

Dharmendra Pradhan Resignation : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यापासून सुरू झालेला वाद देशव्यापी विद्यार्थी आंदोलनात बदलला. लाखो विद्यार्थ्यांच्या संतापाने उग्र रूप धारण केल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. सरन्यायाधीशांचे एक वक्तव्य संपूर्ण सरकारी व्यवस्थेला कसे भोवले, याचे उदाहरण म्हणून या आंदोलनाची चर्चा भविष्यात देखील होईल.
मे महिन्यात एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी बनावट पदव्या आणि रोजगाराशी संबंधित प्रकरणावर भाष्य करताना "कॉकरोच (झुरळे)" हा शब्द वापरला. काही युवक झुरळांसारखे असतात. त्यांना रोजगार मिळत नाही किंवा कोणत्याही व्यवसायात स्थान मिळत नाही. मग त्यांपैकी काहीजण माध्यमांमध्ये जातात, काही सोशल मीडियावर, काही आरटीआय कार्यकर्ते किंवा इतर कार्यकर्ते बनतात आणि मग सर्वांवर टीका करू लागतात."
सरन्यायाधीश पदावरील व्यक्तीने बेरोजगारीच्या प्रश्नावर जबाबदारीने वक्तव्य करणे अपेक्षित असताना 'झुरळ' म्हणून हिणवले गेले. त्या विरोधात सोशल मीडियावर (Social Media) संतापाची लाट उसळली. 'मैं हूं कॉकरोच ' म्हणत युवकांनी व्यवस्थेला भंडावून सोडण्याचे एक नवीनच आव्हान स्वीकारले. पुढे "Cockroach Janata Party (CJP)" या व्यंगात्मक मोहिमेची सुरुवात झाली. अभिजित दिपके यांचे नाव पुढे आले. फक्त ऑनलाईन सक्रिय असल्यावरून सीजेपीवर (CJP) टीका होऊ लागली. येत जात राहणाऱ्या ट्रेंड प्रमाणे हे असेल म्हणून अनेकांनी दुर्लक्ष केले.
परंतु सुरुवातीला केवळ ऑनलाइन मोहीम असलेले हे आंदोलन काही दिवसांतच देशव्यापी विद्यार्थी चळवळ बनले. नीट (NEET)सह विविध स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. दिल्लीसह कोलकाता, मुंबई, बेंगळुरू आणि इतर शहरांत मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली.
आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पेपरफुटीप्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, परीक्षा प्रणालीत व्यापक सुधारणा कराव्यात आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी त्यांची भूमिका होती. सरकारशी अनेक फेऱ्यांच्या चर्चा झाल्या; मात्र आंदोलकांनी राजीनाम्याची मागणी कायम ठेवली.
संसदेकडे मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर आणि लाठीचार्ज केला. या कारवाईत अनेक विद्यार्थी आणि पोलिस जखमी झाले. या घटनेनंतर आंदोलनाला देशभरातून अधिक पाठिंबा मिळाला आणि सरकारवर दबाव वाढला.
सततच्या आंदोलनांनंतर आणि वाढत्या राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज 25जुलैला आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे.
'CJP' आणि विद्यार्थी संघटनांनी हा राजीनामा "विद्यार्थी शक्तीचा विजय" असल्याचे म्हटले. मात्र, केवळ राजीनामा नव्हे तर परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आणि शिक्षण क्षेत्रातील व्यापक सुधारणा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.