Lok Sabha Election 2024 : शरद पवारांच्या डावपेचांमुळे तिसऱ्या टप्प्यातील अनेक मतदारसंघांत 'थरार'

Sharad Pawar News : तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे. माढा, बारामती, कोल्हापूर आदी मतदारसंघांत शरद पवार यांनी आखलेल्या डावपेचांमुळे या टप्प्यात थरार अनुभवायाला मिळत आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Maharashtra News : तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांत 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी 5 वाजता थंडावल्या आहेत. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शरद पवारांनी आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर महायुतीला हतबल केलेल्या मतदारसंघांचा या टप्प्यात समावेश आहे. राजकारणातले चाणक्य शरद पवार आहेत की आणखी कोण, हे टप्प्यातील निकालांवरून ठरणार आहे. (Latest Marathi News)

माढाः पवारांच्या डावाने भाजप हतबल -

तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघांत मतदान होणार आहे. या टप्प्यातील माढा हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला तो अकलूजच्या मातब्बर मोहिते पाटील घराण्यामुळे. माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी हवी होती, मात्र भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. खासदार निंबाळकर यांनी मतदारसंघातील मोहिते पाटील विरोधकांची जुळवाजुळव सुरू केली होती. त्यामुळे मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून भाजपला अनपेक्षित असा जबर धक्का दिला. त्यांच्यापाठोपाठ अजितदादा पवार गटाचे उत्तम जानकर यांनीही ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून अजितदादा पवार यांच्यासह भाजपला आणखी एक धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar
Sharad Pawar : 'सत्तेचा माज उतरवायला वेळ लागणार नाही', शरद पवारांनी ठणकावले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टर पाठवून तातडीने उत्तम जानकर यांना बोलावून घेत 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. परत आल्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच जानकर शरद पवार यांच्या गोटात दाखल झाले आणि त्यांनी अजितदादा पवार आणि भाजपवर हल्ले सुरू केले. मोहिते पाटील यांच्या अनपेक्षित धक्क्यातून भाजप सावरतो की नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे. तत्पूर्वी, या माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते. मात्र एेनवेळी महादेव जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवली.

बारामतीः राज्य, देशासह जगाचेही लक्ष-

बारामती मतदारसंघाकडे राज्य, देशाचे आणि जगाचेही लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर वयाच्या 84 व्या वर्षात असलेले शरद पवार ज्या तडफेने उभे राहिले, ते थक्क करणारे होते. अजितदादा वेगळे झाले तरी त्यांना बारामती मतदारसंघात कुटुंबातील उमेदवार टाळता आला असता, असे त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार अशी नणंद- भावजयीची लढत होत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादांच्या सख्ख्या भावासह संपूर्ण पवार कुटुंबीय शरद पवार यांच्या मागे एकवटले आहेत. शरद पवार यांना सोडल्यामुळे अजितदादांना कुटुंबाच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. शरद पवार यांच्या या अस्तित्वाच्या लढाईची परदेशांतील माध्यमांनीही दखल घेतली आहे.

Sharad Pawar
Lok Sabha Election 2024 : बारामतीत अजितदादा आणि पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; राजकीय वातवरण तापलं

उस्मानाबादः पारंपरिक विरोधक पुन्हा आमनेसामने-

उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघातही हाय होल्टेज लढत होत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चनाताई पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. अर्चनाताई पाटील या भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती आहेत. पाटील आणि राजेनिंबाळकर कुटुंबीय पारंपरिक राजकीय विरोधक आहेत. खासदार राजेनिंबाळकर हे गेल्या पाच वर्षांत जनतेशी ठेवलेल्या संपर्कावर, त्यांची कामे केल्याच्या जोरावर मते मागत आहे. त्यांच्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या आहेत. मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. राष्ट्रवादीकून आधी इच्छुक असलेले प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी झोकून देऊन काम केले आहे. त्यामुळे महायुतीकडे शक्ती एकवटली आहे. असे अशले तरी जनशक्ती आपल्यासोबत असल्याचा दावा खासदार राजेनिंबाळकर यांच्याकडून केला जात आहे. अर्चनाताई यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली आहे. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी खासदार राजेनिंबाळकर यांच्यावर केलेले आरोप आणि त्याला राजेनिंबाळकरांनी दिलेली उत्तरे चर्चेचा विषय ठरली आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचा या मतदारसंघावर प्रभाव आहे.

सोलापूरः माजी खासदारांची निष्क्रियता भाजपला अडचणीची-

सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि महायुतीतील भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात लढत आहे. गेल्या सलग दोन टर्मचे खासदार भाजपचे होते आणि ते निष्क्रिय होते, हे भाजपसाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे सातपुते यांनी ही निवडणूक हिंदू-मुस्लिम या मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न केला. सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी म्हणून गेल्यावर्षी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली. त्यानंतरही अद्याप विमानसेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात भाजपला नाराजीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. राम सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत. त्यांच्या विजयात विजयसिंह मोहिते पाटील यांचा मोलाचा वाटा होता. आता मोहिते पाटील यांनी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याचा सोलापूर मतदारसंघावर काय परिणाम होईल, हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Sharad Pawar
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

