Narhari Zirwal: गरीब जिल्हा म्हणजे काय रे भाऊ? हा तर हिंगोलीकरांचा अपमानच!

Impact of Guardian Minister on Poor Districts : पालकमंत्रिपद कशासाठी असते, गरीब जिल्हा म्हणजे काय, अशा जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यास काही नुकसान होते का? असे नवीन प्रश्न महाराष्ट्रासमोर निर्माण झाले आहेत.
Narhari Zirwal
Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Hingoli News: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन महिने सरले आहेत. प्रचंड बहुमत असलेले महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. बहुमत मोठे असल्यामुळे सरकारला तशी कोणत्याही प्रकारची अडचण नाही, मात्र सरकारचा गाडा रुळावर आलेला दिसत नाही. पालकमंत्रिपदावरून सुरू असलेले नाराजीनाट्य सरकारसाठी नामुष्की ठरली आहे. पालकमंत्रिपदासाठी इतकी धडपड कशासाठी, असा प्रश्न त्यामुळे लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.

रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील तिन्ही पक्षांत कुरघोड्या सुरू आहेत. आता हिंगोली जिल्ह्यावरूनही असाच वाद निर्माण झाला आहे. राज्याचा विकास करण्यासाठी, आश्वासने पूर्ण करण्यासाठी आपण महायुतीला निवडून दिले की आणखी कशासाठी निवडून दिले, असा प्रश्न आता मतदारांना पडला असणार.

हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या एका अपरिपक्व, धक्कादायक विधानाने लोकांना तोंडात बोटे घालावी लागली आहेत. मी गरीब म्हणून मला गरीब जिल्हा दिला, असे ते म्हणाले आहेत. नरहरी झिरवाळ यांना हिंगोलीचे पालकमंत्री झाल्याची खंत वाटत आहे. अशी खंत किंवा खदखद व्यक्त करून झिरवाळ यांनी हिंगोलीकरांचा अपमानच केला आहे.

Narhari Zirwal
Delhi Vidhan Sabha Election: गुजरात पोलिसांची 'दिल्ली'वर 'नजर'; केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

मी गरीब म्हणून मला गरीब जिल्हा दिला, याचा अर्थ लोकांनी समजून घ्यायला हवा. राजकारण कसे चालते, ते कशासाठी केले जाते, याचा उलगडा याद्वारे होईल. पालकमंत्र्यांचे काम काय असते? असा प्रश्न झिरवाळ यांच्या विधानामुळे लोकांच्या मनात नक्कीच निर्माण झाला असणार.

जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा म्हणून पालकमंत्र्यांनी काम करणे अपेक्षित असते. पालकमंत्री हे संबंधित जिल्ह्याचे प्रमुख असतात. ते जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. जिल्ह्याच्या विकासासाठी निधीच्या वितरणाचा अधिकार त्यांना असतो.

पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यावर प्रशासकीय आणि राजकीयदृष्ट्या नियंत्रण ठेवण्याची संधी मिळते. राज्य सरकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील दुवा म्हणून काम करताना जिल्ह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष देणे, विकासकामांवर लक्ष ठेवणे आदी कामे त्यांना करावी लागतात.

ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा जिल्ह्यात विस्तार करणे, आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे कामही पालकमंत्री करत असतात. आपला पक्ष घराघरांत पोहोचवण्याची संधी यानिमित्ताने त्यांना मिळालेली असते. हे राहिले बाजूलाच, हिंगोलीला गरीब जिल्हा म्हणत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी तेथील नागरिकांना एका अर्थाने हिनवण्याचा प्रयत्न केला आहे.

Narhari Zirwal
Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या मुजोर पदाधिकाऱ्याला अजितदादांनी भरला सज्जड दम; कारवाई करणार?

जिल्हा गरीब असला काय आणि श्रीमंत असला काय, कामे तीच असतात. गरीब जिल्ह्याची व्याख्या काय, हे मंत्री झिरवाळ हेच चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. एक मात्र निश्चित की, पालकमंत्रिपद हे मलई लाटण्यासाठीच असते, हे झिरवाळ यांच्या विधानाने अधोरेखित झाले आहे.

झिरवाळ इतक्यावरच थांबले नाहीत, ते पुढे म्हणतात की, गरीब जिल्हा का दिला, याचा जाब मी सरकारला विचारणार आहे. आहे की नाही गंम्मत? अशा गंमतीजमती करण्यासाठी, वैयक्तिक आशा -आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पालकमंत्रिपद हवे असते का? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.

अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ विजयी झाले आहेत. शरद पवारांची साथ सोडून अजितदादा पवार यांच्यासोबत राहणे त्यांनी पसंत केले. त्यांच्या वनारे गावाचे सरपंच ते मंत्रिपद असा त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आहे.

2014 पासून ते दिंडोरी मतदारसंघातून सलग निवडून येत आहेत. 2004 मध्येही ते आमदार झाले होते. सेवा संस्थेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य, उपसभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. याचा अर्थ असा की ते जमिनीवरून आलेले कार्यकर्ते आहेत.

2019 पासून महाराष्ट्राने राजकीय नेत्यांची थक्क करणारी, तोंडात बोटे घालायला लावणारी, प्रसंगी शरमेने मान खाली घालायला लावणारी विधाने ऐकली आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर असे प्रकार बंद होतील, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे.

Narhari Zirwal
Pratap Sarnaik: महायुतीत अजब 'कारभार': मंत्र्याला न विचारताच अधिकाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय; सामान्यांना फटका

गरीब जिल्हा म्हणजे काय, गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यामुळे काय तोटा होतो, या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र आता शोधू लागला आहे. पालकमंत्रिपद कशासाठी हवे असते, याची जाणीव हे सरकार सत्तेत आल्यानंतर लोकांना झाली आहे.

मंत्री झिरवाळ यांनी आपल्या वक्तव्यापासून घूमजाव केले आहे. मला तसे म्हणायचे नव्हते, असे रूळलेले विधान नंतर त्यांनी केले आहे. आपण काय बोलून गेलो, हे कदाचित त्यांच्या लक्षात आले असावे, मात्र वाचाळपणावर उपाय नसतो. कोणतीही सवय वेळ अवेळ पाहत नाही. वाचाळपणाचेही तसेच आहे. जमिनीवरून आलेल्या नेत्याकडून अशा प्रकारचे विधान येणे हे राजकारण कोणत्या पातळीवर गेले आहे, याचे निदर्शक मानले पाहिजे. सरकारला आता वाटत असेल, या झिरवाळांचे करायचे तरी काय?

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com