Nana Patole, Varsha Gaikwad, Ashok Chavan, Satej Patil Sarkarnama
ब्लॉग

Congress News : या 'तेरा' मतदारसंघात काँग्रेसला विजयाची खात्री; राज्यात डबल आकड्यात जाण्यासाठी कोअर कमिटीच्या बैठकीत ठरली विशेष रणनीती!

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Lok Sabha News : लोकसभा निवडणूक एक वर्षावर येवून ठेपली आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. कर्नाटच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने देखील या संदर्भात रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील 13 जागेवर लक्ष केंद्र केले आहे. काँग्रेसला या जागेवर विजय मिळवता येईल, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. 2019 मध्ये काँग्रेसची राज्यात केवळ एकच जागा निवडून आली होती. आता काँग्रेसने हा आकडा दोन अंकावर नेण्याचा निश्चित केला आहे. (Maharashtra Political News)

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस एका खासदारावरून दोन अंकी खासदारांच्या आकडेवारीवर पोहचण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक झाली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला गेला. काँग्रेस राज्यातील किती जागा लढवणार हे अद्याप स्पष्ट नसले, तरी पण काँग्रेस (Congress) किमान 13 जागांवर फोकस करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्यात सध्या शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी आहे. 2019 मधील निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती होती. शिवसेना 18, भाजप 23, राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 1 आणि एमआयएमचे एक आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा असे संख्याबळ आहे. काँग्रेसकडून 2024 च्या संदर्भात तयारी सुरू करण्यात आली असून प्रमुख्याने निवडून येणाऱ्या तेरा मतदार संघाची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सांगली मतदारसंघ, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, नंदुरबार, यवतमाळ वाशिम, चंद्रपूर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, नांदेड, नागपूर, रामटेक हे मतदारसंघ आहेत.

त्या मतदारसंघांचा थोडक्यात आढावा

सांगली लोकसभा मतदारसंघ

सांगली लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी पासून 2014 पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होता. विशेष म्हणजे 1980 पासून काँग्रेसकडून वसंतदादा पाटील यांच्या घरातीलच व्यक्ती लोकसभा लढवते 2019 मध्ये काँग्रेसने मतदारसंघ राजू शेट्टीच्या स्वाभिमानीला सोडला. त्यावेळी काँग्रेसचे विशाल पाटील यांनी स्वाभिमानी कडून निवडणूक लढवली होती. तब्बल 3 लाख 44 हजार मत घेतली. मात्र, त्याचवेळी गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडी कडून 3 लाख मते घेतली होती. त्यावेळी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, 5 वर्षांनी आता परिस्थिती बदलली आहे. काँग्रेसकडून यावेळी विशाल पाटील किंवा विश्वजीत कदम हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती असलेले नेतृत्व आहे. त्यामुळे काँग्रेसला या मतदारसंघात अपेक्षा आहे. काँग्रेसने आतापासूनच या मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई दक्षिण मध्य

मुंबई दक्षिण मध्य मतदार संघातून शिवसेनेचे शिंदे गटाचे राहुल शेवाळे 2014 आणि 2019 सलग दोन टर्म खासदार आहेत. त्यांनी काँग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड यांचा अडीच लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2009 मध्ये याच मतदारसंघातून एकनाथ गायकवाड खासदार म्हणून निवडून आले होते. मतदार संघातील सध्याची काँग्रेसची परिस्थिती पाहता वर्षा गायकवाड यांच्या रूपाने काँग्रेसकडे तगडा उमेदवार आहे. वर्षा गायकवाड महाविकास आघाडीच्या काळात कॅबिनेट मंत्री सुद्धा होत्या. त्याच बरोबर या मतदारसंघात असलेला 8% दलित मतदार आणि 19 टक्के मुस्लिम मतदार हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार आहे. दलित आणि मराठी चेहरा ही वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची ओळख देखील महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे येत्या 2024 च्या निवडणुकीत वर्षा गायकवाड यांच्या रूपाने काँग्रेस ही जागा खेचून आण्यासाठी रणनीती आखत आहे. काँग्रेसने त्यांना मुंबई काँग्रसचे अध्यक्ष केले आहे.

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ

मुंबई दक्षिण मतदारसंघातून ठाकरे गटाचे अरविंद सावंत 14 आणि 19 खासदार राहिले आहेत. काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी दोन्ही वेळेस सरासरी तीन लाख मते घेतलेली होती. हा मतदारसंघ उच्चभ्रू मतदारसंघांपैकी एक आहे. 2019 ला लोकसभा निवडणुकीत स्वतः मुकेश अंबानी यांनी जाहीरपणे मिलिंद देवरा यांना निवडून आणा असे म्हटले होते. मिलिंद देवरा कुटुंबीयांच्या मतदारसंघातील चांगली ताकद आहे. यासोबतच या मतदारसंघात 21% मुस्लिम मतदार आहेत. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांना पकडून विधानसभेचे दोन आणि विधान परिषदेचे दोन असे चार आमदार या मतदारसंघात असल्याने ठाकरे गट सहजासहजी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडेल का यावर प्रश्नचिन्ह आहे. जर काँग्रेसला हा मतदारसंघ सुटला तर मात्र काँग्रेसचा उमेदवार निवडून आणणे हे ठाकरे गटासाठी आणि काँग्रेससाठी महत्त्वाचे असणार आहे. जर असे झाल्यास काँग्रेसचा या मतदारसंघातील उमेदवार लोकसभेवर जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News)