लातूरः देशमुख सक्रिय झाले, बालेकिल्ला खेचण्यासाठी सरसावले-

अमित देशमुख आणि त्यांचे काका माजीमंत्री दिलीपराव देशमुख हे सक्रिय झाल्याने लातूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. लातूरमधून डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी देणे, हा देशमुखांचा मास्टरस्ट्रोक समजला जात आहे. त्यांची लढत भाजपचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्याशी आहे. काळगे यांच्या विजयासाठी देशमुख काका - पुतणे अंग झटकून कामाला लागले आहेत. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी, आमदार अमित देशमुख यांच्या मातुःश्री वैशालीताई देशमुख याही प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. यावरून देशमुखांनी एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर लोकसभा मतदारसंघ खेचून घेण्यासाठी चंग बांधलल्याचे दिसत आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये मुक्काम केला होता. यावरून देशमुखांचे वजन वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सुरुवातीला प्रचारात मागे पडल्याचे दिसत असलेल्या भाजपच्या खासदारस श्रृंगारे यांनी नंतर ती कसर भरून काढली. काळगे यांना उमेदवारी देऊन देशमुखांनी जातीय समीकरणांद्वारे भाजपला मात देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्यांना यश मिळते की नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

कोल्हापूरः सर्वसमावेशक विरुद्ध विभाजनवादी विचारांची लढाई-

राज्याचे लक्ष लागलेल्या मतदारसंघांमध्ये कोल्हापूरचाही समावेश आहे. राजर्षि शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा असलेल्या कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करून महायुतीची कोंडी केली होती. ती कोंडी फोडण्यासाठी महायुतीने खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली. शाहू महाराज छत्रपती हे खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आलेले आहेत, ही सर्वांना माहीत असलेली गोष्ट महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी पुन्हा चर्चेत आणली. संजय मंडलिक यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सभी घेतली. शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सभा घेतल्या आहेत. शाहू महाराज छत्रपती यांचे सर्वसमावेशक विचार आणि विभाजनवादी विचार अशी ही लढाई आहे. त्यामुळे या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सांगलीः

जागा शिवसेनेला सुटल्यामुळे काँग्रसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यामुळे सांगली मतदारसंघात राज्यभरात चर्चेत आला आहे. भाजपने खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना मैदानाच उतरवले आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा यासाठी, आमदार विश्वजित कदम यांनी दिल्लीपर्यंत चकरा मारल्या, मात्र उपयोग झाला नाही. कोल्हापूर काँग्रेसला सोडल्यामुळे सांगली आम्हाला द्या, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. त्यामुळे सांगली शिवसेनेला सोडण्यात आली. असे सांगितले जाते की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हा निर्णय घेतला होता. तो निर्णय घेताना सांगलीतील काँग्रेस नेत्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते, असे सांगितले जाते. त्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे. तिरंगी लढतीत शिवसेनेचे चंद्रहार पाटील मैदान मारतील का, हे पाहावे लागणार आहे.

साताराः उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे-

साताऱ्यात महायुतीतील भाजपचे उमेदवार, छत्रपती शिवरायांचे वारस उदयनराजे भेसले आणि महाविकास आघाडीतील शशिकांत शिंदे यांच्यात लढत होत आहे. येथून उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे यांना दिल्लीत जाऊन दोन-तीन दिवस प्रतीक्षा करावी लागली होती. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. मुंबई बाजार समितीचे संचालक असतानाच्या काळातील एका कथित गैरव्यवहारप्रकरणी शिंदे यांच्यावर एेन निवडणुकीच्या काळात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांना अटक केली तर शांत राहणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला आहे. त्यामुळे ही लढत चर्चेत आली आहे.

रायगडः कोणतीही लाट नाकारणाऱ्या मतदारसंघात आता काय होणार?

रायगड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेनेचे अनंत गिते यांच्याविरुद्ध महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे अशी लढत होत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्षच उमेदवार असल्यामुळे या मतदारसंघात अजितदादा पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कुठल्याही लाटेला न जुमानणारा मतदारसंघ, असे रायगडबाबत बोलले जाते. इंदिरा गांधीच्या हत्येनंतर देशमभरात काँग्रेसची लाट होती, मात्र रायगड लोकभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला होता. 2014 च्या मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी अनंत गिते विजयी झाले होते. 2019 मध्ये सुनील तटकरे यांनी अनंत गितेंचा पराभव केला होता. त्यावेळीही काही प्रमाणात मोदी लाट होती. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हातकणंगलेः शेट्टी आणि ठाकरेंच्या होय-नाहीमुळे तिरंगी लढत-

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी रिंगणात असल्यामुळे हातकणंकले लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या विरोधात महायुतीचे खासदार धैर्यशील माने (शिंदे गट) आणि महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील (ठाकरे गट) आहेत. शेट्टी हे महाविकास आघाडीकडून लढतील, असे चित्र सुरवातीला निर्माण झाले होते. उद्धव ठाकरे त्यासाठी तयार झाले होते, मात्र शिवसेनेच्या चिन्हावर लढण्याची अट त्यांनी ठेवली होती. शेट्टी यांना ती मान्य नसल्याने बोलणी फिसकटली. त्यामुळे महाविकास आघाडीने सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे गटाकडून खासदार माने यांचे तिकीट कापले जाणार, अशी चर्चा सुरू झाली होती. उमेदवारी मिळवण्यात माने यशस्वी झाले. या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गः राणे आणि ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला-

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीतील विनायक राऊत यांचे आव्हान आहे. महायुतीचा उमेदवार कोण, याचा सस्पेन्स लवकर संपला नाही, कारण उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या मतदारसंघावर दावा केला होता. हा पेच बरेच दिवस सुटला नव्हता. अखेर हा मतदारसंघ भाजपला सुटला आणि नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनी अनेकदा पातळी सोडल्याचे राज्याने पाहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर या लढतीकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com