

Nagpur News : राज्यातील विधिमंडळाचे अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात होत आहे. हे अधिवेशन आठ दिवसच चालणार आहे. राज्यातील नगरपालीका निवडणुकीवेळी सत्ताधारी महायुतीमधील पक्षाने एकमेकांवर चिखलफेक केली त्यामुळे या तीन पक्षांत दरी निर्माण झाली आहे. त्यातच आता राज्यातील राजकीय घडामोडी, कर्जमाफी व मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा असंतोष, जिल्हा परिषद व पंचायत समिती व महापालिकेच्या निवडणुकांचा दबाव या पार्श्वभूमीवर फक्त एक आठवड्याच्या कालावधीत होत असलेले या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांचा 'मास्टरप्लॅन' तयार आहे. त्यासोबतच विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा 'या' विशिष्ट दिवशी कामकाज होत असल्याने सत्ताधारी व विरोधकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून अधिवेशनानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे.
राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका गेल्याच आठवड्यात पार पडल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीमधील तीन मित्रपक्ष काही ठिकाणी एकत्र लढले तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढले. त्यामुळे काही ठिकाणी भाजप (BJP) व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते एकमेकांना भिडले. त्यामुळे आता अधिवेशनकाळात विरोधकांच्या आरोपांच्या फेरीचा सामना कशा प्रकारे करणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सत्तेत येऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने वर्षभरात केलेल्या कामांचा, घेतलेल्या निर्णयांचा लेखाजोखा घेऊन सरकार सभागृहात विरोधकांची नाकाबंदी करताना दिसणार आहे. सध्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नाही. यामुळे दुखावलेले विरोधक ताकदीने एकत्र उतरले आहेत. विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून, तसे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले आहे.
नागपुरातील हिवाळी अधिवेशन आठ दिवसांचे असले तरी या काळात राजकीय 'बॉम्ब' फुटणार आहेत. त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री संजय शिरसाठ व इतर मंत्र्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली आहे.विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाला सध्या विरोधी पक्षनेता नाही. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष नेत्याच्या शासकीय निवासस्थानी विरोधकांची बैठक होऊन अधिवेशनातील रणनीती निश्चित केली जाणार आहे.
पार्थ पवार यांच्या अमाडया कंपनीने पुण्यातील मुंढवा सरकारी जमीन कवडीमोल भावात लाटण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांनी शीतल तेजवानीला अटक केली आहे. त्यासोबतच नाशिकच्या तपोवनातील वृक्षताडीचा मुद्दा, साताऱ्याताल डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, त्यासोबतच सत्ताधारी नेत्यांवर होत असलेले आरोप अशा सर्व पाश्वभूमावर उद्या, सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे.
हिवाळी अधिवेशन काळात शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी राहणार आहेत. मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यास झालेला विलंब, माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी ३० जूनची मुदत जाहीर केली. मात्र, त्यावर विरोधक समाधानी नाहीत. कापूस आणि सोयाबीनला मिळणारा अल्प भाव, बाजारात करण्यात आलेल्या कृत्रिम दर कपातीचे आरोप,आदी मुद्दांवरून विरोधक सरकारला जाब विचारणार आहेत.
अधिवेशनानंतर राज्यात महापालिकांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांची छाप अधिवेशनावर राहील. या अधिवेशनात एकूण ११३ विधेयके मांडली जातील. त्यातील सहा अध्यादेश तर पाच नवीन विधेयके असतील, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या राज्य सरकारकडून सभागृहात सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता अधिक आहे.
विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी कामकाज होत असल्याने सत्ताधारी व विरोधकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर 2025 मध्ये शनिवार, 13 आणि रविवार, 14 डिसेंबर रोजी चालणार आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने तसेच विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत, अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासाठी आणि महत्त्वाच्या कामांना गती देण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे शासकीय सुट्टीच्या दिवशीही कामकाज होईल. त्यामुळे सलग आठ दिवस विधिमंडळाचे कामकाज सुरु राहणार आहे तर दुसरीकडे विरोधकांना रोखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विशेष 'रणनीती' आखली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.