PM Narendra Modi News : 'संदेशखाली'प्रमाणे मोदींकडून कर्नाटकातील 'त्या' प्रकरणातही देशाला अपेक्षा!

Modi Government Politics : कर्नाटकच्या हासन लोकसभा मतदारसंघाचे एनडीएतील जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा यांनी शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

Political News : महिलांच्या प्रतिष्ठेचा सन्मान न करणे, हा चिंतेचा विषय बनला आहे. पुरुषप्रधान मानसिकतेमुळे महिलांची प्रतिष्ठा, त्यांचे अस्तित्व सातत्याने धोक्यात येत आहे. याला कोणत्याही पक्षाचे सरकार अपवाद नाही. कोणत्या सरकारची सत्ता असताना, कोणत्या पक्षाचे सरकार असलेल्या राज्यात महिलेवर अत्याचार झाला, महिला कोणत्या धर्माची अशा फुटकळ मुद्द्यांवर त्या अत्याचाराची तीव्रता ठरू लागली आहे आणि हे दुर्दैवी आहे. विभाजनवादी राजकारणाने समाजाला आज या स्थितीत आणून उभे केले आहे. समाजासाठी ही बाब लाजिरवाणीच आहे.

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे महिलांवर सामूहिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले होते. यातील आरोपी हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे. शहाजहान शेख या नराधम आरोपीने महिलांवर अत्याचारासह लोकांच्या जमिनीही बळकावल्याचे समोर आले होते. हे प्रकरण देशभरात गाजले. आरोपीवर कारवाई करावी, या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी अनेक मोर्चे काढले.

या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या रेखा पात्रा यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. अर्थातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. त्यांनी पीडित महिलांची भेट घेतली. तृणमूल काँग्रेसवर प्रहार केला. संदेशखाली प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी तृणमूल काँग्रेसने ताकद पणाला लावली होती, असा आरोपही त्यांनी केला होता.

आता कर्नाटकमधील सेक्स स्कँडल उघडकीस आले आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू, खासदार प्रज्ज्वल रेवण्णा याने शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. देवेगौडा यांचे पुत्र आमदार एच. डी. रेवण्णा यांचा प्रज्ज्वल हा पुत्र आहे. त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार दिली होती. त्यानुसार आमदार पिता आणि खासदार पुत्रावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हसन जिल्ह्यातील होलेनरसीपूर येथील पोलिस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खासदार प्रज्ज्वल रेवण्णा याचे आक्षेपार्ह व्हिडीओ मोठ्या संख्येने व्हायरल झाले आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे. खासदार प्रज्ज्वल हा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (H.D.Kumarswamy) यांचा पुतण्या आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महिला आयोगाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पोलिस महानिराक्षक बी. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआय़टीची स्थापना केली आहे. सीआयडीच्या महासंचालक सुमन पेणेकर आणि आयपीएस अधिकारी सीमा लाटकर या एसआयटीच्या सदस्य आहेत. प्रज्ज्वल हे हासन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जनता दलाचे (सेक्युलर) उमेदवार आहेत.

जनता दल हा या निवडणुकीत एनडीएसोबत आहे, म्हणजे भाजप आणि मोदींचा मित्रपक्ष आहे. या मतदारसंघात 26 एप्रिलला मतदान झाले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्ज्वल हा देशाबाहेर पळून गेल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटक सरकारने या प्रकरणात तातडीने कारवाई केली. पश्चिम बंगालमध्ये माक्ष मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी चालढकल केली होती. त्यामुळे भाजपला आंदोलन करावे लागले होते.

प्रज्ज्वल याच्या घरी काम करणाऱ्या महिलेने तक्रार दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडीकस आले आहेत. प्रज्ज्वल हा या महिलेच्या मुलीला व्हिडिओ कॉल करून अश्लील बोलायचा, असे तक्रारीत म्हटले आहे. लैंगिक अत्याचाराशी संबंधित शेकडो पीडितांचे व्हिडीओ प्राप्त झाल्याचा दावा महिला आयोगाच्या अध्यक्ष नागलक्ष्मी चौधरी यांनी केला आहे. या व्हिडिओमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला, पक्षाच्या कार्यकर्त्या आणि अन्य महिलांचा समावेश आहे. आमची सुटका करा, असे जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या महिलांचेही त्यात व्हिडिओ आहेत, असे नागलक्ष्मी यांनी मुख्यमंत्र्यांना कळवले आहे.

महिला कोणत्याही जाती-धर्माची असो, कोणत्याही पक्षाची असो, तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. अत्याचार झाला तेथे कोणाचे सरकार आहे, हे पाहूनच आंदोलन केले जात असेल, शिक्षेची मागणी केली जात असेल तर ते चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशखाली येथील पीडित महिलांची बाजू घेतली, त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला, आरोपींना कठोर शिक्षेचे आश्वासन दिले, हे त्यांचे योग्य आणि स्वागतार्ह पाऊल होते.

आता खासदार प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणातही पंतप्रधान म्हणून मोदी यांच्याकडून देशाची हीच अपेक्षा आहे. खासदार प्रज्ज्वल हे मोदींच्या मित्रपक्षाचे उमेदवार आहेत, म्हणून यातून त्यांना सूट मिळता कामा नये. कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल केला असला तरी पंतप्रधान मोदी यांनी आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, पीडितांशी संपर्क साधला पाहिजे. देश पंतप्रधान मोदींकडे आशेने पाहत आहे.

मग त्यावेळी अमक्याने किंवा तमक्याने आवाज का उठवला नाही... अशी 'व्हॉट अबाऊटरी' गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. संदेशखाली प्रकरणावर शांत असलेले आता बोलायला लागतील आणि संदेशखाली प्रकरणावर बोलणारे आता शांत बसतील... असे झाले तर ते देशाचे, समाजाचे सर्वात मोठे नुकसान ठरेल. तसे पाहिले तर तसे नुकसान आधीच झालेले आहे.

समाजात हा अवगुण मोठ्या प्रमाणात पसरला आहे. तो मोडीत काढण्याची संधी पंतप्रधांनांना मिळाली आहे. त्यांनी कर्नाटक प्रकरणातही परखड भूमिका घेतली तर समाजात योग्य संदेश जाईल आणि व्हॉट अबाऊटरी करणाऱ्यांना आळा बसेल. त्यामुळे कर्नाटकातील महिला अत्याचारावर पंतप्रधान मोदी केव्हा बोलणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

PM Narendra Modi
Narendra Modi In Pune : या लवकर, बस आली! मोदींच्या सभेसाठी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याचा मेसेज व्हायरल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com