Maharashtra Political News : एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली आणि अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावला. हे सारे दिल्लीकरांच्या आशीर्वादाने झाल्यामुळे सत्ताधारी भाजपविरोधात महाराष्ट्रात विरोधी पक्षांना मोठी सहानुभूती मिळत होती. याच कारणामुळे मुंबई महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. मात्र, लोकसभा निवडणूक नजीक येऊ लागली ते बघता भाजप राज्यात मतदारांचा कौल घेताना दिसत आहे. यात लोकांचा सत्ताधाऱ्यांविषयी प्रतिकूल मत असल्याचे लक्षात आल्याने सध्या आरक्षणाच्या वादाला जेवढी हवा देता येईल, तितके लोकांचे लक्ष विरोधकांना मिळणाऱ्या सहानुभूतीपासून विचलित होईल, असाच सारा खटाटोप पडद्याआडून सुरू असल्याचे बोलले जाते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यात लाखोंच्या सभा होत आहेत. मराठ्यांचा कुणबी म्हणून विचार केला तरच त्यांना आरक्षणाचा आधार मिळेल, यासाठी रान उठवणाऱ्या जरांगे पाटलांच्या मागे महायुतीमधील एक पक्ष आहे. सत्ताधाऱ्यांच्या पाठबळाविषयी लाखोंच्या सभा आणि त्यासाठीचा करोडो रुपयांचा खर्च शक्य नाही, असा एक मतप्रवाह आहे. यामुळेच जरांगेंचा बोलविता धनी कोण ? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. यावर मराठा समाजाची जनताच हा खर्च उचलत असल्याचा दावा जरांगे करतात.
जरांगे डोईजड होतायत हे लक्षात येताच ओबीसी, धनगर समाज आणि त्यांच्या नेत्यांना हवा जोरात हवा भरण्याचे काम सुरू झाले. यात छगन भुजबळ आघाडीवर असून गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे यांचे सुद्धा जोरदार आक्रमण सुरू झाले आहे. या ओबीसी नेत्यांना सुद्धा महायुतीमधील दुसरा पक्ष पाठीशी घालत असल्याचे कळते. आज जरांगे यांनी आवाज द्यायचा, मग उद्या भुजबळांनी त्याला आव्हान द्यायचं, परवा पडळकर प्रतिहल्ला करणार. पुन्हा तीन दिवसांनी तोच कार्यक्रम पुन्हा सुरू! आरोप प्रत्यारोपचा खेळ करत विरोधकांच्या सहानभूतीला सुरुंग लावण्याचा हा 'करेक्ट' कार्यक्रम सुरू आहे आणि हेच भाजप, महायुतीला हवे आहे.
अशा अस्थिर परिस्थितीचा भाजपला फायदा होण्याची शक्यता अधिक वाटते. काही दिवसांपूर्वीपर्यंत राज्यातील जनभावना पक्षफुटीमुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मागे होती. आता हा अंदाज बाजूला पडला आणि नवीन हवा तयार झाल्याची दिसते. ते म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी समाज. याचा अर्थ लोकांच्या जनमताला नवीन आकार मिळाला आहे. या अर्थाने त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. मात्र ही केवळ शक्यता आहे, निश्चित असे आताच काही सांगता येणार नाही.
मतांच्या बाबतीत बोलायचं झाले तर मराठा मते ही काही कोणत्या एका पक्षाला सरसकट मिळत नाहीत. हा गेल्या दोन दशकातील इतिहास आहे. आताच्या परिस्थितीमुळे कोणाची मते वाढतील, हा यातला महत्त्वाचा भाग आहे. मराठा मते आपल्या बाजूला मोठ्या प्रमाणावर येणार नाहीत, हे लक्षात आल्याने भाजप ओबीसी मतांवर लक्ष ठेवून आहे. २०१४ पासून ओबीसी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा भाजपकडे वळताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात सत्ता आणायची असल्यास ओबीसी मोठ्या संख्येने भाजपच्या मागे असले पाहिजे, याची खूणगाठ बांधत प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी ठरवून ओबीसी समाजाभोवती आपले राजकारण केंद्रित केले होते. त्याची रुजवात गेल्या दशकभरात होताना दिसत आहे. यासाठी प्रमुख ओबीसी चेहरा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व सुद्धा मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरले आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना लोकांकडून मिळणारी सहानुभूती वळवण्याचा प्रयत्न भाजपकडून गेल्या काही काळापासून जोरात सुरू आहे. हे वळवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना आरक्षणाच्या मुद्दाने आयती संधी मिळाली आहे. लोकसभा तसेच विधानसभेच्या मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपचा मुख्य 'वोटर' ओबीसीच राहिलेला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप पुढाकार घेईल, अशी सुतराम शक्यता नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. ही मुदत देताना त्यांनी सरकारला यानंतर आपल्या हातात काहीच राहणार नाही, मग लोकच ठरवतील, या सरकारचे करायचे काय? असा इशारा सुद्धा दिला आहे. मात्र, आवाज देताना या सरकारचा त्यांनी कधीच शिंदे सरकार म्हणून उल्लेख केलेला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
मुख्य म्हणजे शिंदे यांच्यावर त्यांनी टीका किंवा त्यांना आव्हान देण्याची भाषा केलेली नाही. उलट ठाणे मुक्कामी येऊन मुख्यमंत्री शिंदे हेच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, असे जाहीरपणे सांगत शिंदेबद्दल मराठ्यांचे चांगले मत असल्याचा कौल दिला होता. मातोश्रीपासून वेगळी चूल बांधून राजकारणात आपला जनाधार जमवू पाहणाऱ्या शिंदे यांना असा कौल गरजेचा होता. ठाकरेंना मिळणारी सहानभूती यानिमित्ताने कमी झाली तर त्यांना हवीच आहे. सध्या तरी जरांगे यांची हवा विरोधकांची स्पेस कमी करणारी आहे, असेच वातावरण आहे, आणि तेच शिंदे सरकारला हवे आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.