
Jagdeep Dhankhar unbeatable record : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून एनडीएच्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. एनडीएचा उमेदवार ठरल्यानंतर इंडिया आघाडीकडून आपली रणनीती निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढत चालली आहे.
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे ही निवडणूक होत आहे. ऑगस्ट 2022 पासून ते उपराष्ट्रपती होते. या निवडणुकीत त्यांनी केलेला विक्रम भाजपने कुणालाही उमेदवारी दिली तरी मोडता येणार नाही. धनखड यांच्या नावावर हा विक्रम सध्यातरी अबाधित राहणार असल्याचे संसदेतील खासदारांच्या आकडेवारी स्पष्ट आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत धनखड यांनी एकूण 725 वैध मतांपैकी तब्बल 72.8 टक्के मते मिळाली होती. धनखड यांना 528 तर मार्गारेट अल्वा यांना केवळ 182 मतदान झाले होते. 1997 नंतर पहिल्यांदाच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी उमेदवाराला एवढे मताधिक्य मिळाले होते.
के. आर. नारायणन यांनी 1992 मध्ये 701 वैध मतांपैकी 700 मते मिळवत विक्रम केला होता. हा विक्रम मोडित निघणे सध्यातरी अशक्य आहे. धनखड यांचा विक्रम दुसऱ्या क्रमांकाचा आहे. पण एनडीएचे उमेदवार म्हणून विचार केल्यास तेच वरच्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याआधीचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनाही धनखड यांच्यापेक्षा 2 टक्के मते कमी मिळाली होती.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदार असतात. भाजपकडे सध्या लोकसभेत 240 आणि राज्यसभेत 102 खासदार आहे. संसदेतील एनडीएचे संख्याबळ 457 एढे आहे. दुसरीकडे काँग्रेसकडे लोकसभेत 99 आणि राज्यसभेत 27 खासदार असून इंडिया आघाडीच्या एकूण खासदारांची संख्या 300 हून अधिक आहे.
एनडीएचा उमेदवार सहजपणे निवडून येईल, अशी स्थिती आहे. पण मताधिक्य मात्र, खूप कमी असणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी विरोधकांनीही आक्रमकपणे रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. काही पक्ष एनडीए किंवा इंडिया आघाडीतही नाहीत. त्यामध्ये वायएसआर काँग्रेस, अकाली दल, बिजू जनता दल, भारत राष्ट्र समिती आदी पक्षांचा समावेश आहे. त्यांची मते खेचण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून प्रयत्न केले जाऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.