
Kolhapur Local Body Elections 2025 - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार अशी घोषणा सत्ताधारी सर्वपक्षीय नेत्यांनी केली असली तरी जागा वाटपाचे मोठे आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकाच उमेदवाराच्या मागे थांबले. मतदारसंघातील कार्यकर्ते एकाच उमेदवारासाठी प्रचारात उतरले. त्यावेळी प्रत्येक कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आमिष दाखवण्यात आले होते.
त्यामुळे आता इच्छुकांची महत्वकांक्षा अधिकच वाढली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दहा ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आल्याने प्रत्येक आमदारांकडून इच्छुकांना अपेक्षा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील महायुती म्हणून लढणार असल्याने या कार्यकर्त्यांना दिलेला शब्द नेत्यांना पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुती समोर आव्हानांचा मोठा डोंगर उभा राहणार आहे.
राज्यात, केंद्रात सत्ता आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही आमदार महायुतीचे त्यामुळे जिल्ह्यात महायुतीचेच पारडे सद्य:स्थितीत जड दिसत आहे. मात्र तरी त्यांच्यासमोरच सर्वाधिक आव्हान आहे. कारण, जिकडे सत्ता तिकडे कार्यकर्ते आणि इच्छुकांचा ओढा अधिक हे राजकारणही कोल्हापूर जिल्ह्याला नवीन नाही. ‘गोकुळ’च्या निवडणुकीतही हे पाहायला मिळाले. कागलमध्येच युतीत तीन नेते झाले. जिल्हा परिषदेच्या पाच जागा, त्यात ज्याचा त्याचा बालेकिल्ला वेगळा अशा स्थितीत एखाद्याला संधी द्यायची झाल्यास या नेत्यांतच चढाओढ पाहायला मिळेल. अशीच स्थिती राधानगरी, भुदरगड, शिरोळ, करवीरमध्ये पाहायला मिळणार आहे. नगरपालिकांत तर यापेक्षा वेगळी स्थिती नसणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच तालुक्यांत एकसंधपणा राखणे हेच महायुतीसमोरचे मोठे आव्हान असेल. एकापेक्षा जास्त इच्छुक असल्याने जागा वाटप हाच कळीचा मुद्दा ठरणार असून, त्यातून सर्वाधिक बंडखोरी रोखण्याचे आव्हानही महायुतीसमोरच असेल. गोकुळ, जिल्हा बँक, विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात काही प्रमाणात घराणेशाही दिसली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हीच घराणेशाही पाहायला मिळणार आहे, त्यातही महायुतीतच याचे प्रतिबिंब सर्वाधिक पाहायला मिळेल, अशी स्थिती आहे.
दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. राज्यात आणि केंद्रात युतीचे सरकार आहे. महाविकास आघाडीत प्रवेश करून पाच वर्ष निधीची वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे निमताचा धनी होण्यापेक्षा युतीचा नगरसेवक होऊया अशी भावना इच्छुकांची आहे. त्यातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तर काही ठिकाणी उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल, अशी स्थिती आहे; पण त्याचवेळी महायुतीतील नाराजीचा फायदा उठवण्याची संधी महाविकास आघाडीला आपोआप मिळेल, अशीही शक्यता आहे. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत तर कोणाला किती जागा द्यायच्या यावरूनच महायुतीत संघर्षाची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत.
शिवसेनेचे शहराचे आमदार आहेत, त्यांना भाजपमधून आलेले सत्यजित कदम यांची साथ असेल. पण मूळ भाजप कार्यकर्त्यांना किती जागा मिळणार, महाडिक गट म्हणून किती जागांवर दावा सांगणार आणि शिवसेनेच्या पदरात किती जागा घ्यायच्या यावरूनच घमासान शक्य आहे. या तीन गटांबरोबरच अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही शहराचा चेहरा बनू पाहत आहे. त्यांना जागा देतानाही कसरत करावी लागणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.