
Political Strategy Nilesh Rane: "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या कपाळाला गुलाल लावला आहे. प्रसंगी घरी बसेन पण शिंदे साहेबांना सोडणार नाही", असं म्हणत शिवसेना आमदार नीलेष राणे यांनी कुडाळ येथील सभेतून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. शिंदे यांच्याबद्दल आपल्या मनात किती आदर आहे, किती प्रेम आहे हेही त्यांनी जंगी सभा आयोजित करून दाखवून दिलं.
शिंदे यांनी थट काश्मीरवरून सिंधुदुर्ग गाठलं, सभेला संबोधित केलं आणि राणे आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत हे दाखवून दिलं. एकूणच या दोघांनाही एकमेकांप्रती प्रेमाचं भरतं आलं आहे. पण दुसर्या बाजूला नीलेश राणे यांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजत आहे.
सिंधुदुर्गमध्ये तीन पैकी दोन आमदार शिवसेनेचे असून भाजपचे खासदार आणि एक आमदार आहे. यात खासदारकी नारायण राणे यांच्याकडे असून एक आमदारकी आणि पालकमंत्रिपद त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्याकडे आहे.
तर शिवसेनेची आमदारकी दुसरे पुत्र नीलेश राणेंकडे आहे. यामुळे एकचा घरात सध्या जिल्ह्याचे राजकारण सुरू आहे. यातच एकाच घरात भाजप आणि शिवसेना असल्याने कोणकोणाचे बळ वाढवतो अशीच स्पर्धा लागली आहे.
भाजप आमदार तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपमय करू अशी घोषणा केली होती. त्या प्रमाणे त्यांनी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी आणि पक्ष प्रवेश घडवून आणले होते. याच दरम्यान त्यांनी विरोधकांच्या पायात विकास निधीचा साप सोडला होता.
मी या जिल्ह्याचा पालकमंत्री असून निधी कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे निधी हवा असेल तर भाजप प्रवेश करावा असा सूचक सल्ला दिला होता.
त्यानंतर झालेल्या टीकेमुळे त्यांनी सूर बदलत महायुतीत नेत्यांना ग्रामपंचायतपर्यंत निधी दिला जाईल पण महाविकास आघाडीतील नेत्यांना निधी मिळणार नाही, असे म्हटलं होते. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये प्रवेश झाले होते.
यावेळी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनीही जोर लावत काही प्रवेश उडवून आणले होते. नीलेश राणे यांना मानणाऱ्या अनेकांनी शिवसेनेचा मार्ग धरला होता. यात संजू परब यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.
पण आता जे झालेले प्रवेश आहेत किंवा भविष्यात प्रवेश होणार आहेत त्यावरून जिल्ह्यात वेगळ्याच चर्चा सुरू आहेत. नीलेश राणे इथे शिवसेना नाही तर आपली ताकद वाढवत असल्याचा दावा केला जात आहे. ही ताकद घेऊन नीलेश राणे आगामी काळात भाजपमध्ये जातील असे बोलले जात आहे.
मंत्री नितेश राणे आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा भाजपमय करू, जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष बनू, असे म्हणत काही दिवसांच्या अंतरात एखादा तरी पक्ष प्रवेश घडवून आणतात. तर दुसरीकडे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीमधीलच काही नाराजांना आपल्या बाजूने करत नीलेश राणेही शिवसेना वाढवताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून शिवेसना भाजप आमने-सामने आली असून भाजपने शिवसेनेला असे प्रवेश थांबवण्याच्या सल्ला दिला होता.
मात्र भाजपचा हा सल्ला नीलेश राणे (Nilesh Rane) कितपत ऐकतात हेच आता पाहावं लागणार आहे. कारण कुडाळच्या सभेत त्यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यात भगवा फडवण्याचे दिलेले संकेत आणि नीलेश राणे यांचे निकटवर्तीय असणारे संजू परब यांचा झालेला पक्षप्रवेश आता चर्चेचा विषय ठरला आहे. परब यांनी नीलेश राणेंची ताकद वाढवण्यासाठी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. तर परब यांच्यासह अनेकांसाठी पक्ष महत्वाचा नसून राणे महत्वाचे आहेत.
यामुळे भविष्यात अनेक सरपंच, शाखाप्रमुख, विभागप्रमुखांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे संकेत परब यांनी दिले आहेत. तर 10 मेनंतर गावागावांत प्रवेश होतील अशी कुडाळच्या सभेत घोषणा केली होती.
यानंतरच आता जे नीलेश राणे यांनी म्हटलं आणि विरोधकांनी जी टीका केली ती खरी ठरणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण होणारे पक्ष प्रवेश एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढणारे असतील की नीलेश राणे यांची ताकद हा महत्वाचा मुद्दा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.