Mumbai News : आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी रस्सीखेच पहावयास मिळत आहे. गेल्या चार महिन्यापासूनच दोन्ही पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. महायुती व महाविकास आघाडी स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडीत एकत्रित लढणार की स्वबळ आजमवणार? याबाबत काहीही ठरले नाही. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या ताब्यात असलेला गड खेचण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आतापासूनच प्लॅनिंग सुरु केले आहे. त्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात युवासेनेला उतरविण्याची तयारी सुरु केली आहे.
मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, आणि त्यामुळेच येथे राजकीय वर्चस्व मिळवणे कोणत्याही पक्षासाठी प्रतिष्ठेचा विषय ठरतो. आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना व भाजपमध्ये (BJP) थेट सामना पाहायला मिळणार, आणि त्यात युवासेनेची भूमिका निर्णायक ठरू शकते.
काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला होता. तर विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena) केवळ 20 जागांवर यश मिळाले होते. पण त्यातील निम्मे आमदार मुंबईतून निवडून आलेले आहेत. त्यामुळे मुंबईत आजही ठाकरेंची ताकद बऱ्यापैकी शाबूत आहे. त्या तुलनेत शिंदेसेनेची ताकद मर्यादित आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या निवडणुकीसाठी महायुती, महाविकास आघाडी एकत्रित की स्वबळावर लढणार याबाबत निर्णय झालेला नाही. तर दुसरीकडे गेल्या तीन महिन्यापासून मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् मनसे नेते राज ठाकरे यांच्या भेटीने ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा थांबल्या होत्या. मात्र, शिवसेनेच्या वर्धापनदिनानंतर पुन्हा एकदा नव्याने मनसे अन् उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना घेरण्याची तयारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केली जात आहे.
गेल्या काही दिवसापासून ठाकरे यांच्या शिवसेनेतील ४० माजी नगरसेवक शिवसेनेकडे वळवले आहेत. त्यामुळे शिंदेंची ताकद चांगलीच वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीने एकत्रित निवडणूक लढली तर शिवसेनेला निवडणुकीत यश मिळवण्याची खात्री आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोठे प्लॅनिंग केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता युवासेनेला मैदानात उतरवले आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनकडून मुंबईतील रस्ते, पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य वगैरे क्षेत्रात केलेल्या कामांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात आहे. बीएमसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर "आम्ही काम करणारे" ही प्रतिमा निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे. त्याशिवाय ‘माझं घर, माझं मत’ ही संपर्क मोहीम राबवली जात आहे. त्यामाध्यमातून घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः झोपडपट्ट्या, वसाहती, रहिवासी संघटनांशी थेट संपर्क साधला जात आहे.
त्यासोबतच येत्या काळात शिवसेना ही भाजपसोबत असल्यामुळे प्रचारासाठी साधने, कॅडर आणि निधी याचा वापर अधिक प्रभावीपणे करू शकणार आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेली निवडणूक जिंकण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनकडून प्लॅनिंग केले जात आहे.