Political News : राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो... याची प्रचीती पुन्हा एकदा आली आहे. राजकारणात टीका करताना शब्द जपून वापरावेत, असे त्यामुळेच सांगितले जाते. जुणे-जाणते नेते त्याचे पालन करतात. टीका करताना भाषेची मर्यादा पाळतात, सभ्यतेची मर्यादा पाळतात. भाषा आणि सभ्यतेची मर्यादा ही गेल्या पाच वर्षांत राज्यात धुळीस मिळाली आहे, सुसंस्कृत राजकारणाच्या सर्व चौकटी उद्ध्वस्त झाल्या आहेत. बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्यावर एकेकाळच्या त्यांच्याच सहकाऱ्यांनी आणि भाजप नेत्यांनी केलेली टीका पाहिली की याची जाणीव होईल.
आता या बाबींची उजळणी करण्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका दूरचित्रवाहिनीला दिलेली मुलाखत. उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) ज्यावेळी आजारी होते, त्यावेळी मी फोन करून माहिती घेत असे, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे पुत्र म्हणून मी उद्धव ठाकरे यांचा कायम सन्मान करणार, असे पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत सांगितले आहे. (Narendra Modi News)
राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नसते. कुणीही कुणाचेही विनाकारण कौतुक करत नाही किंवा आदर, सन्मान दाखवत नाही. त्यामुळे आता मोदी जे बोलत आहेत, त्याची टायमिंग महत्वाची आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नकली असे म्हटले होते. मोदींनीही प्रचारात टीकेची झोड उठवली होती. मग आता असे काय झाले, मोदींचा उद्धव ठाकरेंसाठी आता 'सॉफ्ट कॉर्नर' कशासाठी, असे प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे.
याची उत्तरे मिळवण्यासाठी क्रोनोलॉजी समजून घ्यावी लागेल, राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हेही लक्षात ठेवावे लागेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी मनावर गारूड आहे, हे मान्य करावे लागेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आपोआप महत्व प्राप्त होते. शिवसेना फोडणे किंवा फुटणे हा मराठी माणसासाठी मोठा धक्का होता.
शिवसेना फोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता, असा संदेश समाजात सर्वदूर गेला आहे. 50 खोके एकदम ओके ही घोषणा उगाच घराघरांत पोहोचलेली नाही. शिवसेना फुटली, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार नाहीत, राज्यातील भाजपच्या नेत्यांचा तो निर्णय होता, असे भाजपकडून काही नेत्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विरोधी नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणण्याचे काम भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने करत आहेत. त्यांनी प्रकरणे उघडकीस आणायची आणि संबंधित नेत्याने भाजपमध्ये प्रवेश करायचा, मग चौकशीचा ससेमिरा बंद व्हायचा, अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. याबाबत अलीकडेच काही मुलाखतींमध्ये किरीट सोमय्या यावर बोलले आहेत. हे सर्व मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार केले आहे, असे त्यांनी या काही वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींत म्हटले आहे.
आम्ही यादी तयार करायचो, त्यावर चर्चा व्हायची आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मी माझे काम करत असे, असेही किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेतील फूट असो की किरीट सोमय्यांनी बाहेर काढलेली प्रकरणे, यात मोदी यांचा काहीही संबंध नव्हता, हे बिंबवण्याचा प्रयत्न एका बाजूने सातत सुरू होता, हे लक्षात घेतले पाहिजे.
चर्चेसाठी एक दार उघडे ठेवण्याची ही रणनीती होती. शिवसेना फोडण्याचा निर्णय महाराष्ट्रातील बहुतांश नागरिकांना रुचलेला नाही. त्यामुळे त्याचे खापर मोदींवर फुटू द्यायचे नाही, याची जाणीवपूर्वक काळजी भाजपकडून घेण्यात आली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मोदी असेही म्हणाले आहेत, की उद्धव ठाकरे यांनी कितीही शिव्या दिल्या तरी मी त्यावर बोलणार नाही.
