Maharashtra Politics: जनमताचा अनादर! महायुतीत वाढलाय बेबनाव; विरोधकही बेजबाबदार

Mahayuti Govt Faces Internal Conflicts Public Opinion Neglect: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरु आहे, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. महायुतीच्या घटक पक्षांतील हा बेबनाव एकीकडे समोर येत असतानाच विरोधकही लोकांच्या प्रश्नावर बेजबाबदार असल्याचे दिसते.
Maharashtra Politics news
Maharashtra Politics news Sarkarnama
Published on
Updated on

मंत्री माणिकराव कोकाटे व दत्ता भरणे यांच्या खात्यात अदलाबदल करून महायुती सरकारने तूर्तास कोकाटेंच्या ‘रमी’वादावर तोडगा काढला आहे. हा तोडगा काढत असतानाच तिकडे आणखी एक मंत्री संजय सिरसाट व मेघना बोर्डीवर पुन्हा एका वादात अडकले. मंत्रिमहोदय व लोकप्रतिनिधींच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हैराण झालेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी सगळ्याच मंत्र्यांना तंबी दिली आहे. त्यामुळे आता किमान त्याचे प्रमाण कमी होईल अशी आशा करूया.

खरे पाहता ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देत देशात व राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालचे हे सरकार आहे. मात्र देशात व राज्यातही भाजपचे अनेक लोकप्रतिनिधी आपल्या वाचाळ वाणीने आपले ‘वेगळेपण’ दाखवत आहेत. तर इथे आपल्या राज्यात त्यांच्या दिमतीला त्यांच्या सहकार पक्षांचे मंत्री धावून येत असतात. या गदारोळात लोकांचे खरे प्रश्न बाजूला पडत आहेत.

एका आमदाराने आमदार निवासातील कॅंटीनमध्ये केलेली मारहाण असो किंवा थेट विधिमंडळाच्या लॉबीमध्ये दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांत झालेली झटापट असो. हे सगळे प्रकार आपल्या सर्वांची मान खाली घालायला लावणारे आहेत. त्याशिवाय विधिमंडळातील लोकप्रतिनिधींची चर्चाही तिचे गांभीर्य हरवून बसत चालली आहे. हे सगळे रसातळाला जाणे गंभीर आहे.

राज्यात बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील भाजप व शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात सतत बेबनाव निर्माण होत असल्याची लोकांची भावना बनत चालली आहे. दोन तीन पक्षांच्या सरकारमध्ये भांड्याला भांडे लागणारच. मात्र युती केलेल्या पक्षांत योग्य समन्वय असेल चांगले सरकार चालविता येते, असा अनुभव केंद्र सरकारमध्ये अटलबिहारी वाजपेयी, पीव्ही नरसिंहराव, मनमोहनसिंग आदी पंतप्रधानांनी तर राज्यात शरद पवारांसारख्या नेत्यांनी आघाडी सरकारे चालवून दाखवून दिला आहे. मात्र आताच्या राजकीय आघाड्यांना त्याचे काही सोयरसुतक राहिलेले नाही, असे दिसते

Maharashtra Politics news
Raksha Bandhan 2025: कोरे कोरे छान बँकबुकचे पान, हप्त्याचा योग दादा जुळवून आण!

एकीकडे ही परिस्थिती असली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची राजकीय आघाडीवर जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. दोन्हींकडची नेतेमंडळी स्वबळाचा नारा देत आहेत.तर कुणी सावध प्रतिक्रिया देत आहेत. भाजपने नेहमीप्रमाणे यात धडाका लावला असून प्रत्येक जिल्ह्यात प्रवेश सोहळ्यांचे नियोजन करून विरोधक व घटक पक्षांचाही कंपू कमकुवत करण्यावर भर दिला जात आहे.

कांही ठिकाणी तर महायुतीतील दोन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. जालन्यात शिवसेनेच्या अर्जून खोतकरांविरूद्ध भाजपचे कैलास गोरंट्याल एकमेकांसमोर आहेत. सांगलीत भाजपअंतर्गतच गोपीचंद पडळकरांना रोखण्यासाठी अण्णा डांगेंचा प्रवेश झाल्याचे मानले जाते. धाराशिवमध्ये शिंदे शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या भूम परांड्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राहूल मोटे यांचा नुकताच पक्षप्रवेश झाला आहे. ही काही वानगीदाखल उदाहरणे. तर मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आदी महत्वांच्या जिल्‍ह्यांतही महायुतीत बेबनाव समोर येत आहे.

महायुतीच्या घटक पक्षांतील हा बेबनाव एकीकडे समोर येत असतानाच समोर असलेले विरोधकही सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर बेजबाबदार असल्याचे लक्षात येत आहे. सर्वसामान्य लोकांच्या लढण्याचे हक्क हिरावून घेणारा जनसुरक्षा विधेयक विधिमंडळात सरकारने मांडले व ते बहुमताने मंजूरही करून घेतला. यावर विधानसभेत चर्चा करण्यातही विरोधकांना अपयश आले. यामुद्यावरून काँग्रेस नेत्यांवर टिकेची झोड उठली.

काँग्रेसमध्ये पक्षसंघटना व विधिमंडळांतील लोकप्रतिनिधी यांच्यात एकवाक्यता दिसून येत नाही. तसेच महाविकास आघाडीतही आगामी निवडणुकांच्या बाबतीत निश्चित धोरण स्पष्ट होत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी कामाचा धडाका सुरू केला होता मात्र त्यांना सहकार्य करणारी पक्षाची कार्यकारिणी सहा महिन्यांनंतर जाहीर करण्यात आली आहे.

तर मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे व मनसेचे राज ठाकरे यांच्या एकत्रिकरणाची केवळ चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही आपली भाकरी फिरवली असून शशिकांत शिंदेंना प्रदेशाध्यपदाची जबाबदारी नुकतीच दिली आहे. त्यातुलनेत वादग्रस्त लोकप्रतिनिधींनी सरकार बेजार झाले असले तरी विरोधकांच्या छावणीतही सगळे काही आलबेल नाही. हिंदी-मराठीच्या वादाने व वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभाराने त्यांची वाट तशी सुकर करून दिलेली आहे. मात्र त्यांचा वापर ते कसे करून घेतात यावर बरेच काही अवलंबून आहे.

Maharashtra Politics news
'महादेवी' मुळे चर्चेत आलेल्या 'वनतारा'वर अनंत अंबानी दरवर्षी किती कोटी रुपये खर्च करतात?

प्रभावशाली परंपरेला तडा

सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या गोटात हे जे काही चालले आहे, ते निश्चितच महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावह नाही. एकेकाळी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, गणपतराव देशमुख, केशवराव धोंडगे यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात ज्या निष्ठेने काम केले, लोकांचे प्रश्न माडंले, त्यांची आठवण आज येते. या प्रभावशाली परंपरेला विधिमंडळात लोकप्रतिनिधी करत असलेल्या कृत्याने तडे जात आहेत. हे लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. तसेच मतदारांनीही आपले लोकप्रतिनिधी निवडताना ही काळजी घेण्याची गरज आहे. तरच या गोष्टींना आळा बसू शकेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com