Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाने 'शिंदेशाही'ची कोंडी, राजकीय संघर्षाला नवे वळण!

Meenakshi Shinde Trouble : माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत. पूर्णेकर हत्याकांडाची जोड त्याला मिळाली आहे
Minakshi Shinde Pradeep Purnekar murder case .jpg
Minakshi Shinde Pradeep Purnekar murder case .jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

Meenakshi Shinde News : महापालिकेच्या राजकारणात गेल्या दोन दशकांत स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत. डॅशिंग महिला राजकारणी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेली जवळीक यामुळे त्यांचा यशाचा आलेख चढता असला तरी स्थानिक पातळीवर, तसेच पक्षांतर्गत विरोधाची किनारही आहे. त्याला आता पूर्णेकर हत्याकांडाची जोड मिळाली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप उर्फ बाळा पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र यांची नावे आल्याने या राजकीय संघर्षाला गंभीर वळण मिळाले आहे. शिंदे दाम्पत्याने हे आरोप फेटाळले असले तरी भविष्यात त्यांना पोलिस चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Minakshi Shinde Pradeep Purnekar murder case .jpg
Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नाव, मीनाक्षी शिंदेंनी मौन सोडले, ठाकरे पिता-पुत्रांवर प्रहार,म्हणाल्या,...

मानपाडा परिसरातून तीनवेळा निवडून येत शिंदे यांनी ठाणे पालिकेच्या राजकारणात आपले स्थान मजबूत केले. आरोग्य सभापती, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अध्यक्षपदासह स्थायी समितीच्या कामाचा अनुभव त्यांच्या राजकीय प्रवासात जमा होत गेला. शिवसेना फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला साथ दिली. त्यामुळे शिंदे गटाच्या राजकारणातील त्यांचे स्थान कायम राहिले. राज्य पातळीवरील नेतृत्वाशी जवळीक वाढत असताना स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलत गेली.

संघर्षाची पार्श्वभूमी

पूर्णेकर आणि शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष निवडणुकीपुरता मर्यादित नव्हता. परिसरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, क्लस्टर आणि पुनर्विकासाचे प्रश्न यावरून पूर्णेकर यांनी शिंदे दाम्पत्याविरोधात भूमिका घेतली होती. मनोरमानगर परिसरातील प्रश्नांवरूनही त्यांनी आवाज उठवला होता. या मुद्द्यांवरून पूर्णेकर कुटुंबाकडून आंदोलने झाली होती.

ऑडिओ क्लिपने वाद

निवडणुकीच्या काळात मीनाक्षी शिंदे यांच्या नावाने प्रसारित झालेल्या कथित ऑडिओ क्लिपनेही वाद निर्माण केला. या क्लिपमध्ये आगरी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य असल्याचा आरोप करण्यात आला. शिंदे यांनी मात्र क्लिपशी आपला संबंध नसल्याचे सांगत ती बनावट असल्याचा दावा केला. या वादामुळे प्रभागातील राजकीय वातावरण आणखी तापले. निवडणुकीनंतरही हा वाद मिटला नाही.

शिंदे गटही अस्वस्थ

पूर्णेकर हत्याकांडामुळे ठाण्यात शिवसेना शिंदे गटही अस्वस्थ झाला आहे. हत्येनंतर परिसरातील नागरिकांचा रोष पाहून प्रत्यक्ष घटनास्थळावर जाणे शिंदे गटाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी टाळले आहे. पोलिस तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करण्याचे शिंदे गट टाळत असल्याचे दिसून आले.

Minakshi Shinde Pradeep Purnekar murder case .jpg
Pradeep Purnekar Murder: प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणात ठाकरे अन् राऊतांचे गंभीर आरोप; मीनाक्षी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com