाध्यक्ष होते.
विधानसभा निवडणुकीच्या आधी 4 जुलै 2023 रोजी त्यांना त्या पदावरून हटवण्यात आले होते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत त्यामुळे भाजपला फटका बसला होता. ती चूक आता भाजपने दुरुस्त केली आहे. बंडी संजयकुमार यांनी करीमनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वेलचला राजेंदर राव यांचा सव्वादोन लाख मतांनी पराभव केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
केरळमधील दोघांसह दक्षिणेकडील (South India) राज्यांतून मंत्रिमंडळात 13 जणांना संधी देण्यात आली आहे. उद्देश स्पष्ट आहे. यावेळी केरळमध्ये भाजपचे खाते उघडले आहे. पुढच्या निवडणुकीत आणखी जोरात धडक देण्याची भाजपची तयारी आहे. धडक यासाठी की कर्नाटक वगळता दक्षिणेतील राज्यांनी भाजपला आतापर्यांत फारसा थारा दिलेला नाही.
त्यामुळे भाजपने तिकडे लक्ष केंद्रीत केले आहे. केरळात सुरेश गोपी यांच्या रूपाने भाजपचा एक खासदार निवडून आला आहे. त्यांच्यासह जॉर्ज कुरियन यांनाही मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यासह कर्नाटकमधील पाच जणांची वर्णी लागली आहे. कुमारस्वामी यांचे पुतणे प्रज्वल रेवण्णा यांनी महिलांवर अत्याचार केल्याचे प्रकरण निवडणुकीदरम्यानच उघड झाले होते.
महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्यासह रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली आहे. रक्षा खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश करून पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे निकटर्तीय मंत्री गिरीश महाजन यांना इशारा दिला आहे.
गटबाजीला कंटाळून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. फडणवीस, महाजन यांच्याशी त्यांचे मतभेद जगजाहीर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा केली. खडसे यांनी थेट दिल्लीतील नेत्यांशी संपर्क साधला होता. त्यानंतर फडणवीस, महाजन यांनी खडसेंकडे दुर्लक्ष केले.
विनोद तावडे यांच्यामुळे खडसे यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी काम केले, असे सांगितले जाते. त्यामुळे रावेरससह अन्य काही जागा भाजपच्या पदरात पडल्या. या घडामोडींमुळे एकनाथ खडसे यांच्या स्नूषा रक्षा खडसे यांना मिळालेल्या मंत्रिपदाला महत्व आहे.
सात खासदार असलेल्या शिंदे गटाला एक राज्यमंत्रिपद मिळाले. अजित पवार यांचा एक खासदार निवडून आला आहे, मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवे होते. भाजपने ते तूर्तास तरी नाकारले आहे. एकही खासदार नसलेल्या रामदास आठवले यांना पुन्हा लॉटरी लागली आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये नारायण राणे केंद्रात मंत्री होते. यावेळी त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत यांचा पराभव केला. गेल्यावेळी राज्यसभेवर असतानाही मंत्रिपद मिळालेल्या राणे यांना या वेळी संधी मिळालेली नाही.
राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र विरोधक आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मर्यादा सोडून टीका करत असतात. या निवडणुकीत भाजपला त्याचाही फटका बसल्याचे पक्षश्रेष्ठींचे मत बनले आहे. राणे यांना डावलून वाचाळांना संदेश देण्यात आला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मंत्रिमंडळात उत्तरेकडील राज्यांचे वर्चस्व आहे. उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्राने धक्का दिला आहे. राजस्थानमध्येही भाजपला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. बिहारमध्ये नितीशकुमार आणि चिराग पासवान यांच्यामुळे भाजपची बाजू सावरली.
भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सरकार चालवताना मोदी यांना कसरत करावी लागणार आहे. भाजपला आपला अजेंडा बाजूला ठेवावा लागतो का, हे येत्या काही महिन्यांत समोर येणार आहे. नाइलाज म्हणून भाजपने कुबड्या घेतल्या असल्या तरी पुन्हा अशी वेळ येऊ नये, असा मोदी-शाह यांचा प्रयत्न असल्याचे मंत्रिमंडळातील चेहऱ्यांकडे पाहून वाटते.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.