
Mumbai News : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीपूर्वीच आता महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात मेगाभरती सुरु झाली आहे. विशेषतः महाविकास आघाडीतून मोठ्या प्रमाणात नेतेमंडळी महायुतीमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकेमकांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुका लढवलेले नेतेमंडळी आता महायुतीचे भागीदार झाले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर निवडणुका लढवताना काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे. मित्रपक्ष म्हणून एकत्र निवडणूक लढणार का एकमेकाविरोधात लढणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
विधानसभा निवडणूका पार पडल्यानंतर सध्या महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. भाजपऐवजी एकनाथ शिंदेंची शिवसेना (Shivsena) व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठया प्रमाणत प्रवेश दिले जात आहेत. त्यामुळे सध्या प्रवेशसोहळे मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. त्यासाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये चढाओढ दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिका निवडणूकावर महायुतीने लक्ष केंद्रित केले आहे.
यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडीतील माजी आमदार, माजी महापौर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक यांची मेगाभरती सुरू केली आहे. प्रवेश देत असताना महायुतीचे हित न पाहता केवळ पक्षाचे हित पाहुन प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे येत्या काळात या निमित्ताने महायुतीत (Mahayuti) वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
महायुतीतील घटक पक्षांनी आपल्या पक्षात महाविकास आघाडीतील नेतेमंडळींना प्रवेश देण्यासाठी मेगाभरती सुरू केली आहे. या मेगाभरतीमुळे महायुतीत वादाची ठिणगी पाडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला हादरे देत असताना महायुतीतील उमेदवारांच्या विरोधात ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यांनाच गळाला लावले जात आहे. त्यामुळे अडचण होत आहे.
महायुतीत आता प्रामुख्याने या ठिकाणी ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या ठिकाणी भाजप आमदार हेमंत रासने यांनी धंगेकर यांचा पराभव केला होता. आता मात्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत या दोघांची भूमिका काय असणार? याकडे लक्ष लागले आहे.
मुळशी-भोरमधील माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याठिकाणी अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर निवडून आले आहेत. त्यांनीच संग्राम थोपटे यांचा पराभव केला होता. त्यामुळे ठिकाणी काय भूमिका घेतली जाणार याकडे लक्ष लागले आहे.जळगावमध्ये गुलाबराव देवकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून देवकरांचा पराभव झाला होता. आता देवकर महायुतीत आल्याने पाटील यांची पालिका निवडणुकीत अडचण होणार आहे.
राधानगरी मतदारसंघात के. पी. पाटील यांनी शिवसेना ठाकरे गट सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. पाटील यांचा शिवसेना मंत्री प्रकाश अबिटकर यांनी पराभव केला होता. आता पाटील सत्ताधारी पक्षात आल्यामुळे आगामी निवडणुकीत अबिटकर यांच्यापुढील अडचणीत भर पडणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जशी जवळ येईल? तशी आगामी काळात अनेक दिग्गज महायुतीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती म्हणून जर शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असतील तर मोठ्या प्रमाणात वाद पाहिला मिळतील आणि याचा थेट फायदा हा महाविकास आघाडीला होणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.