Vidhan Parishad News : विधान परिषद निवडणुकीत आपल्या दोनच जागा निवडून येतील, इतकेच संख्याबळ असतानाही महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला होता. महाविकास आघाडीचा हा आत्मविश्वास फोल ठरला आहे. आपले सर्व 9 उमेदवार निवडून आणत महायुतीची तटबंदी भक्कम असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी दाखवून देत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरील संभाव्य अपशकून टाळला आहे.
काँग्रेसची मते फुटतील अशी चर्चा होती आणि आठ मते फुटल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाने पुरस्कृत केलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे गेम कुणाचा होणार, याची उत्सुकता लागली होती. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या तोंडचे पाणी पळवले होते. यात महत्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे विधान परिषद निवडणुकीतही महायुतीला मात देण्यासाठी मैदानात उतरले होते. वर्षभरापूर्वी साथ सोडलले पुतणे अजितदादा पवार यांना शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा एक धक्का देतात का, अशी चर्चा सुरू झाली होती, मात्र झाले उलटेच. शरद पवार यांना अजितदादा पवार यांचे आणि उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांचे एकही मत फोडता आले नाही. उलट काँग्रेसचीच आठ मते फुटली.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश मिळाले होते. अपयशाचे खापर फोडण्यासाठी एक डोके लागते. महायुतीला मिळालेल्या अपयशाचे खापर अप्रत्यक्षपणे अजितदादा पवार यांच्या डोक्यावर फोडण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात तसा लेखही प्रसिद्ध झाला आहे. भाजपच्या काही नेत्यांनी अजितदादा नको, अशी भूमिका जाहीरपणे मांडली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतच अजितदादांच्या घड्याळ चिन्हावर मतदान कसे करायचे, असा प्रश्न समाजमाध्यमांवर उपस्थित केला होता. निकाल लागल्यानंतर महायुतीत अजितदादांची उपयुक्तता काय, असेही प्रश्न उपस्थित केले गेले. भाजपच्या काही नेत्यांनी अजितदादांचे तोंडदेखले समर्थन करण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या उमेदवारांकडे राज्याचे लक्ष लागले होते. राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे दोघेही विजयी झाले.
विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निश्चितपणे विजयी होऊ शकत होते. मात्र 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात राहिल्यामुळे चुरस निर्माण झाली होती.
महायुतीचे संख्याबळ असे आहेः भाजप- 103, शिवसेना- 37, राष्ट्रवादी काँग्रेस- 39, छोटे पक्ष 9, अपक्ष- 13, एकूण - 201. महाविकास आघाडीचे संख्याबळ 67 असून त्यात काँग्रेस 37, शिवसेना 15, राष्ट्रवादी काँग्रेस 13, शेकाप 1 आणि एका अपक्षाचा समावेश आहे. अन्य सहा आमदार तटस्थ असल्याचे सांगितले जात होते, मात्र त्यापैकी समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी शेकापचे जयंत पाटील यांची सकाळी भेट घेतली होती. माकपचे आमदार विनोद निकोले यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत असल्याचे जाहीर केले होते.
11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आणि मते कोणाची फुटणार याची चर्चा सुरू झाली. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीचे नेते आपली बाजू भक्कम असल्याचे समोर येऊन सांगत होते आणि दुसरीकडे आमदारांना कडक बंदोबस्तात पंचतारांकित हॉटेलांत ठेवत होते. त्यामुळे त्यांच्या दाव्यांना फारसा अर्थ उरला नव्हता. शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत केलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्याकडे पुरेशी मते नव्हती.
काँग्रेसची मते मिळणार असल्याने नार्वेकर निश्चिंत होते. जयंत पाटील यांच्यासाठी मात्र जुळवाजुळव करावी लागणार होती. शरद पवार यांनी त्यासाठी प्रयत्न केले, मात्र ते अपुरे ठरले. जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला उल्लेखनीय यश मिळाले. त्याचा परिणाम विधान परिषद निवडणुकीत दिसेल, अशी चर्चा होती, मात्र ती खोटी ठरली.
अजितदादांच्या उमेदवाराचा पराभव झाला असता, तर त्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला असता. आता तूर्तास त्याला पूर्णविराम मिळाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभेच्या दहा जागा लढवल्या आणि त्यापेकी आठ जागा जिंकल्या. त्यामुळे अजितदादांच्या गटात गेलेल्या आमदारांना धडकी भरणे साहजिक होते.
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादांच्या पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. विधान परिषदेत अजितदादांच्या उमेदवाराचा पराभव झाला असता तर त्यांच्या आमदारांमध्ये अस्वस्थतता आणखी वाढली असती आणि कदाचित गळतीही लागली असती. एकनाथ शिंदे यांची मते फुटली असती तर त्यांच्याही बाबतीत असेच झाले असते.
काँग्रेसची 9 चे 10 मते फुटणार, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनीही आपल्या चार मतांवर संशय व्यक्त केला होता. आमदार झिशान सिद्दीकी यांची चिडचिड पाहिल्यानंतर ते लक्षात आले होते. सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी हे लोकसभा निवडणुकीपूर्वी अजितदादांच्या पक्षात गेले आहेत. त्यानंतर लोकसभेचा निकाल लागला आणि झिशान सिद्दीकी यांची अडचण झाली आहे
विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला काँग्रेसने आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला आपल्याला बोलावण्यात आले नव्हते, असे सांगत झिशान सिद्दीकी यांनी थयथयाट केला होता. असे असले तरी पक्षश्रेष्ठी सांगतील त्यानुसारच मतदान करणार असल्याचेही त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. मात्र नेमके उलटे झाल्याचे दिसत आहे.
लोकसभेला सर्वाधिक जागा जिंकलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता. मते फुटल्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे विमान जमिनीवर आले आहे. कोणते आमदार फुटले, त्यांच्यावर काँग्रेस काय कारवाई करणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित बोराखे आणि सदाभाऊ खोत हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने, भावना गवळी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर हे विजयी झाले. अडचणीत असल्याचे सांगितल्या जात असलेल्या काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव विजयी झाल्या आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची 21 मते मिळाली आहेत. दुसऱ्या पसंतीची तीन मते मिळाल्याने नार्वेकर यांना विजयी घोषित करण्यात आले. शरद पवार यांच्या पक्षाने पुरस्कृत केलेले शेकापच्या जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीची केवळ 12 मते मिळाली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला.
एकूण मतदान किती आहे त्याला जितक्या जागा आहेत त्याने भागाकार करायचा आणि येणाऱ्या संख्येत एक मिसळायचा. ही एकूण संख्या ही मतांचा कोटा असते. विधानसभा सदस्यांची संख्या 288 आहे. अनेक आमदारांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांनी राजीनामे दिले आहेत. काही आमदार अपात्र ठरले आहेत.
त्यामुळे विधानसभा सदस्यांच्या 14 जागा रिक्त आहेत. म्हणजे आमदारांची एकूण संख्या 274 आहे. 274 भागिले 11 + 1 = 22.83 1=2284. वैध मतांच्या आधारे कोटा ठरतो. एखादे मत बाद झाले तर कोटा कमी होतो. एका मताचे मूल्य 100 इतके असते. मतांचा कोटा शेकड्यात ठरत असतो. 2284 म्हणजे पहिल्या पसंतीच्या 23 मतांची आवश्यकता होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.