नंदुरबार लोकसभा

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ 2014 पर्यंत काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. 1952 पासून सलग पणे काँग्रेसचा खासदार नंदुरबार मधून निवडून येत होता. मात्र, 2014 मध्ये यांनी सलग नऊ वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांचा पराभव झाला. काँग्रेसचा हा गड भाजपच्या ताब्यात गेला. 2019 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसकडून के. सी. पाडवी हे उभे होते. मात्र, त्यांचा देखील हिना गावित यांनी पराभव केला. लोकसभेच्या आधी ज्येष्ठ नेते आमदार अमरीश पटेल, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी आमदार माणिकराव गावित त्यांचे पुत्र दीपक पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडलेली होती. तरी देखील पाडवी यांना मतदान मिळाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत पाडवी यांना नंदुरबार मधून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यवतमाळ वाशिम मतदारसंघ

यवतमाळ-वाशिम मतदारसंघ सलग तीन वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांनी शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसने या मतदारसंघात तयारी सुरू केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेस उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी या मतदारसंघातून दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. त्यानंतर आता भावना गवळी यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे मतदार संघातली राजकीय गणित काँग्रेसच्या बाजूने फिरू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. माणिकराव ठाकरे यांना केंद्रीय पातळीवरून काँग्रेसकडून बळ मिळत असून त्यांची काँग्रेसच्या तेलंगणा प्रभारी पदी निवड झाली आहे.

मतदारसंघातल्या काँग्रेसचे मोठे नेते शिवाजीराव मोघे यांची अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष पदी निवड झाल्याने ते देखील पुन्हा एकदा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. माणिकराव ठाकरे यांना मिळणारी कुणबी समाजाचे मते तसेच काँग्रेसचा पारंपारिक मतदार असलेला 15% दलित मतदार आणि शिवाजीराव मोघे यांच्यामुळे काँग्रेसकडे वळणारा राळेगाव आदिवासी पट्ट्यातला 13 टक्के आदिवासी मतदार या सगळ्या समीकरणामुळे काँग्रेस उमेदवार म्हणून माणिकराव ठाकरे पुन्हा एकदा प्रभावी उमेदवार ठरतील असे म्हटले जात आहे. (Maharashtra Political News)

ठाकरे गटाला विधानसभेच्या जागा सोडून लोकसभेच्या जागेची काँग्रेस सेटलमेंट करू शकते, असाही अंदाज ठाकरे गटात गेलेले बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज, माजी मंत्री सुनील देशमुख यांची साथ देखील माणिकराव ठाकरे यांना मिळू शकते. त्यामुळे सध्या यवतमाळ मतदार संघांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात एकही काँग्रेस आमदार नसला तरी देखील 2024 मध्ये या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार लोकसभेवर निवडून येण्याची शक्यता असल्याचे काँग्रेसला वाटते.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. 2004 ते 2014 पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसकडून हंसराज अहिर हे सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते. यूपीएच्या सरकार असताना हंसराज अहिर हे मंत्रिमंडळात देखील होते. हंसराज अहिरे यांनी 2019 मध्ये भाजपकडून निवडणूक लढवली होती. यावेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर यांनी हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार म्हणून ते निवडून आले होते.

बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर या मतदारसंघात समीकरण बदलले आहेत. मतदारांची सहानुभूती मिळण्याची आशा या मतदारसंघात असल्याने काँग्रेसने आशा आहे. आमदार विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे खासदार बाळू धानोरकर होते. त्यामुळे या नेत्यांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच भाजपकडून या मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार किंवा हंसराज अहिर या दोघांपैकी एक तुल्यबळ उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

कोल्हापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. 2014 मध्ये राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या विजयात काँग्रेसच्या सतेज पाटलांचा वाटा मोठा होता. तसेच 2019 शिवसेनेचे संजय मंडलिके निवडून आले तरीदेखील आमचे ठरल्याच्या माध्यमातून सतेज पाटीलनी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. आजवर ही जागा राष्ट्रवादीने लढवली असली तरी देखील यंदा या जागेवरती काँग्रेसचा उमेदवार असावा यासाठी सतेज पाटील यांनी जोर लावला आहे. सतेज पाटील, पी. एन. पाटील दोघे कोल्हापूरमध्ये सहापैकी तीन आमदार हे काँग्रेसचे आहेत. त्यामुळे लोकसभेचा उमेदवार कोण असेल यावरती अजून शिक्कामार्ग झाले नसले तरी काँग्रेसला ही जागा मिळवून देण्यासाठी सतेज पाटील हे आग्रही आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ

सोलापूरचा लोकसभा मतदारसंघ 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे जय सिद्धेश्वर स्वामींनी पाच लाख 24 हजार 985 मध्ये घेतली. तर काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंनी तीन लाख 66 हजार 377 मते मिळवली. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 1 लाख 70 हजार इतकी मते घेतली होती. त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला असे बोलले गेले. 2024 ला जर महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना अकोल्याची जागा दिली आणि सोलापूरची जागा काँग्रेसकडे आली तर सोलापूर काँग्रेस जिंकू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघ

अमरावती लोकसभा मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र, 2009 ते 2014 मध्ये शिवसेना आणि 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंबावर तिथे अपक्ष उमेदवार असलेल्या नवनीत राणा निवडून आल्या होत्या. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात भाजपास पाठिंबा दिला. सध्या 2024 मध्ये अमरावतीवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे तीन आमदार आहेत. त्यामुळे बाकी कोणत्याही मोठ्या पक्षाची ताकद नसणारा अमरावती हा आम्हालाच मिळावा असे काँग्रेसकडून म्हटले जात आहे.

काँग्रेसकडून दर्यापूरचे बळवंत वानखेडे यांना तिकीट मिळेल असा अंदाज आहे. अमरावतीमध्ये भाजप आणि सेने पुढे मोठी अडचण असणार आहे, ती उमेदवारी देण्याची. त्यामुळे शिंदे आणि भाजपमध्ये असणाऱ्या शिक्षकांच्या गर्दीचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. वीरेंद्र जगताप यांच्यावरती देईल तो उमेदवार निवडून आणण्याची प्रमुख अशी जबाबदारी असणार आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघ

नांदेड लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसला होता. या मतदारसंघात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला होता. 2019 मध्ये नांदेड मधून भाजप कडून प्रतापराव चिखलीकर निवडणून आले. अशोक चव्हाण यांचा चिखलीकर यांनी 40000 मतांनी पराभव केला होता. काँग्रेसची जागा इथे जाण्याला वंचिता उमेदवार सगळ्यात जास्त कारणीभूत ठरला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल ढेंगे यांना 1 लाख 66 हजार 196 मते मिळाली होती.

परंपरागत काँग्रेसला मिळायची ही वंचित बहुजन आघाडीला मिळाल्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला होता. आता या मतदारसंघात अशोक चव्हाण यांना तिकीट देण्यात येणार नसल्याची चर्चा आहे. तसेच नांदेड मतदार संघातून भास्करराव पाटील हातगावकरांच्या सून स्नेहल हातगावकर या निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. हा उमेदवार निवड आणण्यात अशोक चव्हाण ताकद लावणार, अशी एकंदरीत काँग्रेसची रणनीती आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघ

नागपूर म्हणजे भाजपचा बालेकिल्लाला संघाच्या कार्यालयामुळे भाजपसाठी नागपूरचे स्थान फार मोठे आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे मोठे नेते नागपुरातून येतात. 2014 आणि 2019 ला नितीन गडकरी खासदार झाले. मात्र, इथे दुसऱ्या क्रमांकावर नाना पटोले (Nana Patole) यांनी 4 लाख 44 हजार मते मिळवली होती. दुसरीकडे नागपूर पदवीधर मतदारसंघात मिळालेले विजय काँग्रेससाठी जमेची बाजू करण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये सध्या काँग्रेस दोन आणि भाजपचे चार आमदार आहेत. जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे गेली तर नितीन राऊत, विजय वडेट्टीवार यासारखे नेते आहेत. काँग्रेसमधील गटबाजी शांत करून एक सक्षम असा उमेदवार देण्यात आला तर काँग्रेसच्या उमेदवाराल चांगली मते मिळू शकतात.

रामटेक लोकसभा मतदारसंघ

रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांनी 2009 मध्ये लोकसभा निवडणूक लढवत काँग्रेससाठी रामटेकची जागा जिंकलेली होती. त्यामुळे त्यांचे नाव प्रामुख्याने पुढे येतेय दुसरीकडे काँग्रेसकडून किशोर गजभिये यांचे नाव देखील चर्चेत आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून निवडून आलेले आणि आता शिंदे गटात गेलेले खासदार कृपाल तुमारे यांना 5 लाख 97 हजारांच्या आसपास तर गजभिये यांना 4 लाख 70 हजार 343 मतदान मिळाली होती. या मतदारसंघात सुनील केदार, अनिल देशमुख या दोन्ही नेत्यांचे नाव या मतदारसंघात येत असल्याने महाविकास आघाडीच्या पथ्यावर आहे. शिंदे गटाकडून पुन्हा विद्यमान खासदार कृपाल तुमारे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघ

लातूर लोकसभासभा मतदारसंघची रचना पाहिली, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी ही सगळ्यात सोपी आहे. या मतदारसंघातील सहा विधानसभेपैकी दोन राष्ट्रवादीचे आणि दोन काँग्रेसचे असे चार आमदार महाविकास आघाडीचे आहेत. काँग्रेसला सुद्धा इथे सक्षम उमेदवार शोधावा लागणार आहे. 24 मध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आणणे हे देशमुख बंधूंसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे असणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT