Uddhav Thackeray : खैरे, गीते, राऊत ठाकरेंसाठी लढले...पण हरुनही जिंकले!

Shivsena UBT Political News : पक्षाचे नाव, चिन्हही हिसकावून घेण्यात आले. अशा बिकट परिस्थितीतही उद्धव ठाकरे यांच्या तीन ज्येष्ठ निष्ठावंत शिलेदारांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात झुंज दिली, मात्र त्यांच्या पदरी अपयश पडले.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Shivsena UBT News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर मोजकेच निष्ठावंत शिलेदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. फुटीनंतर निर्माण झालेल्या संकटाच्या काळात हे निष्ठावंत उद्धव ठाकरे यांची ढाल बनले. पक्षाचे नाव हातून गेले, चिन्हही गेले... अशाही परिस्थितीत हे निष्ठावंत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमुळे या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठे यश मिळाले. या लढाईत आपली कायम पाठराखण करणारे तीन ज्येष्ठ शिलेदार मात्र विजयी होऊ शकले नाहीत, याची खंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना नक्कीच असणार.

चंद्रकांत खैरे (वय 72), अनंत गिते (वय 73) आणि विनायक राऊत (वय 70) या तिघांचा पराभव झाला. या वयातही त्यांनी उद्धव ठाकरे यांना बळ देण्यासाठी जिवाचे रान केले. पक्षाचे नाव, चिन्ह हातून निसटलेले असतानाही या तिघांनी माघार घेतली नाही. चंद्रकांत खैरे हे छत्रपती संभाजीनगरमधून, अनंत गिते रायगडमधून तर विनायक राऊत सिंधुदुर्ग -रत्नागिरी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले.

या तिघांच्याही समोर सर्वार्थाने तुल्यबळ उमेदवार होते. तरीही ते डगमगले नाहीत, निकाल काय लागेल याचा विचार केला नाही. संकटाच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचे, एवढेच त्यांना माहित होते. अन्यथा अशा बिकट परिस्थितीत अन्य कुणी असते तर त्यांनी निवडणूक लढवण्यासही नकार दिला असता.

2019 च्या निवडणुकीत मतांच्या विभागणीमुळे चंद्रकांत खैरे यांचा निसटता पराभव झाला होता. एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. या निवडणुकीतही मतविभागणीचा धोका होताच. असे असतानाही खैरे यांनी हट्टाने उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यांचा सामना एमआयएमचे इम्तियाज जलील, शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांच्याशी झाला. खैरे हे अनुसूचित जाती -जमाती, भुमरे मराठा आणि इम्तियाज हे मुस्लिम. मतांची विभागणी झाली.

राज्यभरातील मुस्लिम मतदार महाविकास आघाडीच्या पाठीमागे असल्याचे दिसत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र परिस्थिती वेगळी होती. इम्तियाज यांच्या रूपाने त्यांना तेथे कदाचित पर्याय उपलब्ध होता आणि तेथेच खैरेंची गणिते चुकली. मराठा मतदार भुमरे यांच्या मागे एकवटले आणि खैरे यांचा पराभव झाला. खैरे यांना पक्षाने खूप काही दिले आहे. संकटकाळात त्याची परतफेड करण्याची खैरेंची इच्छा अपूर्ण राहिली.

Uddhav Thackeray
Controversy in Ahmednagar BJP : देवेंद्र फडणवीसांचं 'नॅरेटिव्ह'वर भाष्य; काही वेळातच भाजपमध्ये ठिणगी अन् हकालपट्टीची मागणी...

राष्ट्रवादी काँग्रसचे (अजितदादा पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही सर्वार्थाने तगडे उमेदवार. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी अनंत गिते यांनी आधीच बाह्या सरसावल्या होत्या. त्यांनी तटकरे यांच्याशी दोन हात केले. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे उद्धव ठाकरे आणिन शरद पवार यांना राज्यभरात सहानुभूती मिळाली. ती रायगडमध्येही मिळेल, गिते यांच्या जनसंपर्काचा त्यांना फायदा होईल, असे वाटत होते, पण तसे झाले नाही. गिते यांचा पराभव झाला. मात्र त्यांनी झुंज दिली.

विनायक राऊत यांचा सामना तर एका मोठ्या शक्तीसोबत होता. ही शक्ती म्हणजे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन पुत्र आमदार नितेश राणे, निलेश राणे. शिवसेनेत असताना नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले होते. नंतर मतभेद झाले आणि राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले. तेथे त्यांचा दोनवेळा पराभव झाला. पण काँग्रेसने त्यांना मंत्री केले. तेथूनही राणे बाहेर पडले आणि भाजपवासी झाले. कोकणात राणे यांची ताकद मोठी आहे. तरीही राऊत मागे हटले नाहीत. राणेंच्या समोर ते घट्ट पाय रोवून उभे राहिले. त्यांच्याशी नामसाधर्म्य असणारा आणखी एक उमेदवार उभा करण्याची चाल खेळली गेली होती. त्याचाही फटका राऊत यांना बसला.

Uddhav Thackeray
Ajit Pawar NCP: अजित पवारांच्या आमदारांचा बैठकीत महत्वाचा निर्णय; आठवडाभरानंतर पुन्हा...

शिवसेना मुंबईच्या बाहेर हातपाय पसरू शकत नाही, ही विरोधकांची टीका कालांतराने खोटी ठरली. 39 वर्षांपूर्वी 8 जून रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये (त्यावेळचे औरंगाबाद) मराठवाड्यातील शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली होती. त्यानिमित्त चंद्रकांत खैरे यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी हे तिघेही म्हणजे चंद्रकांत खैरे यांच्यासह विनायक राऊत, अनंत गिते उपस्थित होते. हा मोठा भावनिक प्रसंग होता. तेथे उपस्थित सर्वांच्याच मनात काहूर माजले असणार. उतारवायतही तिन्ही शिलेदार आपल्यासाठी लढले, पण ते विजयी होऊ शकले नाहीत, याची हुरहूर उद्धव ठाकरे यांना नक्कीच लागून राहिली असणार.

(Edited By Deepak Kulkarni)

Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : शिंदे गटास भाजपनं तारलं ! देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय हेरलं ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com