Amit Shaha In Kolkata  Sarkarnama
देश

Amit Shaha In Kolkata : अमित शाह आज ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात; लोकसभेचे रणशिंग फुंकणार...

Chetan Zadpe

West Bengal News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती आहेत. आज त्यांची बंगालमध्ये भव्य रॅली आयोजित केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये केलेला चमत्कार कायम राखण्यासाठी शाहांनी जंग पछाडलेले दिसत आहे. या पार्श्वभूमीवर बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार डॉ. सुकांत मुजुमदार यांनी बुधवारी कोलकाता येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नियोजित रॅलीसंदर्भात लोकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे म्हटले आहे. (Latest Marathi News)

आजच्या रॅलीसाठी मंगळवारी संध्याकाळपासूनच बंगालच्या विविध भागातून लोक कोलकात्यात पोहोचू लागले आहेत. मुजुमदार म्हणाले, बुधवारी भगवी लाट कोलकात्यात धडकेल. पश्चिम बंगाल आता बदलला आहे. येथील लोक आता ममता बॅनर्जी सरकारला कंटाळले आहेत आणि त्यांना भ्रष्ट सरकारपासून सुटका हवी आहे. धर्मतळा येथील मेळावा ठिकाणावरील पूर्वआढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. विशेष म्हणजे मनरेगा अंतर्गत शंभर दिवसांचं काम योजनेच्या अंमलबजावणीतील अनियमितता आणि अनागोंदीच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात येणार आहे.

पाचही राज्यांच्या निवडणुकांच्या तोफा थंडावल्यानंतर भाजपने लगेचच आज बुधवारी कोलकतामध्ये गृहमंत्री अमित शाह यांची मोठी रॅली आयोजित केली आहे. 2021 मध्ये बंगाल विधानसभा निवडणुका हरल्यानंतर भाजपने या ठिकाणी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. 2019 मध्ये भाजपने बंगालमध्ये 42 पैकी 17 लोकसभेच्या जागा जिंकत घवघवीत यश प्राप्त केलं होतं, ते टिकवून ठेवण्यासाठी शाह स्वत: बंगालच्या मैदानात उतरल्याचं चित्र आहे. या रॅलीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शाह घणाघाती टीका करण्याची शक्यता आहे.

मुजुमदार म्हणाले, बंगाल आता बदलत आहे. बंगालचे लोक बदलू लागले आहेत. आता भाजपला जनतेचा मोठा पाठिंबा मिळू लागला आहे. बंगालमधील जनता ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. त्यातून त्यांना आता सुटका हवी आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आज (बुधवारी) धर्मतला येथे पोहोचतील. तेव्हा संपूर्ण कोलकात्यात भगवी लाट तुम्हाला दिसेल. मंगळवारी सायंकाळपासूनच लोक येण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी एक लाखाहून अधिक लोक कोलकात्यात पोहोचले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

मुजुमदार म्हणाले, तृणमूलने गुंडगिरी करून भाजपच्या कार्यकर्त्याला येथे येण्यापासून रोखले किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला, तर तो कायदा सुव्यवस्था आणि न्यायालयाचा अवमान असेल. कारण न्यायालयाच्या आदेशानंतरच येथे रॅलीला परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी काहीही केले तरी आमचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत.

गृहमंत्र्यांचे वेळापत्रक -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुपारी 1.15 वाजता कोलकाता विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर तेथून हवाई दलाचे विशेष हेलिकॉप्टरने दुपारी दीडच्या सुमारास रेस कोर्स मैदानावर पोहोचतील. दुपारी 1.45 वाजता ते रस्त्याने धर्मतळाला पोहोचतील. ते दुपारी 1:45 ते 3:15 या वेळेत धर्मतळा सभेच्या ठिकाणी असतील. त्यानंतर दुपारी 3.20 वाजता अमित शाह रेसकोर्स मैदानावरून हेलिकॉप्टरने कोलकाता विमानतळाकडे रवाना होतील. दुपारी ३.४५ वाजता हवाई दलाच्या विशेष विमानाने दिल्लीला परततील.

काळे कपडे घालून आमदार आंदोलन करणार -

दरम्यान, सत्ताधारी तृणमूल काँग्रेस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोलकाता येथे आगमनाचा दिवस आणि भाजपच्या रॅलीला काळा दिवस म्हणून निषेध व्यक्त करणार आहेत. बंगालमधील सत्ताधारी पक्षाचे आमदार बुधवारी काळ्या कपड्यांमध्ये विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT