Kalpana Narhire  Sarkarnama
ब्लॉग

Kalpana Narhire: पाणीवाल्या बाई ते आमदार-खासदार

Sachin Waghmare

Political News : एक साधा, निष्ठावंत शिवसेना कार्यकर्ता बाळासाहेबांच्या आवाहनाने झपाटून उठतो. बाळासाहेबांचे स्वप्न साकारण्यासाठी गळ्यात भगवे उपरणे घालून शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या सैनिकांच्या फौजेतला एक शिवसैनिक होतो. साधा टपरी चालक, जीप चालविणारा चालक व सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले अनेक निष्ठावंत मंडळी १९९५ च्या लाटेत शिवसेनेकडून पहिल्यांदा निवडून येत आमदार झाले. त्याच पंक्तीत एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या व कसलीच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील कल्पना नरहिरे यांचे नाव मात्र कायम घेतले जाईल. कळंबच्या दोन वेळा आमदार व एक वेळा धाराशिवच्या खासदार राहिलेल्या कल्पना नरहिरे त्यांनी त्यांच्या कामातून कमावलेली 'पाणीवाली बाई' ही उपाधी मात्र कोणीच विसरू शकणार नाही. त्यांच्याबद्दल यानिमित्ताने थोडेसे...

कल्पना नरहिरे यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९६९ मध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. कसलीच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून त्या पुढे आल्या. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्या सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून संघटनेचे काम करीत होत्या. मात्र, १९९५ च्या निवडणुकीत त्यांच्या ध्यानी-मनी नसताना शिवसेनेने त्यांना कळंब राखीव मतदारसंघातून संधी दिली अन् त्यांनी या मिळालेल्या संधीचे सोने करताना मराठवाड्यातून पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदार ठरल्या.

मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार

शिवसेनेच्या तिकिटावर कळंबच्या दोन वेळा आमदार व एक वेळा धाराशिवच्या खासदार झालेल्या कल्पना नरहिरे यांचा राजकीय प्रवास रंजक असाच आहे. राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांना शिवसेनेने १९९५ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची उमेदवारी दिली. विशेष म्हणजे त्या पहिल्याच निवडणुकीत कळंब-वाशी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या मराठवाड्यातील पहिल्या आमदार झाल्या.

शिवसैनिकांच्या प्रयत्नांतून झाल्या आमदार

१९९५ मध्ये कळंब विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव होता. त्या ठिकाणी शिवसेनेने सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या व शिवसेनेचे काम निष्ठेने करीत असलेल्या कल्पना नरहिरे यांना उमेदवारी देत विश्वास दाखविला. हा विश्वास सार्थ ठरविताना पहिल्यांदाच आमदारकीची निवडणूक लढविताना न डगमगता त्यांनी प्रचार केला. तत्कालीन दिवंगत नेते व जिल्हाप्रमुख नरसिंह जाधव यांनी दिलेल्या साथीच्या जोरावर त्यांनी या निवडणुकीत बाजी मारली.

वडिलांचा केला होता पराभव

कळंब विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविताना त्यांनी तत्कालीन शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा आमदार कुंडलिक घोडके यांचा पराभव केला होता. त्याशिवाय या निवडणुकीत काँग्रेसने त्यांचे वडील त्र्यंबक नरहिरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्या तसूभरही मागे हटल्या नाहीत, त्या न डगमगता लढल्या. या अटीतटीच्या तिरंगी निवडणुकीत त्यांनी एकीकडे वडील व विद्यमान शेकापच्या आमदाराला धूळ चारली होती.

दुष्काळ हटवण्यासाठी विविध योजना

दरवर्षी दुष्काळ पाचवीला पूजलेला अशी कळंब तालुक्याची ओळख होती. विशेषतः मांजरा नदीच्या काटावर वसलेला तालुका असतानाही मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा बसत होत्या. त्या पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर योगायोगाने राज्यात शिवसेना-भाजप युतीचे पहिल्यांदा सरकार आले होते. त्याचा फायदा त्यांना झाला. त्यांनी कळंब तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी विविध योजना आणल्या होत्या. कळंब तालुक्याची दुष्काळी तालुका अशी असलेली ओळख पुसण्याचा प्रयत्न आमदार कल्पना नरहिरे (Kalpana Narhire) यांनी त्यांच्या कारकिर्दीत केला.

'पाणीवाल्या बाई' अशी वेगळी ओळख कायम

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी (manohar joshi) यांच्याकडे सतत पाठपुरावा करून आमदार कल्पना नरहिरे यांनी कळंब, वाशी तालुक्यातील अनेक गावांत कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना आणल्या होत्या. विशेषतः वाशी गाव व तालुक्यातील अनेक गावांना सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्यांनी या पाणीपुरवठा योजनांसाठी कायमस्वरूपी प्रयत्न केले. त्या माध्यमातून सर्व गावांना त्यांच्या कारकिर्दीत पाणी मिळाले. त्यामुळे कल्पना नरहिरे यांचे आजही नाव निघते. पाणीवाल्या बाई अशी त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यासोबतच मतदारसंघात त्यांनी गाव तिथे सभागृह बांधले होते. त्यामुळे आजही ही सभागृहे पाहिली, की त्यांनी केलेल्या कामाची आठवण होते.

महिलांसाठी ठरल्या आधार

अडीअडचणीच्या काळात त्या मतदारसंघातील प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत होत्या. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या अडचणी त्या सोडवत होत्या. त्यामुळे जनतेच्या मदतीला धावून त्या नेहमीच येत होत्या. त्यामुळे महिलांचा आधार असलेल्या कल्पनाताई अशी त्यांची काही जण वेगळी ओळख आजही सांगतात. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास जनतेला सोबत घेऊन होता, हे स्पष्ट होते.

