
Mumbai News : राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. त्यामध्ये राज्य सरकारकडून येत्या वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. विशेषतः अन्य काही खात्याचा निधीदेखील लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे अन्य योजनेसाठी राज्य सरकारकडे निधीच उपलब्ध नसल्याने नवीन योजनेची घोषणा करण्यात आलेली नाही.
विशेषतः महायुती (Mahayuti) सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली जाईल असे वाटत होते. कृषिमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी याबाबत स्पष्टच सांगितले आहे. त्यामुळे कर्जमाफी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यातच महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने दिली होती. लाडकी बहीण यॊजना सॊडली तर नव्याने दिलेली सर्वच आश्वासने हवेतच विरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
तीन महिन्यापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी तब्बल 232 जागा जिंकत घवघवीत यश मिळवल्यानंतर सत्तास्थापन केली. 5 डिसेंबर 2025 ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात महायुतीचे सरकार स्थापना होऊन 100 दिवसांहून अधिक कालावधी लोटला. त्यामुळे सरकार लवकरच कर्जमाफी करेल असे शेतकऱ्यांना वाटत होते, मात्र महायुती सरकारकडून कर्जमाफीबाबत कोणतीच घोषणा करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
निवडणुकीपूर्वी दिली होती 'ही' आश्वासने?
राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 दिले जातील, जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न राहील, अंगणवाडी आणि आशासेविकांना दरमहा 15 हजार रुपये दिले जातील, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आणि सन्मान निधीचे पैसेही वाढवून देऊ, राज्यात 25 हजार पोलिसांची रिक्त पदे भरली जातील. वृद्धांना प्रत्येकी 2100 रुपयांचं निवृत्ती वेतन दिलं जाईल. सौर उर्जेला प्राधान्य देऊन वीज बिलात कपात केली जाईल, असे विविध आश्वासने महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यातून दिली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके काय म्हणाले ?
कर्जमाफीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेले विधान खूप बोलके आहे. त्यामुळेच आता तीन वर्षतरी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाण्याची शक्यता खूप कमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करावी. राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं शक्य नसल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना स्पष्ट केले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने सत्तेत येण्यासाठी घोषणांचा पाऊस पडला होता. निवडणूक जाहीरनाम्यातून राज्यातील जनतेला अनेक आश्वासनं दिली होती. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले होते. मात्र बहुमत मिळताच राज्यातील महायुतीच्या नेत्याला या घोषणेचा विसर पडला आहे. त्यामुळे यावरून जनतेच्या मनात रोष दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काय आहे भूमिका?
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 ऑक्टोबर 2022 रोजी भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. यासाठी जवळपास 964 कोटी रुपये सरकारकडून दिले. इतकंच नाही, तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही शिंदेंनी कर्जमाफीबाबत आश्वासन दिले होते. मात्र, राज्यात महायुतीची दुसऱ्यांदा सत्तास्थापन झाल्यानंतर शिंदे कर्जमाफीबाबत फारसे बोलतच नाहीत.
मुख्यमंत्री फडणवीसांची कर्जमाफीबाबत काय आहे भूमिका ?
विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील सभेत राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास शेतकऱ्यांची कर्जे माफ करू, असं आश्वासन फडणवीसांनी दिल होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी जी शेतकरी कर्जमाफीबाबत भूमिका मांडलेली आहे. ती सरकारची भूमिका आहे. अजित पवारांनी कधीच म्हटले नाही की, कर्जमाफी शक्य नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात बोलताना 22 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात दिलेली सर्व आश्वासनांची पूर्तता महायुती सरकार पूर्ण करेल.
पुरेसा निधीच उपलब्ध नाही
राज्य सरकारकडे अन्य योजनेसाठी पुरेसा निधीच उपलब्ध नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन कोणत्याच योजनेची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत येत्या काळात महायुती सरकारकडून काय तोडगा काढला जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.