Shivsena News : शिवसेना पक्षात जून 2022 मध्ये मोठी फूट पडली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. 40 आमदार व 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. कालांतराने धनुष्यबाण चिन्ह त्यांच्याकडेच आले. तर आमदार अपात्र झाले नाहीत. यावेळी शिवसेनेत पडलेली ही फूट अनेक नेत्यांच्या घरात आणि भावकीपर्यंत जाऊन पोहोचली. पण हा संघर्ष अजूनही संपलेला नाही. याच संघर्षाचं एक उदाहरण सध्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात बघायला मिळत आहे. गजानन कीर्तिकर व त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर या पिता-पुत्रामध्ये फूट पडली.
सुरुवातीला काही दिवस ठाकरे गटासोबत (Uddhav Thackeray) असलेले खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) फूट पडल्यानंतर उशिरा शिवसेना (Shivsena) शिंदे गटात सहभागी झाले होते. गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश करतानाच उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी इच्छूक असल्याचे सांगत हॅट्ट्रिक करण्याची संधी साधतील अशी अपेक्षा होती. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली जाणार हे निश्चित केले होते. त्यामुळे त्यांनी तयारी सुरु केली होती. (Gajanan Kirtikar News)
सुरुवातीलाच या मतदारसंघावरून गजानन कीर्तिकर व माजी मंत्री रामदास कदम यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. या ठिकाणी रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे कदम व कीर्तिकर यांच्यातील वाद शिगेला पोचल्याने अखेर मुख्यमंत्री शिंदेंना या वादात मध्यस्थी करावी लागली होती.
शिवसेना ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी अमोल कीर्तिकर यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर रिंगणात उतरतील असे चित्र होते. मात्र, निवडणुकीच्या आधी काही दिवस गजानन कीर्तिकर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेत यु टर्न घेतला होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात कोण रिंगणात उतरणार याची उत्सुकता लागली होती. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातून आलेले आमदार रवींद्र वायकर यांना शिंदे गटाने मैदानात उतरवले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळेच गजानन कीर्तिकर काहीसे नाराज झाले. ईडी चौकशी लागलेल्या रवींद्र वायकर यांना पक्षात घेऊन काय साध्य केले असा सवाल करीत त्याचवेळी कीर्तिकारांनी धारेवर धरले होते तर दुसरीकडे ऐन मतदानादिवशी गजानन कीर्तिकर यांच्या कुटंबातील मतभेद समोर आले. घरातील पत्नी, मुलगी, मुलगा यांचा विरोध असताना शिंदे गटात गेलो. मात्र, मी 9 वर्ष खासदार होतो, तेव्हा सर्व अमोल बघत होता.
त्यांची भावना होती की तुम्ही शिवसेना सोडून जाऊ नका. पण एकनाथ शिंदे हे भवितव्य घडवणारा नेता आहे म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. मी एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटणार आहे. वायकर जिंकला काय आणि हरला काय, यात माझा काय दोष. मतदार जो ठरवतो, अमोल किर्तीकर जिंकला तर मला वडील म्हणून नक्कीच आवडेल” असे गजानन किर्तीकर म्हणाले. तर मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर यांच्यासह त्यांच्या पत्नीने पक्ष विरोधी वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांची बाजू घेतली होती.
खासदार किर्तीकर यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आरोप करताना हे दोन महिन्यापूर्वीच प्रॉडक्ट असल्याचा आरोप कीर्तिकर यांनी केला. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून दोघांमध्ये चांगलीच जुंपली. लोकसभा निवडणुकीत जरी माझा मुलगा उमेदवार असला तरी मतदान करताना मी पक्षाला झुकते माप दिले असल्याचे सांगत राष्ट्रवादी , शिवसेनेत पडलेल्या फुटीचा परिणाम निकालात दिसेल, असा दावा खासदार किर्तीकर यांनी केला होता, त्यासोबतच हा वाद उफाळून आला होता.
निवडणुकीदिवशी वडिलांची उणीव नक्कीच भासते मतदान करताना अमोल किर्तीकर भावूक झाल्याचे पाहवयास मिळाले होते. शिंदे गटाचे उमेदवार असलेले आमदार रवींद्र वायकर हे महिना दोन महिन्यापूर्वीच प्रॉडक्ट आहेत. ईडीची चौकशी झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला अटक होण्याच्या भीतीने मी पक्ष बदलला. उमेदवारी घेऊन रवींद्र वायकर यांनी आपली अटक पण वाचवली आणि ईओडब्लूची केस देखील बंद करून घेतली असल्याचा खासदार कीर्तिकर म्हणाले होते.
माझा मुलगा अमोल कीर्तिकर देखील निवडणूक रिंगणात आहे. पण ना मी मुलासाठी कुठे फिरलो ना मी त्याच्या बाजूने काही बोललो. रवींद्र वायकर यांच्या आणि महत्त्वाच्या बैठकांना देखील मी उपस्थित होतो. काही ठिकाणी वयोमानुसार त्यांनी मला बोलावलं नाही आणि मी देखील गेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या सर्व प्रकारामुळे शिवसेनेतील शिदे गटातील काही नेते चांगलेच नाराज झाले. त्यांना निवडणूक निकालावर विपरीत परिणाम होतील असे वाटत आहे. त्यामुळे सर्वच जण खासदार कीर्तिकर यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहवयास मिळाले.
शिवसेना शिंदे गटात सध्या त्यांच्या पक्षाला शोभणार नाहीत, अशा काही अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या आरोपानंतर शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
त्यांच्या या आरोपांनंतर लगेचच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट खासदार कीर्तिकर यांच्यावरआरोप केले. गजानन कीर्तिकर यांचा मुंबई वायव्य मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न होता. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अंतिम क्षणी उमेदवारी मागे घेऊन ठाकरे गटाचे उमेदवार तथा त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना जिंकून आणायचा गजानन कीर्तिकर यांचा कट होता”, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
त्यानंतर शिशिर शिंदे आणि प्रवीण दरेकर यांच्या आरोपांनंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून गजनान कीर्तिकर यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. गजानन कीर्तिकर यांनी उघडपणे प्रचार केला नाही. पण ते शांत बसले होते. हे वाद जे होत आहेत त्यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गजानन कीर्तीकर यांनी एकत्र बसून हा वाद मिटवावा, असे आवाहन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
खासदार गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करा, शिंदे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. या पत्रात शिशिर शिंदे यांनी म्हटले आहे. मतदानाच्या दिवशीच गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख केला असल्याचा गंभीर आरोप केला. अमोल हे गजानन कीर्तिकर यांच्या कार्यालयातून कारभार करत होते, यामुळे ठाकरे गटाला फायदा झाला, असल्याचा आरोप शिशिर शिंदे यांनी केला आहे.
त्यामुळे आता गजानन कीर्तिकारवार काय कारवाई केली जाणार याकडे लक्ष लागले आहे. कीर्तिकर यांचे हे प्रकरण पक्षाच्या शिस्तभंग समितीकडे जाणार आहे. त्यानंतर पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावली जाण्याची शक्यता अधिक आहे. या नोटीसीला त्यानी जर समाधानकारक उत्तर दिले नाही तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असे दिसते. मात्र, तशी कारवाई करण्याचे धाडस शिंदे गट दाखवणार का ? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.