

काबूल : तालिबानच्या दहशतीसमोर अफगाणिस्तान सरकार झुकल्याचं वृत्त आहे. तालिबान्यांनी रविवारी (ता. 15) राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले आहेत. सर्वबाजून काबूलला घेरण्यात आलं असून आता दहशतवाद्यांच्या हाती सत्ता जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सत्ता परिवर्तनाची चिन्हं असून तालिबानी सरकारसोबत चर्चा करून अफगाणिस्तान ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. (Taliban and Afghanistan govt in talks for transition of power)
मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तानवर तालिबानच्या दहशतवाद्यांनी हल्लाबोल केला आहे. एक-एक शहरावर कब्जा करत रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश करत तालिबान्यांची अफगाणिस्तानभोवतीचा विळखा आणखी घट्ट केला. त्यामुळे सत्ता परिवर्तनावर आता लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अफागणिस्तानचे गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्जकवाल यांनीही याला दुजोरा दिला आहे.
मिर्जकवाल यांनी सांगितले की, 'तालिबानकडून काबूलवर हल्ला करण्यात येणार नाही. शांततामय वातावरणात सत्ता परिवर्तन होईल. काबूलच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षादलांची आहे.' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानचे काही जण अफगाण राष्ट्रपती भवनकडे निघाले आहेत. तिथेच सत्ता परिवर्तनावर चर्चा होऊ शकते. तत्पूर्वी, तालिबान काबूलवर हल्ला करून सत्ता ताब्यात घेणार नाही, असं तालिबान्यांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
सैन्याला माफ करत आहोत
तालिबानने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालिबानच्या सैन्याला काबूलच्या सीमांवरच थांबायला सांगितले आहे. आम्ही सामान्य लोक किंवा सैन्याविरोधात बदल्याच्या भावनेतून कोणतीही कारवाई किंवा हल्ला करणार नाही. तालिबान अशा सर्वांना माफ करत आहे. तसेच सगळ्यांनी घरीच राहावे, देश सोडण्याचा प्रयत्न करू नये, अशी धमकीही देण्यात आली आहे.
दरम्यान, तालिबानने शनिवारी जलालाबादवर कब्जा केला होता. त्यानंतर काबूल हेच मोठं शहर राहिलं होतं. हे शहर तालिबान्यांच्या दहशतीपासून सुरक्षित असल्याचा दावा केला जात होता. पण तालिबान्यांनी जलालाबादवर कब्जा करत काबूलशी असलेला या शहराचा संपर्क तोडला होता. त्यानंतर जलालाबादच्या प्रशासनाने कोणताही संघर्ष न करता तालिबानसमोर शरणागती पत्करल्याचे वृत्त आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.