धक्कादायक : मुख्यमंत्र्यांसमोरच सुरक्षा प्रमुख अन् एसपींची फ्री स्टाईल हाणामारी

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे सुरक्षा प्रमुख आणि कुलूचे पोलीस अधीक्षक यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
scuffle between Himachal Pradesh CM security and Kullu SP
scuffle between Himachal Pradesh CM security and Kullu SP
Published on: 
Updated on: 

कुलू : हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) मुख्यमंत्री जयराम ठाकूर (CM Jairam Thakur) यांचे सुरक्षा प्रमुख आणि कुलूचे (Kullu) पोलीस अधीक्षक (SP) यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना घेण्यासाठी मुख्यमंत्री विमानतळावर गेलेले असताना त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

केंद्रीय मंत्री गडकरी हे चार दिवसांच्या हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना विमानतळावर घेण्यासाठी मुख्यमंत्री जयराम ठाकूर गेले होते. त्यावेळी फोर लेन प्रकल्पांमुळे विस्थापित झालेले नागरिक विमानतळाबाहेर आंदोलन करीत होते. हे पाहून मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा प्रमुख अतिरिक्त पोलीस अधीक्षक बृजेश सूद यांनी या आंदोलनकर्त्यांबाबत कुलूचे पोलीस अधीक्षक गौरवसिंह यांना प्रश्न केला. हे आंदोलनकर्ते विमानतळाच्या परिसरात आतमध्ये कसे आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

यामुळे अधीक्षक गौरवसिंह संतापले आणि त्यांनी सूद यांच्या कानाखाली लगावली. यानंतर दोघांमध्ये जोरदार मारामारी सुरू झाली. हे पाहून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील आणखी एक अधिकारी धावत आला आणि त्याने गौरवसिंह यांना लाथ मारली. हा सर्व प्रकार पाहून इतर पोलीस कर्मचारी धावले आणी दोघांना पकडून मोटारींच्या मागे नेण्यात आले. हा सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांच्या समोरच घडला. 

हे सर्व घडत असताना आंदोलनकर्ते मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याकडे सरकरले. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. नंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा तेथे न थांबता थेट निघून गेला. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. ही चौकशी पोलीस महासंचालक संजय कुंडू यांनी पोलीस महानिरीक्षक मधूसूदन यांच्याकडे सोपवली आहे. पोलीस महासंचालकही कुलूला रवाना झाले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलाची नाचक्की झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com