2019 नंतर राज्यातील शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये टोकाचे मनभेद निर्माण झाले आहेत. पुन्हा एकत्र यायची वेळ आली किंवा तशी गरज भासली तर राज्यातील भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चाही करू शकणार नाहीत, इतके संबंध वाईट झाले आहेत. शिवसेना फोडण्याशी, किरीट सोमय्यांच्या प्रकरणांशी केंद्रातील कोणत्याही नेत्याचा संबंध नव्हता, असे सांगण्यामागचे हेच कारण होते.
शिवसेना महाविकास आघाडीत आहे. महाविकास आघाडी देशपातळीवर इंडिया आघाडीत आहे. शिवसेना लोकसभेच्या 21 जागा लढवत आहे. शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले. उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष गेला, चिन्हही गेले. भाजपने बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राच्या हातून शिवसेना हिसकावून घेतली, बाळासाहेबांच्या पुत्राचे मुख्यमंत्रिपद घालवले, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे राज्यात उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती मिळाली. ती निवडणुकीपर्यंत टिकू नये, यासाठी भाजप आणि शिंदे गटाने शक्य तितके प्रयत्न नेटाने केले.
भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर वैयक्तिक हल्ले चढवले. उद्धव यांच्यासाठीची सहानुभूती टिकून आहे, असे आता भाजपला वाटायला लागले असेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यात भर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही भाजपने आपल्या बाजूने घेतले. ठाकरे या नावाला महाराष्ट्रात वलय आहे, पण हे वलय उद्धव या नावानंतर येणाऱ्या ठाकरेंभोवती आहे, याचीही जाणीव भाजपला झाली असेल का, असा प्रश्नही आहेच.
महाविकास आघाडी आणि महायुतीत राज्यात अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीला लोकांची सहानुभूती आहे, मात्र त्यांना 48 मतदारसंघांत उमेदवारही मिळतील की नाही, अशी शंका निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी होती. ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही शंका खोटी ठरवली. महाविकास आघाडीने सर्व मतदारसंघांत मातब्बर उमेदवार दिले आहेत. महायुतीसाठी हे अनपेक्षित चित्र आहे.
पंतप्रधान मोदी मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याबाबत जे बोलले, त्याचा आणि या निवडणुकीतील या चित्राचा काही संबंध आहे का, हे निकालानंतर लक्षात येईल. समजा महायुतीला अपय़श आलेच तर त्याचे खापर फोडण्यासाठी मोदी यांनी एक डोके तयार ठेवले आहे, असाही याचा (मोदींचे उद्धव ठाकरेंबद्दलचे वक्तव्य) अर्थ असू शकतो. शिवसेना फुटली त्याच्याशी केंद्रातील भाजप नेत्यांचा संबध नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा फटका भाजपला बसला तर त्याला जबाबदार राज्यातील नेतृत्व असणार, असे मोदींनी एकप्रकारे सांगून टाकले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली, याची जबाबदारी मोदी यांना घ्यायची नाही आहे. त्यांनी ती राज्यातील नेतृत्वावर म्हणजे अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्यावर ढकलली आहे. मात्र बाळासाहेबांची शिवसेना फुटताना, त्यांच्या पुत्राचे मुख्यमंत्रिपद जाताना मोदींनी हस्तक्षेप का केला नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. राज्यातील भाजप नेतृत्व आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेचे दरवाजे बंद झाले आहेत. शिवसेना फोडल्याची जबाबदारी मोदींनी घेतली असती तर चर्चेचे दरवाजे कायमचे बंद झाले असते. असे असले तरी शिवसेना फोडण्यात केंद्रीय नेत्यांचा सहभाग नव्हता, हे उद्धव ठाकरे आणि राज्यातील लोकांना पटणार आहे का?, हा विषय आणखी वेगळाच आहे.
भाषेची मर्यादा, पातळी सोडून सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांची आता खरी पंचाईत झाली आहे. मोदी यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाच्या एका प्रवक्त्याने, उद्धव ठाकरे भाजपसोबत आले तर त्यांचे स्वागत असेल, असे म्हटले आहे. म्हणजे मोदी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे बोलले ते कशासाठी होते, हे शिंदे गटाच्या त्या प्रवक्त्याच्या वक्तव्यावरून उघड झाले आहे.
(Edited By : sachin Waghmare)