Prakash Ambedkar News : राजकीय नेत्यांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणे आवश्यक असते. यासाठी मग त्यांना विविध क्लृप्त्या कराव्या लागतात. खळबळ माजवणारी वक्तव्ये करावी लागतात, काही भविष्यवाण्या, गौप्यस्फोटही कराव्या लागतात. भविष्यात काय होणार, हे आता लोकांनाही कळत असते, मात्र एखादा नेता तसेच बोलला की लोकांना ते आवडते. आपल्या मनात जे आहे, त्यावर नेत्याच्या बोलण्याने शिक्कामोर्तब झाले, असे लोकांना वाटते. त्यामुळे नेत्यांच्या खळबळ उडवून देणाऱ्या वक्तव्यांकडे लोकांचे सतत लक्ष असते. (Vanchit Bahujan Aaghadi)
वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हेही अशा वक्तव्यांसाठी आता ओळखले जाऊ लागले आहेत. ते परस्परविरोधी वक्तव्येही करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांतील आणि महाविकास आघाडीशी बोलणी सुरू असतानाची त्यांची वक्तव्ये पाहिली की हे लक्षात येईल. प्रसिद्धीचा झोत सतत आपल्यावर राहावा, असे आंबेडकर यांना वाटत असावे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश व्हावा, यासाठी अनेक दिवस बलणी सुरू होती.
त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केलेली विधाने लक्ष वेधून घेणारी होती. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र, वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे किमान नऊ उमेदवार पडले होते. त्यामुळे वंचितचे राजकारणातील उपद्रवमूल्य वाढले होते.
या उपद्रवमूल्याच्या जोरावरच प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीला आपल्या तालावर नाचायला भाग पाडले. बैठकीसाठीचे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या सहीचे नव्हे तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सहीचे हवे, असा हट्टही प्रकाश आंबेडकर यांनी केला. एकही खासदार नसताना केवळ उपद्रवमूल्याच्या जोरावर आंबेडकरांनी अशी भूमिका घेतली. वंचितला लोकसभेच्या 27 जागा हव्या आहेत, अशीही मागणी त्यांनी महाविकास आघाडीकडे केली होती.
वंचित बहुजन आघाडीने यावेळी महाविकास आघाडीत सहभागी व्हावे, अशी धर्मनिरपेक्ष मतदारांची मनापासूनची इच्छा होती. कार्यकर्त्यांनाही तसेच वाटत होते, मात्र ही इच्छा काही पूर्ण झाली नाही. आमची शिवसेनेची आघाडी झाली आहे, असे आंबेडकर काही दिवसांपूर्वी सांगत होते, मात्र उद्धव ठाकरे हे धर्मवादी नेते आहेत, शरद पवार संधीसाधू नेते आहेत, अशी उपरती त्यांना आता झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत ओवेसी यांचा एमआयएम हा पक्षही होती. त्यामुळे त्यांना मुस्लिम मतेही मोठ्या संख्येने मिळाली होती. प्रकाश आंबेडकर हे गेल्या निवडणुकीत सोलापूर आणि अकोला मतदारसंघांतून लढले होते. दोन्ही मतदारसंघांत ते पराभूत झाले होते. मात्र सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाला त्यांनी मोठा हातभार लावला होता.
या निवडणुकीत एमआयएम वंचितसोबत नाही. आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भाजप चारशे जागा मिळवून सत्तेत आला तर तो राज्यघटना बदलणार, असा संदेश दलित आणि मुस्लिम समुदायांत रुजला आहे. यासाठी भाजपचे ( BJP) कर्नाटकातील नेते अनंत हेगडे यांचे वक्तव्यच कारणीभूत ठरले. त्यामुळे मुस्लिम आणि दलित राज्यात महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे
अशा परिस्थितीत वंचितला गेल्या निवडणुकीइतकी तरी मते मिळतील का, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनाही पडला असावा. वंचितने महाविकास आघाडीत सहभागी व्हावे, असे दलित समाजालाही वाटत होते. याची जाणीव आंबेडकर यांनाही असणार. आता सगळा फोकस महाविकास आघाडी आणि महायुतीवर आहे. अनेक मतदारसंघांत महायुती आणि आघाडीत सरळ लढत होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रकाशझोत आपल्याकडे वळवण्यासाठी, कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी ते सतत नवनवीन दावे, गौप्यस्फोट करत आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार, उद्धव ठाकरेंचा उमेदवार त्यांची साथ सोडणार, अशी विधाने त्यांनी केली आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे - राज ठाकरे मोदींसोबत जाणार, हा प्रकाश आंबेडकर यांनी केलेला ताजा गौप्यस्फोट आहे. शरद पवार यांचे उमेदवार निवडून आल्यावर मोदींसोबत जाणार, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये जाणार, अशी वक्तव्येही प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी केलेली आहेत.
महाविकास आघाडी आणि महायुतीत संभ्रम निर्माण करणे, नेते, कार्यकर्त्यांना गोंधळात टाकणे, असा यामागे प्रकाश आंबेडकर यांचा हेतू असू शकतो. त्यांच्या अशा विधानांना माध्यमांकडून जोरदार प्रसिद्धी दिली जाते. त्यामुळे ते प्रकाशझोतात येतात, परिणामी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होतो. निवडणुकीनंतर राज आणि उद्धव ठाकरे मोदी यांच्यासोबत जाणार, असे वक्तव्य करून मुस्लिम आणि दलित मतदारांना संभ्रमात टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंबेक़डरांच्या हेतूबद्दल वारंवार शंका उपस्थित केली आहे. हे वगळता महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांबाबत आक्रमक वक्तव्ये केलेली नाहीत. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या काही उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. विधानसभा निवडणूक काँग्रेससोबत मिळून लढू, असेही ते मागे म्हणाले आहेत. मात्र सतत गौप्यस्फोट केले तर जनमाणसात त्याची विश्वासार्हता राहणार नाही, याची जाणीव अर्थाच प्रकाश आंबेडकर यांनाही असेलच.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.