Kudal Assembly constituency: 'मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही...' गेल्यावर्षी याच महिन्यात, म्हणजे 24 ऑक्टोबर 2023 रोजी असे ट्वीट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र, भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केले होते. तेच निलेश राणे यांनी आता हातात धनुष्यबाण घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
निलेश राणे यांचे वडील नारायण राणे यांना शिवसेनेने मुख्यमंत्री केले होते. नंतर उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे मतभेद झाले. त्यातूनच त्यांनी 19 वर्षांपूर्वी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. आता 19 वर्षांनंतर निलेश राणे हे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याद्वारे राणे कुटुंबीयांच्या राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. गेल्यावर्षीचा राजकीय संन्यासाचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी 24 तासांतच मागे घेतला होता.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यानंतर त्यांना काँग्रेसने कॅबिनेट मंत्री केले. कालांतराने काँग्रेसमधूनही ते बाहेर पडले आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रात मंत्रिपद दिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजय मिळवला.
शिवसेना सोडल्यानंतर अद्यापही राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सातत्याने आक्षेपार्ह भाषेत टीका करत असतात. नारायण राणे यांचे धाकटे पुत्र,भाजपचे आमदार नितेश राणे हे तर वादग्रस्त वक्तव्यांसाठीच ओळखले जातात. निलेश राणे यांनी 2009 मध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर विजय मिळवत दिल्ली गाठली होती. पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
निलेश राणे हे बुधवारी (23 ऑक्टोबर) शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे वैभव नाईक हे कुडाळचे आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा 47,858 मतांनी विजय झाला.
त्यात कुडाळ विधानसभा मतदारसंघातून त्यांना 27 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत येथून विजयी होण्याचा विश्वास राणे यांना वाटतो आहे. हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सुटणार, हे निश्चित होते. त्यामुळेच निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
निलेश राणे यांनी एक वर्षापूर्वी म्हणजे 24 ऑक्टोबर 2023 रोजी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. त्यावेळी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले होते, की राजकारणातून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. त्यासाठी मी आभारी आहे. भाजपसारख्या पक्षात काम करण्याची संधी मिळाली, हे माझे सुदैव आहे. काहीजण कायमचे सहकारी बनले आहेत. मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन. निवडणूक लढवण्यात आता मला कोणताही रस राहिलेला नाही.
निलेश राणे यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर राजकारणात, विशेषतः भाजपमध्ये खळबळ उडाली होती. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी मतभेद झाल्यामुळे राणे यांनी राजकीय संन्यास घेतला, अशी चर्चा होती. राणे यांच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर आले होते. त्यांनी निलेश राणे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मतभेद दूर झाले आणि अवघ्या 24 तासांत त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय मागे घेतला होता.
निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांना शासकीय कामांसाठी निधी मिळत नव्हता, पालकमंत्री चव्हाण यांच्याकडून त्यात आडकाठी आणली जाते, असा राणे यांचा आक्षेप होता. फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता आपण पक्षासाठी (भाजप) काम करत राहणार, असे निलेश राणे यांनी जाहीर केले होते. फडणवीस यांनी दिलेल्या विश्वासावर आता कामाला लागलोय, असेही ते म्हणाले होते. वर्षभरानंतर निलेश राणे यांनी आमदारकीसाठी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्याशी खुन्नस काढण्यासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
Edited by: Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.