
Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत पाच जण बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे दादाराव केचे वगळता भाजपचे संजय केणेकर, संदीप जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके, तर शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी हे चौघेजण ही प्रथमच विधिमंडळात गेले आहेत. त्यातच या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए असलेले संदीप जोशी व माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पीए संजय खोडके हे दोघेजण बिनविरोध आमदार झाले आहेत.
विधान परिषदेला भाजपतर्फे (BJP) उमेदवारी मिळालेले संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. त्यांचे पीए सुमित वानखेडे हे सक्रिय राजकारणात उतरल्यावर जोशी हेच फडणवीस यांच्या कार्यालयात ओएसडी म्हणून काम पाहत होते. यापूर्वी त्यांना विधान परिषद निवडणूक लढण्याची संधी मिळाली होती. पण ते पराभूत झाले होते. त्या पूर्वी नागपूरचे महापौर देखील काही काळ होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संदीप जोशी यांना संधी दिली जाईल असे वाटत होते. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. मात्र, भाजपने यावेळेस संदीप जोशी यांना विधानपरिषदेवर संधी देत बिनविरोध निवडून आणले आहे.
या पूर्वीचा इतिहास पहिला तर सुमारे 50 वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे स्वीय साहाय्यक असलेले रायभान जाधव यांना प्रथम संधी मिळाली होती. त्यांना आधी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष करण्यात आले आणि मग विधानसभेची उमेदवारी देऊन कन्नड मतदारसंघातून काँग्रेसचे आमदारही करण्यात आले होते.
जाधव यांच्या अकाली निधनानंतर पुढे त्यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव आणि मुलगा हर्षवर्धन जाधव व आता सुनबाई संजना जाधव हे आमदार झाले आहेत. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे स्वीय साहाय्यक असलेले दिलीप वळसे पाटील हे सुरुवातीला आमदार राहिले तर त्यानंतर राज्याचे मंत्री व विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडील चार पीए झाले आमदार
विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या कार्यकाळात त्यांचे पीए असलेले अभिमन्यू पवार हे देखील आमदार झाले. लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून ते 2019 साली झालेल्या निवडणुकीत विजयी झाले. 2024 साली सलग दुसऱ्यांदा ते आमदार झाले आहेत. त्यानंतर 2022 मध्ये झालेलया विधानपरिषद निवडणुकीत त्यांच्याकडे पीए असलेले श्रीकांत भारतीय यांना संधी देण्यात आली अन भारतीय हे देखील आमदार झाले.
त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातून सुमित वानखेडे यांना तयारी करण्यास सांगितली होती. त्यांच्यासाठी तेथील विद्यमान आमदार दादाराव केचे यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. या मतदारसंघातून सुमीत वानखेडे आमदार झाले. तर नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत त्यांचे स्वीय साहाय्यक असलेले संदीप जोशी आमदार झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पीए म्हणून काम करीत असलेले चारजण आतापर्यंत आमदार झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेवर निवडून आणले. तर नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पीए संजय खोडके हे बिनविरोध आमदार झाले आहेत.
स्वीय साहाय्यक ते मंत्रीपद
यापूर्वी खान्देशातील भुसावळचे आमदार संजय सावकारे हे दोन दशकांपूर्वी तत्कालीन आमदारांचे पीए होते. 2009 साली हा मतदारसंघ राखीव झाल्यावर तेथे सावकारे यांना संधी मिळाली. त्यानंतर ते सलग चारवेळा निवडून आले आहेत. आता ते भाजपकडून मंत्री झाले आहेत.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.