भाजप प्रवेशासाठी ज्योतिषाने मुहूर्त काढलाय : नारायण राणे 

narayan_rane
narayan_rane
Published on
Updated on

सावंतवाडी  : युती होवो किंवा न होवो त्याचा माझ्या भाजप प्रवेशाशी काही संबंध नाही. येत्या आठ दिवसात माझा प्रवेश निश्‍चित आहे. तसा शब्द मला मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी दिला असल्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

नाणारबाबत माझी भूमिका भाजपमध्ये गेल्यावर स्पष्ट करेन. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या भाषेला उत्तर देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृहात तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, सभापती पंकज पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा सावंत, पल्लवी राऊळ, नगरसेवक अ‍ॅड. परिमल नाईक, शेखर गावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी श्री. राणे म्हणाले, “गेले तीन दिवस मी जिल्ह्याचा दौरा करीत आहे. आगामी भाजप प्रवेशाबाबत कार्यकर्त्यांना अज्ञानात ठेवणे, निर्णय घेणे मला उचित वाटले नाही. यासाठी त्यांच्याशी संवाद साधत आहे. ज्याप्रमाणे आपण मला आतापर्यंत साथ दिली तशीच साथ भविष्यातही मिळावी, असे कार्यकर्त्यांना सांगितल्यावर जेथे तुम्ही तेथे आम्ही अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे."

ते म्हणाले, “येत्या आठ दिवसात माझा भाजप प्रवेश निश्‍चित आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्याची बोलणे झाले आहे. त्यामुळे माझ्या सोबत जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते भाजपात येतील. शिवाय याप्रमाणे कोकणात शिवसेनेची लाट आणली. काँग्रेसमध्ये गेल्यावर काँग्रेस वाढवली, त्याचप्रमाणे भाजपात गेल्यावर येणार्‍या काळात सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील आमदार खासदारही भाजपाचे दिसतील.”

भाजपमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात माझ्यासोबत कोणतीही कमिटमेंट झाली नसून माझ्या विरोधाबाबत शिवसेनेची मते दर तासाला बदलत असतात. युती होवो की न होवो त्याच्याशी माझ्या प्रवेशाचा काहीच संबंध नसल्याचे श्री. राणे म्हणाले.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नाणारबाबत केलेल्या भुमिकेबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी स्थानिक नेत्यांच्या कशालाच आपण उत्तर देणार नसुन स्थानिक पातळीवर मला भाजपमध्ये प्रवेश मिळणार का ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

सध्याच्या निवडणुका व राजकारणातील आताच्या घडामोडी लक्षात घेता यापुढेही एका पक्षातून दुसर्‍या पक्षात आयात-निर्यात घडतच राहणार असे सांगत लोकसभा निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीनबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या संशयाच्या प्रश्‍नाला उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.

भाजप प्रवेशाबाबत आपण ज्योतिषामार्फत ज्योतिष काढले असून योग्यवेळी प्रवेश होईल. शिवाय नव्या घरात गृहप्रवेश मिळाल्यावरच आपण अधिक बोलेन, असा उपहासात्मक टोलाही श्री. राणे यांनी यावेळी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com