Solapur, 04 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी बलाढ्य भाजप आणि त्यांच्या यंत्रणेशी टक्कर देत..... मतांनी विजय मिळविला. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत सर्व नेतेमंडळी राम सातपुते यांच्यासाठी मैदानात उतरूनही प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवित भाजपला ‘फ्लाॅवर समझा क्या...फायर हूँ..’ असे निकालातून दाखवून दिले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि भाजपचे राम सातपुते (Ram Satpute) यांच्यात तुल्यबळ लढाई झाली. मागील दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत अतिआत्मविश्वास होता. मात्र, निवडणूक जसजशी पुढे सरकू लागली तसतशी भाजपला ही निवडणूक कठीण असल्याचे जाणवू लागले. मराठा आरक्षण, कांद्याची निर्यातबंदी, पाणीप्रश्न, विमानतळाचा प्रश्न आणि सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा विषय भाजपला अडचणीत ठरला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार राम सातपुते यांचा अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तेलंगणातील आमदार टी. राजासिंह यांच्या सभा झाल्या. भाजपने सातपुते यांच्या दिमतीला बड्या नेत्यांची फौज उतरवली होती. मात्र, प्रणिती शिंदे ह्या भाजपच्या या बलाढ्य फौजेला पुरून उरल्याचे दिसून आले.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम असा मुद्दाही रेटण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी आणि एसएसटी मुद्यावर भाष्य करत सोलापूरमधील सामजिक समीकरणांचा विचार करून समतोल साधला होता. मात्र, भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून विशेषतः उमेदवार राम सातपुते, योगी आदित्यनाथ, टी. राजासिंह यांनी मात्र हिंदू-मुस्लिम मुद्यांकडे निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसकडून त्याला प्रतिसाद न देता स्थानिक मुद्यांना महत्व दिले, त्यामुळे सोलापूरची निवडणूक हिंदू-मुस्लिम आणि देशपातळीवर जाऊच शकली नाही.
प्रणिती शिंदे यांच्यासाठी राहुल गांधी, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी सभा घेतल्या. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे मागील दोन लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा अनुभवातून राजकीय रणनीती आखत होते. त्यांच्या जोडीला प्रणिती शिंदे यांच्या तरुण तुर्क टीमची साथ मिळत होती. सोशल मीडियाचा प्रणिती शिंदे यांच्याकडून टीमकडून योग्य पद्धतीने वापर करण्यात आला. त्याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे.
प्रणिती शिंदे यांनी टाकलेल्या प्रत्येक डावात भाजप फसत गेली. राम सातपुते यांना पत्र लिहिणे, बाहेरचा उमेदवार म्हणून सातपुते यांच्यावर शिक्का मारणे, विकास कामांवर खुली चर्चा करण्याचे चॅलेंज, अशी माईंडगेम प्रणिती शिंदे यांच्याकडून खेळला गेला. भाजप आपला स्वतःचा अजेंडा सोडून प्रणिती शिंदेंच्या प्रत्येक डावात फसत गेला. त्यामुळे बलाढ्य भाजपशी दोन हात करताना ‘फ्लाॅवर समझा क्या...फायर हूँ..’ असे निकालातून दाखवून दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.