
Mumbai News : पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन दोन आठवडे झाले आहेत. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच महायुती सरकारला हिंदी सक्तीच्या मुद्द्याचे दोन जीआर मागे घ्यावे लागले होते. त्यामुळे विरोधक आक्रमक झालेले दिसून आले. त्यानंतर राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र येतील असे चित्र विजयी मेळाव्यानंतर दिसत आहे. त्यांनी राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यातच दुसरीकडे अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधकांना अडचणीत आणले जाईल, असे वाटत असतानाच सत्तेत असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.
यापूर्वी सत्ताधारी मंडळींच्या रडारवर विरोधी पक्षाचे नेते होते. त्यावेळी खासदार संजय राऊत, माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासारख्या विरोधी पक्षामधील नेत्यांना टार्गेट करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. राऊत, देशमुख यांच्यासह सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांना वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे. आता सत्तेत असूनही शिंदे गटाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यात विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या खूप कमी झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील काही नेत्यांनी सत्ताधारी महायुतीकडे ओढा दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून सत्तेत असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठीमागे वेगवेगळे शुक्लकाष्ठ लागले आहे. सत्तेत असूनही शिंदे गटाचे तीन नेते सध्या वेगवेगळ्या मार्गाने अडचणीत सापडले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पहिल्यांदा अडचणीत आले. त्यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. या व्हिडीओत संजय गायकवाड कर्मचाऱ्याला मारताना दिसत आहेत. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. मी कारवाईला घाबरत नाही, असे त्यांनी सांगितले असले तरी संजय गायकवाड एका प्रकारे अडचणीतच आले आहेत.
त्यानंतर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे. 2019 ते 2025 या काळात वाढलेल्या संपत्तीचे स्पष्टीकरण द्यावे, असे या नोटीशीत म्हणण्यात आले आहे. त्यानंतर शिरसाट यांच्याच विधानाचा आधार घेत शिंदे गटाचेच नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनाही प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचे सांगितले जात होते. या वृत्ताचे श्रीकांत शिंदे यांनी खंडन केले आहे. मला कोणतीही नोटीस आलेली नाही, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तडकाफडकी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते.
ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते पलंगावर बसलेले असून त्यांच्यापुढे पैशांनी भरलेली एक बॅग दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून एवढे सारे पैसे आले तरी कुठून? असा प्रश्न विचारला जात आहे. या व्हिडीओमुळेही शिरसाट चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे एक नव्हे तर आता दोन कारणाने संजय शिरसाट यांच्या अडचणीत भर पडली आहे. या सर्व घडामोडींनंतर शिंदे गटाचे नेते टार्गेटवर आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पावसाळी अधिवेशनचा अद्याप एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित कामकाजात तरी विरोधक सत्ताधाऱ्याना घेरणार का? याची उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे पुढच्या आठ्वड्यात अधिवेशन संपणार आहे. तत्पूर्वी सत्ताधारी महायुतीकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपद दिले जाणार की नाही? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे या आठवड्यातील कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.