Sarkarnama Podcast : Sarkarnama
ब्लॉग

Sarkarnama Podcast : तुरुंगात साखरपुडा झालेला मुख्यमंत्री

अय्यूब कादरी

Sarkarama Podcast : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर बडव्यांच्या ताब्यातून मुक्त करणे, मुलींना दहावीपर्यंत मोफत शिक्षण आदी महत्त्वाचे निर्णय कोणत्या मुख्यमंत्र्यांनी घेतले, याची माहिती नव्या पिढीतील बहुतांश जणांना नसावी. २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ अशा अल्पकाळासाठी मुख्यमंत्रिपदावर राहिलेले बाबासाहेब भोसले यांनी हे निर्णय घेतले होते. स्वातंत्र्यलढ्यातही ते सहभागी होते.

तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांना कथित सिमेंट घोटाळ्यात सहभागाच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला होता. काँग्रेसमधील दिग्गज नेते मुख्यमंत्रिपदासाठी रांगेत असताना त्यांना डावलून बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री करण्याचा धक्कादायक निर्णय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना घेतला होता. मुख्यमंत्री मराठा समाजातीलच करायचा होता, मात्र तो जनाधार असलेला नसावा, पक्षश्रेष्ठींच्या या भूमिकेतून बाबासाहेब भोसले यांची आश्चर्यकारकरित्या निवड झाली होती. स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतल्यामुळे बाबासाहेब भोसले यांना तुरुंगवास झाला होता. त्यावेळी तुरुंगातच त्यांचा साखरपुडा झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बॅ. ए. आर. अंतुले यांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द खूप गाजली होती. त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यातूनच त्यांचे पक्षांतर्गत विरोधक तयार झाले. कथित सिमेंट घोटाळ्यात त्यांचं नाव आलं आणि मग त्यांना खुर्ची सोडावी लागली. त्यांच्यानंतर वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. त्यांना महाराष्ट्राची खडान् खडा माहिती होती, जवळपास प्रत्येक गावात त्यांचे कार्यकर्ते होते. त्यामुळे ते पक्षश्रेष्ठींच्या कह्यात राहतील, याची सुतराम शक्यता नव्हती. आणीबाणी उठल्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला होता. इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या होत्या. त्यामुळे सर्व मुख्यमंत्री आपल्या ऐकण्यातील असावेत, याची काळजी त्या घेत होत्या.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा समाजातीलच करायचा होता, मात्र तो जनाधार नसलेला नेता नसेल, याचीही खबरदारी इंदिरा गांधींनी घेतली होती. शिवाय बाबासाहेब भोसले हे स्वातंत्र्यसेनानी तुळशीदास जाधव यांचे जावई होते. काँग्रेसमधील काही लोकांनाही वसंतदादा नको होते. बाबासाहेब भोसले आपल्या कह्यात राहतील, असं त्यांना वाटायचं. या सर्व घडामोडींमुळं वसंतदादा पाटील यांचं नाव मागं पडलं आणि पर्याय म्हणून बाबासाहेब भोसले यांचं नाव समोर आलं. बाबासाहेब भोसले हे उच्चविद्याविभूषित होते. त्यांनी लंडन येथील बार अॅट लाॅ ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. म्हणजेच ते बॅरिस्टर होते. मात्र, ते मास लीडर नव्हते. पक्षातील आमदारांवरही त्यांची तितकीशी पकड नव्हती, हे नंतर सिद्ध झालं.

बाबासाहेब भोसले यांचा जन्म १५ जानेवारी १९२१ रोजी सातारा जिल्ह्यातील तारळे येथे झाला. कोल्हापूरच्या शहाजी लॉ कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. १९५१ मध्ये त्यांनी लंडन येथे बार-अॅट-लॉ परीक्षा उत्तीर्ण केली. तेथून परतल्यानंतर पुढची जवळपास दहा वर्षे त्यांनी वकिली केली. नंतर ते मुले, पत्नी यांच्यासह मुंबईत राहायला आले. तेथे त्यांनी उच्च न्यायालयात वकिली सुरू केली.

१९७८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या उमेदवारीवर विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, मुंबईतील नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातून ते पराभूत झाले. १९८० मध्ये पुन्हा ते याच मतदारसंघातून लढले आणि विजयी झाले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं. बॅ. ए. आऱ. अंतुले यांच्या सरकारमध्ये त्यांना कायदा, न्यायव्यवस्था, श्रम, मराठी भाषा, वाहतूक, फलोत्पादन या खात्यांचे कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. पहिल्या कार्यकाळात ते मंत्री आणि नंतर मुख्यमंत्रीही बनले.

बाबासाहेब भोसले यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. ते सत्यशोधक चळवळीत होते. बाबासाहेबांनी वडिलांचा हा वारसा पुढे सुरू ठेवला. अर्थात बाबासाहेब भोसले अभ्यासात हुशार होते. त्यामुळे तुळशीदास जाधव यांचे प्रिय शिष्य झाले. त्यांनी आपली कन्या कलावती हिचे लग्न बाबासाहेब भोसले यांच्याशी १९४५ मध्ये गांधीवादी पद्धतीनं केलं. तत्पूर्वी, त्यांचा साखरपुडा तुरुंगात झाला होता.

१९४० शतकात बाबासाहेब भोसले यांना सातारा, कोल्हापूर, सांगली या भागात भूमिगत राहून काम केलं होत. त्यांच्यावर इंग्रजांची नजर पडली. त्यांची खासगी मालमत्ता जप्त केली गेली. भारत छोडो चळवळीतच बाबासाहेब भोसलेंना दीड वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. तुळशीदास जाधव हे येरवडा तुरुंगात होते. कन्येचा साखरपुडा आपल्या डोळ्यांसमोर व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार बाबासाहेब आणि कलावती यांचा साखरपुडा तुरुंग अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली येरवडा कारागृहात झाला होता. १९४७ मध्ये त्यांनी 'काँग्रेसचा इतिहास' हे पुस्तक लिहिले.

स्वातंत्र्यानंतर तुळशीदास जाधव यांनी काँग्रेस सोडली. केशवराव जेधे, शंकरराव मोरे यांच्यासोबत मिळून त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. पुढे काही वर्षांनंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परत आले. मराठवाड्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. ते विजयी झाली. तोपर्यंत उच्च न्यायालयात व्यवस्थित सुरू असलेली वकिली सोडून बाबासाहेब भोसले राजकारणात सक्रिय झाले होते. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याचे ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. सातारा जिल्हा काँग्रेसचे कोशाध्यक्षही बनले. नंतर १९७८ मध्ये ते काँग्रेसचे प्रदेश सचिव झाले. त्याचवर्षी त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली होती.

दुसऱ्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अंतुलेंच्या सरकारमध्ये ते कायदामंत्री बनले. अंतुले यांच्या कारभारावर पक्षातील काही नेते नाराज होते, पण त्यांचे काम धडाक्यात सुरू असल्याने पक्षांतर्गत विरोधक शांत होते. कथित सिमेंट घोटाळ्यात अंतुले यांचे नाव आले, माध्यमांनी त्यांच्या विरोधात मोहीमच उघडली. त्यानंतर मात्र पक्षांतर्गत विरोधाने उचल खाल्ली आणि अंतुले यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. सर्वात प्रबळ दावेदार वसंतदादा पाटील हेच होते. आणीबाणीच्या पराभवानंतर परत सत्तेत आलेल्या इंदिरा गांधी यांनी सर्व राज्यांत आपल्या मर्जीतील लोकांना मुख्यमंत्रिपद दिलं होतं. त्यांच्या मेहेरबानीने मुख्यमंत्री झालेल्यांना फारसा जनाधार नव्हता.

वसंतदादा पाटील यांचा मात्र राज्यात मोठा जनाधार होता. राज्यातील काँग्रेसमध्ये ते सर्वात शक्तिशाली नेते होते. इंदिरा गांधींनी त्यांना डावलून अंतुले यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. अंतुले गेल्यामुळे वसंतदादा पाटील यांचे नाव पुन्हा चर्चेत आले. मात्र, इंदिरा गांधींनी या वेळी तर मोठाच धक्का दिला. त्यांनी वसंतदादांसह प्रतिभाताई पाटील आणि इतरांना डावलून मुख्यमंत्रिपदाची माळ बाबासाहेब भोसलेंच्या गळ्यात घातली. वसंतदादा, प्रतिभाताई यांनी दिल्लीत तळ ठोकला होता, पण त्यांची निराशा झाली.

दरम्यान, आपले जावई पुढील मंत्रिमंडळात असतील की नाही, याची काळजी तुळशीदास जाधव यांना लागली होती. अंतुलेंवर सर्वांचा राग होता. अंतुले यांचे जवळचे म्हणून बाबासाहेब भोसले यांना डावलले जाईल, या भीतीपोटी तुळशीदास जाधव यांनी दिल्ली गाठून मोठ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. काहीही करा, पण बाबासाहेबांना पुढील मंत्रिमंडळात स्थान द्या, अशी विनंती त्यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडे केली.

दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्यांची घोषणा होणार होती. राज्याचे प्रभारी जी. के. मूपनार इंदिरा गांधींच्या भेटीला गेले. काँग्रेस कार्यालयात तुळशीदास जाधवही होते. इंदिरा गांधींना भेटून मूपनार परत आले आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी बाबासाहेब भोसले यांचं नाव जाहीर केलं. जावयाचे मंत्रिमंडळात स्थान कायम राहिल की नाही, अशी चिंता असलेल्या तुळशीदास जाधव यांनाही त्यावेळी आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांनी असा विचार स्वप्नातही केला नसावा. दिल्लीचे पत्रकारही आश्चर्यचकित झाले होते.

कारण बाबासाहेब भोसले यांचे नाव त्यांच्यासाठी अपरिचित होते. जातीची समीकरणे सांभाळण्यासाठी इंदिरा गांधी यांना मराठाच मुख्यमंत्री करायचा होता. मात्र, वसंतदादा पाटील जड होतील, अशी शंका त्यांना होती. शिवाय बाबासाहेब भोसले यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सहभाग ही त्यांची जमेची बाजू ठरली. आपल्या शब्दांत राहील असा माणूस मुख्यमंत्री पदावर राहील, याची काळजी पायउतार होताना अंतुले यांनीही घेतली होती.

बाबासाहेब भोसले यांची मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ वर्षभराचा राहिला. त्यांनी घेतलेल्या निर्णयांएेवजी त्यांनी केलेल्या कोट्या लोकांच्या अधिक लक्षात राहिल्या. आधी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घ्यायची, त्यानंतर शपथविधी अशी पद्धत होती. मात्र, बाबासाहेब भोसले यांनी आधी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणी मग ते इंदिरा गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले. पत्रकारांनी याबाबत त्यांना विचारले होते. त्यावर ते मिश्कीलपणे म्हणाले होते, 'वेळीच शपथ घेतलेली बरी, कारण ही काँग्रेस आहे. येथे शपथ घेतल्यानंतर राज्यपालांसमोरच्या रजिस्टरमध्ये सही करण्यादरम्यानच्या वेळेत परत बोलावले जाऊ शकते,' अशा दिलखुलास स्वभावामुळे ते पत्रकारांचे आवडते बनले होते.

मुख्यमंत्री बनल्यानंतर अंतर्गत बंडाळीशीही त्यांना सामना करावा लागला होता. पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर ते बंड शमले होते. त्यांची कारकीर्द मोठी नसली तरी त्यांनी सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे अनेक निर्णय घेतले. मुलींना दहावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय त्यांच्या कार्यकाळात झाला. यासह असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक संरक्षण देणारी श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना, मच्छीमारांसाठी विमा योजना त्यांनी सुरू केली.

स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अमरावती विद्यापीठाला त्यांच्याच काळात परवानगी मिळाली. त्यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर तीन महिन्यांनी हे विद्यापीठ सुरू झाले. आता त्या विद्यापीठाचे नाव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे आहे. चंद्रपूर जिल्हानिर्मिती, उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाची स्थापना त्यांच्याच काळात झाली. पंढरपूरच्या विठ्ठलाला बडव्यांपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी पंढरपूर देवस्थान कायद्याची निर्मिती केली.

बाबासाहेब भोसले यांची चहूबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. पक्षांतर्गत विरोधक आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांसारखे मातब्बर विरोधी पक्षनेते. त्यातच दत्ता सामंत यांचा गिरणी कामगारांचा संप. अशा तगड्या आव्हानांना ते सामोरे गेले. त्यांच्या कार्यकाळात पोलिसांनी बंड केले. त्याला काही बड्या नेत्यांची फूस होती. पोलिसांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेला हा संप ४८ तास चालला.

त्यानंतर त्यांनी पोलिसांची संघटना विसर्जित केली. त्यांच्या मंत्रिमंडळात विलासराव देशमुख, रजनी सातव, श्रीकांत जिचकार असे तरुण चेहरे होते. पक्षांच्या आमदारांवर नियंत्रण ठेवणे त्यांना जमले नाही. यात ते कमी पडले. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यानंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. ६ अॅाक्टोबर २००७ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले. कुलगुरू शिवाजीराव भोसले यांचे ते बंधू होते. अनपेक्षितपणे मिळालेले मुख्यमंत्रिपद आणि कमी कार्यकाळातही घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांमुळे बाबासाहेब भोसले कायम लक्षात राहतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT