Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. तो तुटेपर्यंत ताणला जातो की काय, अशी चिन्हे दिसत आहेत. येथून लढण्यासाठी काँग्रेसचे विशाल पाटील इच्छुक होते, मात्र मतदारसंघ गेला शिवसेनेच्या वाट्याला. हा वाद शमणार, याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.
लोकशाही वाचवण्यासाठी मतदारांना पुढाकार घ्या, असे आवाहन करणारे महाविकास आघाडीचे नेते स्वार्थ बाजूला सारून स्वतः पुढाकार घेणार नाहीत ता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नेत्यांना लोकशाही वाचवायची आहे की स्वतःचे मतदारसंघ, अस्तित्व वाचवण्यासाठी त्यांची ही लढाई आहे, असा संदेश या वादातून जाण्याची शक्यता निर्माण झाला.
राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) अशी लढत आहे. महाविकास आघाडीसोबत जाणार, अशी चर्चा असलेली प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन विकास आघाडी अखेर स्वतंत्रपणे मैदानात उतरली आहे. कागदावर महायुती प्रचंड शक्तिशाली दिसत आहे. महाविकास आघाडीतील दोन पक्षांमध्ये उभी फूट पडली असून फुटलेले गट महायुतीत सामील झाले आहेत.
काँग्रेसचे काही दिग्गज नेते भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी कागदावर कमकुवत दिसत आहे. असे असतानाही जमिनीवर महाविकास आघाडीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. सांगलीसारखे प्रकार वेळीच नाही रोखले तर महाविकास आघाडीला ते महागात पडणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सांगली मतदारसंघ शिवसेनेला(Shivsena) (ठाकरे गट) सुटला आणि महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारीही जाहीर झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करून भाजपमध्ये स्थिरावलेले संजयकाका पाटील हे गेल्या दोन टर्मपासून सांगलीचे खासदार आहेत. आता त्यांना हॅटट्रिकची संधी आहे. महाविकास आघाडीत सुरू असलेल्या नाराजीनाट्यामुळे संजयकाका यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
मुळात सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे, बालेकिल्लाही राहिलेला आहे. 2014 मध्ये संजयकाका यांनी काँग्रेसचे प्रतीक पाटील यांचा पराभव केला. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि स्वाभिमानीची आघाडी होती. हा मतदारसंघ स्वाभिमानीला सुटला होता आणि विशाल पाटील उमेदवार होते. संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील यांचा 1,64,352 मतांनी पराभव केला होता. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचांद पडळकर यांना तीन लाख मते मिळाली होती.
गेल्या सलग दोन निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे, त्यामुळे काँग्रेस आणि विशाल पाटील यांनी या मतदारसंघासाठी हट्ट करू नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. वरिष्ठ पातळीवरूनही या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यापूर्वी, मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी आमदार विश्वजित कदम(Vishwajeet Kadam) यांनी दिल्लीतही ठाण मांडले होते.
मात्र काँग्रेसने शिवसेनेसमोर नमते घेतले. काँग्रेसचे स्थानिक नेते मात्र नमते घ्यायला तयार नाहीत. यावर तो़डगा निघेल असे महाविकास आघाडीकडून सांगितले जात असतानाच विशाल पाटील यांचे बंधू, माजी केंद्री मंत्री प्रतीक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या मानत काय चालले आहे, याची कल्पना येते. विशाल पाटील त्यांची भूमिका बुधवारी (11 एप्रिल) जाहीर कऱणार आहेत. त्यापूर्वीच घडामोडी सुरू झाल्या आहेत.
सांगली मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, उमेदवारी विशाल पाटील यांना मिळावी, यासाठी पलूस-कडेगावचे आमदार विश्वजित कदम हे अधिक आग्रही आहेत. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि ते विजयी झाले तर काँग्रेस पक्षात कदम यांचे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व निर्माण होईल, म्हणजेच काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते असे त्यांची ओळख निर्माण होणार आहे. त्यासाठी ते आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काळ कठीण आहे, लोकशाही धोक्यात आहे, असे महाविकास आघाडीचे नेते, काँग्रेसचे नेते राहुल गांधीही सांगत आहेत.
स्थानिक नेत्यांना मात्र स्वतःचीच काळजी असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. महाविकास आघाडीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी मतदारांनी पुढाकार घ्यायचा आणि त्यांच्या नेत्यांनी मात्र स्वतःची काळजी करायची.. असे कसे चालेल? शिवसेना आणि काँग्रेसने दोन पावले मागे घेऊन यावर तोडगा काढायला हवा, अन्यथा अशा वादांद्वारे चुकीचा संदेश जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.