
Mumbai News : ठाकरे बंधूनी एकत्र येत मेळावा घेतल्याने येत्या काळात राज्यातील राजकारणात मोठया घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या निर्णयाचे पडसाद येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकावर होणार आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या संभाव्य युतीचा फायदा येत्या काळात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसे युतीला होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवण्याची तयारी आतापासूनच भाजपने केली आहे.
येत्या काळात ठाणे झेडपीवर एकहाती कमळ फुलवून सत्ता काबीज करण्याचे स्वप्न भाजप पाहत आहे. त्यामुळे येत्या काळात ठाणे झेडपीसाठी चुरस पाहवयास मिळत असून एकनाथ शिंदेंच्या विरोधात भाजपासह (BJP) दोन ठाकरे बंधूनी मोर्चेबांधणी केली आहे.
ठाणे झेडपीच्या निवडणुकीत गेल्यावेळेस एकसंध शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन करीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते. गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ भाजपकडे असून देखील त्यांना सत्तेपासून लांब राहावे लागले होते. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. यावेळेसच्या निवडणुकीत थेट राज्य सरकारकडून मदत केली जात असल्याने भाजपच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. दुसरीकडे नुकताच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा करून भाजपच्या नेत्याला पाठबळ दिले आहे.
येत्या काळात होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी गेल्या चार दिवसापासून राज्यातील राजकीय समीकरणे बदलणाया सुरुवात झाली आहे. त्यातच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ठाणे जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा आढावा घेतला. या संपूर्ण कार्यक्रमावर भाजप नेत्याचा प्रभाव दिसून आला.
ठाणे जिल्ह्यात शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर ग्रामीण भागातील शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले आहे. तर दुसरीकडे काही जण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले आहेत. जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे झेडपीवर वर्चस्व आहे. या सत्तेला सुरूंग लावण्याचे प्रयत्न भाजप व एकसंध शिवसेनकडून झाले मात्र त्यांना यश आले नाही. 2017 च्या झेडपी निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवत भाजपने सत्ता मिळवण्याची तयारी केली होती. मात्र, शिवसेनेच्या खेळीने त्यांचे मनसुब्यावर पाणी फेरले गेले होते.
2017 च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 53 जागांपैकी शिवसेनकडे 26 जागा तर भाजपला 14 जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 10 तर काँग्रेसला एक तर अपक्ष एक जागी विजयी झाला होता. अपक्ष उमेदवार भाजपच्या गोट्यातून निवडून आल्याने भाजपचे संख्याबळ 25 झाले होते. तर शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र करीत सत्ता मिळवण्याची तयारी केली होती. मात्र, दुसरीकडे शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे भाजपची संधी हुकली होती. त्यामुळे आगमी काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
ठाणे जिल्हा परिषदेमधील 66 सदस्यांपैकी 21 सदस्य भिवंडी तालुक्यातून निवडून येतात. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. त्यामध्ये 2017 निवडणुकीत शिवसेना 10, भाजप 8, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 तर काँग्रेस एक असे पक्षीय बलाबल होते. एकत्रित शिवसेनेतून निवडून आलेलया 10 पैकी 2 सदस्य शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत. चार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत तर दोन जण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत, असे असले तरी येत्या काळात ठाकरे बंधूंची युती झाल्यास या ठिकाणचे चित्र बदलून भाजप व एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला रोखू शकतात. दुसरीकडे भिवंडी शहरात 12 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्याने सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसेची पाटी कोरी आहे.
24 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढल्याने 52.68 टक्के मते मिळाली होती. शिवसेना ठाकरे गटाला 26.68 टक्के तर मनसेला 5.72 टक्के मते मिळाली होती. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काळ बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.