Marathwada Shivsena News: महायुती सरकारमधील शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार सातत्याने वादात अडकत आहेत. दोन दिवसांपूर्वी आपल्याच वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोंधळ करणाऱ्या तरुणांना सोलून काढा, फोडून काढा असे आदेश पोलिसांना देत सत्तार यांनी अक्षरशाः आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यावेळी कार्यक्रमासाठी वीस हजारांहून अधिक महिला आल्या होत्या. मग त्यांच्यासमोर गर्दीला उद्देशून त्यांच्या आई-वडिलांचा आर्वाच्य भाषेत उल्लेख सत्तार यांनी कसा केला ? असा प्रश्नही उपस्थितीत केला जात आहे.
सत्तार यांचा हा प्रकार खेद व्यक्त केल्यानंतर थांबेल असे वाटत असतांनाच काल हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यासोबत त्यांचा झालेला वाद, शिवागाळ आणि आर्वाच्य भाषेचा कथित आॅडिओ समोर आला. एकाच पक्षाच्या या दोन नेत्यांमधील संवाद ऐकल्यानंतर यासाठीच यांना निवडून दिले का? असा प्रश्न त्यांच्या मतदारांना निश्चितच पडला असेल. अब्दुल सत्तार हे कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिले. पण ही चर्चा त्यांची प्रतिमा मलिन करणारीच होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याशिवाय त्यांच्यावर विरोधकांकाडून अनेक भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. पण सत्तार यांनी त्याला कधीच महत्व दिले नाही. सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आलेले सत्तार कायम सत्तेच्या बाजूने राहिले.
मंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या उपद्रव शक्तीचा त्यांनी कायम योग्य वापर केला. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडात सहभागी होत महायुतीच्या सरकारमध्येही त्यांनी मंत्रीपद मिळवले. 25-30 वर्षाच्या आपल्या राजकीय प्रवासात सत्तार आणि पक्षनिष्ठा याचा फारसा कधी संबंध आला नाही.
काँग्रेसमध्ये असतांना अशोक चव्हाण त्यांचे गाॅडफादर होते. चव्हाणांचा शब्द सत्तार प्रमाण मानायचे. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर करताच सत्तार यांनी बंडाचे हत्यार उपसले. अगदी चव्हाण यांचेही त्यांनी ऐकले नाही, उलट झांबड यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना मदत केली. हे सत्तार यांनी स्वतः जाहीर भाषणातून सांगितले आहे.
केवळ लोकसभा, विधानसभाच नाही, तर जिल्हा बॅंक, दूध संघ, जिल्हा परिषद, नगरपरिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही सत्तेची सुत्रे आपल्या हाती असावी असा त्यांचा अट्टाहास असतो. यातून त्यांचे जिल्ह्यातील पालकमंत्री संदीपान भुमरे, हरिभाऊ बागडे, कल्याण काळे, संजय शिरसाट या नेत्यांशीही अनेकदा फाटले.
माझ्या नावात सत्तार आहे, त्यामुळे जिकडे सत्ता तिकडे मी, असंही ते अभिमानाने सांगतात. पण गेल्या काही काळातील त्यांचा वागणूक, भ्रष्टाचार, घोटाळ्यांमध्ये येत असलेले नाव आणि सामान्यांशी उर्मटपणाची वागणूक पाहता कुछ तो गडबड है, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राष्ट्रवादीची एन्ट्री झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचे कृषीमंत्री पद गेले. तेव्हापासून सत्तार मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याचे बोलले जाते. शिवाय आपला कुठल्याही पक्षासोबत कायमचा करार नसतो, तर तो प्रासंगिक असतो असंही सत्तार वांरवार सांगत आले आहेत. सध्या त्यांचा पक्षापासून वाढलेला दुरावा, मतदारसंघातील लोकांवरच राग काढतांना सुटत चाललेला संयम, आपल्या पक्षाच्या खासदारावर टक्केवारीचा आरोप करत वापरलेली भाषा पाहता सत्तार वेगळ्याच मूडमध्ये असल्याची चर्चा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तार हे शिवसेना शिंदे गटाशी असलेला प्रासंगिक करार मोडतात की काय? अशी चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे. सत्तार यांचे आतापर्यंतचे राजकारण पाहता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांना महत्व दिले गेले नाही, तर ते पक्षविरोधात बंडांचा झेंडा फडकवण्यास मागेपुढ पाहणार नाहीत. असे झाले तर विधानसभा निवडणुकीपुर्वी सत्तार पुन्हा दुसऱ्या पक्षात दिसले तर नवल वाटायला नको..
(Edited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.