Uddhav Thackeray News : माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर दिवसेंदिवस ठाकरेंनी सातत्यानं भाजप आणि मोदी-शाहांवर टीकेची झोड उठवली आहे. पण हेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकीकडे भाजपचा हल्लाबोल करतानाच दुसरीकडे त्यांचा संघटन फॉर्म्युला संकटात सापडलेल्या आपल्या पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी अवलंबणार असल्याचे संकेत त्यांनी स्वत:च दिले आहेत.
नाशिक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा बुधवारी(ता.16) पार पडला. या मेळाव्यात शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) टीका तर केलीच पण त्यांच्या बूथमॅनेजमेंट कौशल्यावरही भाष्य केलं. त्याची शिवसेनेत अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले,आपली निवडणुकीला सामोरे जाताना तयारी कशी पाहिजे. याविषयी सकाळी विनायक राऊतांनी बुथ मॅनेजमेंटचं मार्गदर्शन केलं.माझ्याकडे भाजप महाराष्ट्र, बुथ समिती गठनचा तपशील आहे.हे मुंबईचं आहे.आपलीही लोकं असतात हो इकडे-तिकडे. असं काही नाही की त्यांचीच लोकं आपल्याकडे असतात. त्यांच्याकडे काय चाललंय हे मला रोज कळतंय असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
तसेच भाजपनं कशी मांडणी केली हे मुद्दाम सांगतो.माझ्याकडे सर्व विभाग आहे. सर्व सांगणार नाही. नाही तर कोणी पाठवलं ते कळेल.त्यात जबाबदारीचा एक विषय आहे.हे सारं मुंबईचं आहे असंही ठाकरे म्हणाले.
भाजपाकडे एक बूथ अध्यक्ष आहे.त्याच्यापुढे त्या व्यक्तीचं नाव आणि मोबाईल नंबर आहे.नंतर बुथ सरचिटणीस आहे.त्यांचे पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर आहे. मग सदस्य आहेत. लाभार्थी प्रमुखही आहेत. लाभार्थी प्रमुखाचेही नाव आणि मोबाईल नंबर आहे. त्यांनी सदस्यांच्या रकान्यात त्यांनी दहा सदस्यांची नावे दिली आहेत. प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर, अशी त्यांची तयारी आहे. अशी तयारी आपण केली पाहिजे अशा सूचनाही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केल्या.
भाजपकडून पुढे यात एक सूचना देण्यात आलेली आहे की, 12 सदस्यांमध्ये किमान तीन महिला प्रतिनिधी असायला पाहिजे. त्यानंतर किमान एक एससी आणि एसटी प्रतिनिधी असावा. ही त्यांची मांडणी आहे. या मांडणीने ते पुढे चालले आहेत. ईव्हीएम घोटाळा आहे. तो जरूर आहे. योजनांचं गारूड नक्की आहे. पण बुथ मॅनेजमेंटचं महत्त्वही यावेळी ठाकरेंनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर अधोरेखित केलं.
आपल्या शिवसेनेच्या बुथ प्रमुख आणि पोलिंग एजंट यांनाही असंच ट्रेनिंग दिलं पाहिजे.बुथ प्रमुख हा यादीतील प्रत्येकाला नावानिशी चेहऱ्यासकट ओळखणारा पाहिजे.त्या टीममधला एक पोलिंग एजंट असला पाहिजे. असेल तर त्याला कळलं पाहिजे मतदानाला आलेला माणूस मतदानाच्या यादीतला आहे की नाही. त्याचा चेहरा जुळतोय की नाही. कार्ड बदलून फसवू शकतात पण चेहरा बदलून फसवण्याचा प्रकार अजूनतरी घडला नसल्याचंही मत उद्धव ठाकरेंनी यावेळी मांडलं.
शिवसेना पक्षफुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष विधानसभा निवडणुकीला पहिल्यांदाच सामोरे गेले असताना त्यांना निराशाजनक कामगिरी करताना अवघे 20 आमदारच निवडून आणता आले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी त्यांचे 57 आमदार निवडून आणत आपलं वर्चस्व दाखवून दिले. त्यामुळेच आता ठाकरेंनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तयारी सुरू केली आहे.
याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या निर्धार मेळाव्यात शिवसैनिकांना निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कशाप्रकारे तयारी हवी याचं वस्तुपाठच घालवून दिला. आगामी काळात जर भाजपच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षसंघटन मजबूत करतात का किंवा ठाकरेंना त्यात कितपत यश मिळतं हे पाहणं मोठं औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.