
Shivsena UBT Vs Shinde Shivsena : एकेकाळचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते, काँग्रसचे माजी खासदार गोविंदा यांनी 28 मार्च रोजी राजकारणातील आपला दुसरा डाव सुरू केला. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. भाजपचे दिग्गज नेते, माजी केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना मुंबई उत्तर मतदारसंघातून पराभूत करून ते विजयी झाले होते.
2004 ची ती निवडणूक होती. त्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राम नाईक सक्रिय राजकारणातून बाजूला झाले होते. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात गोविंदा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाने आता शिंदे गटाला डिवचले आहे.
2004 च्या निवडणुकीत गोविंदा विजयी तर झाले, मात्र तर खासदारकीच्या काळात त्यांना उल्लेखनीय अशी कामगिरी करता आली नव्हती आणि पराभूत झालेले राम नाईक सक्रिय राजकारणातून बाजूला झाले होते. या पराभवापूर्वी राम नाईक हे या मतदारसंघातून सलग पाचवेळा विजयी झाले होते. एक निवडणूक लढवल्यानंतर गोविंदाही राजकारणातून बाजूला झाले होते.
आता शिंदे सेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणाची दुसरी इनिंग सुरू केली आहे. त्यांना उमेदवारी मिळेल किंवा नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. शिंदे गट सध्या महायुतीत आहे. त्यामुळे गोविंदा यांना शिंदे सेनेत प्रवेश देण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांना आवडला असेल का, याबाबत शंकाच आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राम नाईक यांनी चरैवेति! चरैवेति! हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यांनी गोविंदा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राम नाईक यांनी मराठीत लिहिलेले हे आत्मचरित्र आता दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे. हिंदी, इंग्रजी, उर्दू, सिंधी. पर्शियन, संस्कृत, गुजराती, अरबी आणि जर्मन भाषांमध्ये या आत्मचरित्राचे भाषांतर झाले आहे. चरैवेति! चरैवेति! म्हणजे थकू नका, चालत राहा. मला पराभूत करण्यासाठी 2004 मध्ये गोविंदा यांनी कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याची मदत घेतल्याचे या आत्मचरित्रात नाईक यांनी म्हटले आहे.
तरीही गोविंदा यांना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला आहे. उठसूठ हिंदुत्वाचा दाखला देणारे, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले, असा आरोप करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांना आपल्या पक्षात प्रवेश कसा दिला, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ शकतो.
गोविंदा यांचा शिंदे सेनेत प्रवेश झाला आणि तिकडे लागलीच ठाकरे गटाने संधी साधत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. शिंदेंनी भाजपला विचारून गोविंदा यांचा पक्षप्रवेश केलाय ना, अशी टीका करणारी पोस्ट ठाकरे गटाकडून समाजमाध्यमांत करण्यात आली आहे. या पोस्टसोबत राम नाईक यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाप्रसंगीचा फोटोही आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरून आधीच तिढा निर्माण झालेला आहे. अनेक ठिकाणी जागावाटप आणि उमेदवार निश्चिती रखडली आहे. अशा परिस्थितीत गोविंदा यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशावरून निशाणा साधण्याची संधी ठाकरे गटाला मिळाली आहे.
राम नाईक यांनी केलेला आरोप गंभीर आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार, भाजप नेते सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्व सोडले, असा या टीकेचा रोख असतो. आता गोविंदा यांना प्रवेश देऊन शिंदेसेनेने स्वतःची अडचण तर करून घेतली नाही ना, हे येत्या काही दिवसांत कळेल.
होळीच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वावरून टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी भगव्या रंगाचा त्याग केला आहे, असा त्यांच्या टीकेचा रोख होता. या टीकेला उत्तर देण्यासाठी शिंदेसेनेनेच उद्धव ठाकरे यांच्या हाती मुद्दा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात या मुद्याचा ठाकरे यांच्याकडून प्रभावी वापर केला जाण्याची शक्यता आहे.
राजकारणात सर्वच पक्षांसाठी विचारधारा वगैरे महत्वाची नसते, स्वार्थ महत्वाचा असतो, हे गोविंदा यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. राम नाईक यांना पराभूत करण्यासाठी दाऊद इब्राहीमची मदत घेणाऱ्या गोविंदा यांना प्रवेश देताना तुमचे हिंदुत्व कुठे गेले होते, असे म्हणण्याची संधी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत स्वतःच विरोधकांना उपलब्ध करून दिली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.