Harshwardhan Sapkal: हर्षवर्धनजी...तर तुम्हीही रेवंथ रेड्डींसारखे 'हिरो' ठराल अन् काँग्रेसला महाराष्ट्रात 'अच्छे दिन' येतील!

Maharashtra Congress Politics : राज्यात काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. दिग्गज, सरंजामी नेत्यांना डावलून काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची माळ हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात घातली आहे. जमिनीवर उतरून काम केल्यास, लोकांच्या समस्यांसाठी सरकारच्या विरोधात रान पेटवल्यास यश काँग्रेस आणि सपकाळ यांच्या दृष्टीक्षेपात येईल, अशी परिस्थिती आहे.
Harshwardhan Sapkal .jpg
Harshwardhan Sapkal .jpgSarkarnama
Published on
Updated on

Congress News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची अवस्था वाईट झाली. लोकसभा निवडणुकीत यश मिळाले त्यावेळी काँग्रेसकडे जादुई नेतृत्व होते आणि विधानसभेला ते गायब झाले, असेही नाही. काँग्रेसला तारले मतदारांनीच आणि वाईट अवस्था केली ती मतदारांनीच. याचा अर्थ असा की, काँग्रेस पक्ष गावागावांत पोहोचलेला आहे, रुजलेला आहे. अशा पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याची संधी हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांना मिळाली आहे. मात्र, त्यासाठी काही अटी आणि शर्ती लागू आहेत.

काँग्रेसमध्ये सगळे सरंजामी नेते गोळा झाले आहेत, ते जमिनीवर नसतात, घराणेशाही वाढली आहे, अशी ओरड सातत्याने होत असते. काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाने त्याची दखल घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळेच अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, बाळासाहेब थोरात आदी दिग्गज नेत्यांना डावलून प्रदेशाध्यक्षपदाची माळ हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात घालण्यात आली आहे. तेलंगणात 2021 मध्ये काँग्रेसने (Congress) असाच धाडसी निर्णय घेतला होता. दिग्गज नेत्यांना डावलून रेवंथ रेड्डी या लढवय्या कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले होते.

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रेवंथ रेड्डी यांनी संपूर्ण तेलंगणा पायाखालून घातला. यात्रा काढून ते गावागावांत पोहोचले, लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरून सरकारशी दोन हात केले. सरकारसोबत कोणत्याही प्रकारची 'अ‍ॅडजस्टमेंट' त्यांनी केली नाही. 2023 च्या अखेरिस झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसला. काँग्रेसला बहुमत मिळाले आणि लढवय्ये रेवंथ रेड्डी मुख्यमंत्री बनले. रेवंथ रेड्डी हे सत्ताधाऱ्यांशी 'अ‍ॅडजस्ट' होत नाहीत, हे मतदारांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला.

Harshwardhan Sapkal .jpg
Shivsena Politics : राज्यभरात डरकाळ्या, पुण्यात मात्र ऑपरेशन टायगरचे 'म्याव म्याव'

महाराष्ट्रात विरोधकांनी पत गमावली आहे, ती काही विरोधी पक्षनेतेच सरकराला 'अ‍ॅडजस्ट' झाल्यामुळे. विरोधी पक्षनेतेच नंतर सत्ताधाऱ्यांसोबत गेल्याची काही उदाहरणे गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लोकांनी विरोधी पक्षांवर विश्वास कसा ठेवायचा? आताही काँग्रेस वगळता महाविकास आघाडीतील पक्ष सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधण्याचा, सत्तेची उब घेण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात केवळ आणि केवळ राजकारण, फोडाफोडी सुरू आहे. अशी परिस्थितीत सपकाळ यांच्यासाठी जमीन तयार झालेली आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसला मरगळ आली आहे. कार्यकर्ते सक्षम आहेत, मात्र त्यांच्या पाठीवर हात ठेवणारा, त्यांना प्रोत्साहन देणारा नेताच राज्यात नाही. कार्यकर्ते वाट पाहत आहेत. गरज आहे ती सपकाळ यांनी बाहेर पडण्याची, त्यांना विश्वास देण्याची. काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचा सक्रिय सहभाग आहे, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी. डॉ. मनमोहनसिंग आदी दिग्गज, दूरदृष्टीच्या काँग्रेसच्या नेत्यांची यादी मोठी आहे. ही माहिती कार्यकर्त्यांना नव्याने देण्याची गरज आहे. ते काम सपकाळ यांना करावे लागणार आहे.

Harshwardhan Sapkal .jpg
Uday Samant And Vinayak Raut : उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, शिंदेंना भाजपने पर्याय शोधलाय; विनायक राऊत यांचा गौप्यस्फोट

राज्यात सध्या काय चालले आहे? पक्षांची फोडाफोडी, महायुतीतील पक्षांमध्ये अंतर्गत कुरघोड्या, पदांसाठी रुसवेफुगवे, पदांसाठी देवांना साकडे घालणे... यामुळे लोकांमध्ये महायुती सरकारबद्दल नकारात्मक संदेश गेला आहे, मात्र विरोधक कमकुवत झाल्यामुळे, तेही अंतर्गत कुरघोड्यांमध्ये रमलेले असल्यामुळे सरकारचे आणि लोकांचेही याकडे फारसे लक्ष गेलेले नाही. काँग्रेससाठी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी ही संधी मोठी आहे. जमिनीवर उतरावे लागेल, गावागावांत पोहोचावे लागेल, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी रान पेटवावे लागेल, या अटी आणि शर्ती त्यासाठी आहेत.

हर्षवर्धन सपकाळ हे जमिनीवरचे, काँग्रेसच्या विचारधारेशी एकरूप झालेले नेते आहेत. वयाच्या पंचविशीत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या कामांचे अद्यापही कौतुक केले जाते. एनएसयूआय या काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटनेतून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. आदिवासीबहुल गावांचे सक्षमीकरण करण्यातही त्यांनी भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे वय आणि संघटनकौशल्य या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. गावागावांतील कार्यकर्ते प्रतीक्षा करत आहेत, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

Harshwardhan Sapkal .jpg
Mahayuti Politics : 'स्थानिक'च्या निवडणुकांमध्ये महायुती नाही? स्वबळावर लढण्यासाठी भाजपची चाचपणी?

कोणत्याही राजकीय पक्षांत एकमेकांचे पाय ओढण्याची स्पर्धा असते. काँग्रेसमध्येही ती आहे. दिग्गज नेत्यांना सोबत घेऊन, त्यांच्या कुरघोड्यांवर मात करत करत सपकाळ यांना काम करावे लागणार आहे. सपकाळ यांना राहुल गांधींचा पाठिंबा आहे, त्यामुळे पक्षांतर्गत कुरघोड्यांना आवर घालणे त्यांना शक्य होऊ शकते. प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर रेवंथ रेड्डी यांनी ज्या पद्धतीने काम केले, तसेच काम सपकाळ यांना करावे लागणार आहे. सत्ताधाऱ्यांना 'मॅनेज' किंवा 'अ‍ॅडजस्ट' होणार नाही, हे त्यांना दाखवून द्यावे लागणार आहे. सपकाळ यांनी या अटी आणि शर्ती पूर्ण केल्या तर यश त्यांच्या नक्कीच दृष्टीक्षेपात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com