वाशी तालुक्याची केली निर्मिती

तत्कालीन युती सरकारच्या कारकिर्दीत नवीन तालुका निर्मितीची चर्चा सुरू होती. त्यावेळी धाराशिव जिल्ह्यातील वाशीची अनेक दिवसांपासून तालुका निर्मितीची मागणी होती. त्यासाठी नागरिकांनी अनेक वेळा जनआंदोलन केले होते. त्याची जाणीव ठेवून आमदार नरहिरे यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडे कळंब व वाशी तालुक्यातील गावे जोडून वाशी तालुका निर्मितीचा प्रस्ताव दिला होता. १ मे १९९९ ला युती सरकारने राज्यात २८ नवीन तालुके निर्माण केले. त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील वाशी व लोहारा तालुक्यांची निर्मिती केली होती. वाशी तालुक्याच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता, हे विशेष.

दुसऱ्यांदा झाल्या कळंबच्या आमदार

आमदार नरहिरे यांची काम, चिकाटी आणि जनसंपर्क लक्षात घेऊन शिवसेनेने त्यांना पुन्हा एकदा म्हणजे १९९९च्या विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरविले होते. कळंब मतदारसंघातील जनतेने त्यांना पाच वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या कामाची पोचपावती देताना पुन्हा निवडून दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सभागृहात पार पाडली जबाबदारी

विधानसभेच्या सभागृहात त्या दोन वेळा आमदार होत्या. या काळात त्यांनी गावागावांत विविध योजना राबविल्या. कळंब तालुक्यातील जनतेप्रमाणेच पक्षाचाही त्यांच्यावरचा विश्वास दृढ झाला. त्यांची विधानसभेच्या सभागृहात प्रश्न मांडण्याची पद्धत, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या कायम तत्पर असत. एक महिला लोकप्रतिनिधी असतानाही त्यांची ही धडपड वाखाणण्याजोगी होती.

धाराशिव लोकसभेसाठी मिळाली संधी

धाराशिव लोकसभा मतदारसंघ राखीव असल्याने या मतदारसंघातून २००४ मध्ये शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी दिली. शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackrey) यांनी दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला. त्यावेळी कुठलीही लाट नसताना पक्षनिष्ठा आणि शिवसैनिकांचा भक्कम पाठिंबा असल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कळंब तालुक्याने त्यांना भरघोस मते दिली. त्याशिवाय संपूर्ण जिल्ह्याने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करीत त्यांना निवडून दिले.

पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना दाखवले अस्मान

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून २००४ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना मैदानात उतरवले होते. मात्र, त्या काळी लक्ष्मण ढोबळे यांनी उजनीचे पाणी मराठवाड्याला दिल्यास रक्ताचे पाठ होतील, असे वक्त्यव केले होते. त्यासोबतच प्रचारात त्यांचा दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवार या मुद्द्यांमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

दिल्लीच्या वर्तुळात निर्माण केली वेगळी ओळख

महाराष्ट्रातील दिग्गज नेते व पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा पराभव करून आल्याने त्यांची दिल्लीत वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्याशिवाय ग्रामीण भागातील जनतेची व महिलांच्या प्रश्न त्या लोकसभेच्या सभागृहात मांडत होत्या. प्रश्न मांडण्याची पद्धत व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असलेली त्यांची बांधिलकी पाहता, त्यांनी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

जनमाणसात वेगळा ठसा

लोकप्रतिनिधी पदाच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळामध्ये कल्पना नरहिरे यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. त्यात धनेगाव ते कळंब २९ कोटी रुपयांची कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना, वाशी शहरासाठी पाणीपुरवठा योजना, गाव तिथे सभागृह, कळंब तालुक्यात सहा गाव पाणीपुरवठा योजना, लाखा रोडवरील मांजरा नदीच्या पात्रावरील मोठा पूल, विविध गावांतील मुख्य रस्ते यासह विविध कामे करून त्यांनी जनमाणसांत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

मुलांच्या शिक्षणाकडे दिले लक्ष

कल्पना नरहिरे राजकारणातून काही काळ ब्रेक घेतल्यानंतर अलिप्त झाल्या होत्या. त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. त्यानुसार त्या २०१० नंतर मुंबई येथे मुलांच्या शिक्षणासाठी वास्तव्याला गेल्या होत्या. मुलगी नेहा व मुलगा नीरज याचे इंजिनअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सध्या त्या गृहिणीच्या भूमिकेत आहेत.

कार्यकर्त्यांशी संपर्क कायम

मधल्या काळात खासदारकीची टर्म संपल्यानंतर त्या थोड्या राजकारणातून बाहेर पडल्या होत्या. २०१० नंतर त्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी काही काळ मुंबईत वास्तव्याला होत्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वरवर त्यांचा जनतेशी संपर्क कमी दिसत होता. मात्र, शिवसेनेतील संघटनात्मकदृष्ट्या त्यांचा प्रत्येकाशी संबंध राहिला, त्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क कायम आहे.

केजमधून लढवली होती निवडणूक

२०१४ मध्ये अचानक शिवसेना-भाजपची विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटली. त्यावेळी केज राखीव मतदारसंघातून शिवसेनेकडे लढण्यासाठी उमेदवार नव्हता. त्यामुळे दोन वेळा आमदार व एक वेळा खासदार राहिलेल्या कल्पना नरहिरे यांनी निवडणुकीत कधीच पराभव स्वीकारला नव्हता. त्यामुळे त्यांनी केज मतदारसंघातून अचानक विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT