Uttarakhand Lok sabha Election
Uttarakhand Lok sabha Election Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : देवभूमीत भाजप ‘क्लीन स्वीप’ची हॅट॒ट्रिक साधणार की काँग्रेस कमबॅक करणार?

शरत प्रधान

गेली दहा वर्षे उत्तराखंडवर (Uttarakhand) भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ मधील निवडणुकांत भाजपने एकहाती पाचही जागा जिंकल्या होत्या, त्यामुळे भाजपची उत्तरखंडवर मक्तेदारी असल्याचे चित्र निर्माण झाले होते. लोकसभेसाठी उत्तराखंडमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान झाले आहे. आता भाजप (BJP) काँग्रेसला क्लीन स्वीप देण्याची हॅट्‌ट्रिक करणार का? की काँग्रेस कमबॅक करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री ही चारधाम मंदिरे आहेत, त्यामुळे धार्मिक पर्यटन क्षेत्रात भारतात उत्तराखंड सर्वांत आघाडीवर आहे. या चारधाममुळेच उत्तराखंडला ‘देवभूमी’ असेही म्हटले जाते. उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिराबाबत जो भाव आहे, तशीच अस्था उत्तराखंडमधील नागरिकांमध्येही आहे. त्यानंतरही राम मंदिरासारख्या भावनिक मुद्द्यांना बाजूला करणारे काही गंभीर मुद्दे उत्तराखंडमध्ये आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या हिमालयीन राज्यातून लष्कारात भरती होण्याचे प्रमाण मोठे असते. पण, अग्निवीर योजनेबाबत उत्तराखंडच्या तरुणांमध्ये संपूर्णपणे भ्रमनिरास झाल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच अग्निवीर योजनेमुळे यावर परिणाम होत आहे. आम्हा उत्तराखंडवासीयांसाठी सैन्यात भरती होणे, ही अभिमानाची बाब आहे. तो फौजी जेव्हा १५ वर्षांची सेवा संपवून घरी येतो, तेव्हा त्याचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जाते, असे समशेरसिंह रावत (वय ६०) यांनी सांगितले.

‘अग्निवीर’बाबत भ्रमनिरास

ते म्हणाले, लष्करातून निवृत्त होणारा जवान चांगल्या निवृत्तिवेतनासह घरी येत असतो. त्याचे लोकांना अप्रूप असते. मात्र, अग्निवीर योजनेतून निवड झालेला जवान जेव्हा चार वर्षे सेवा करून घरी परत येईल, तेव्हा त्यांच्यापुढे भाविष्याची भ्रांत असणार आहे. त्यातून त्या तरुणाला निराशा येऊ शकते. समशेरसिंह रावत हे निवृत्त सरकारी अधिकारी आहेत.

मायावतींची भाजपला मदत

भाजपसाठी उत्तराखंडमध्ये नकारात्मक वातावरण होते. मात्र, बाहेरील घटकांमुळे भाजपला मदतच झाल्याचे दिसून येते. बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी उत्तराखंडमधील पाचपैकी दोन जागांवर मुस्लिम उमेदवार दिले आहेत. त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे मायावती भाजपला कशा पद्धतीने मदत करीत आहेत, हे दिसून येते. याशिवाय उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे ध्रुवीकरणाचे राजकारण आणि मनोधैर्य खचलेल्या काँग्रेसचा प्रचार या गोष्टीही भाजपच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत. त्यामुळेच भाजपचे पाचही जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे.

गढवालमध्ये भाजपपुढे सर्वांत मोठे आव्हान

गढवाल मतदारसंघात भाजपला सर्वांत मोठे आव्हान आहे. त्या ठिकाणी भाजपचे अनिल बलुनी आणि काँग्रेसचे गणेश गोडियाला यांच्यात लढत आहे. बलुनी हे स्थानिकांसाठी फारसे परिचित नाहीत. विशेष म्हणजे बलुनी हे स्थानिक गढवाली भाषाही व्यवस्थित बोलू शकत नाहीत, त्यामुळे काँग्रेसच्या गोडियाला यांच्या बाजूने गढवाल मतदारसंघ असल्याचे दिसून येते.

नैनितालमध्ये काँग्रेस नेत्यांची भाजपशी जवळीक

दरम्यान, भाजप उमेदवारांमधील उणिवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने प्रचार करताना झाकल्या जात आहेत. नैनितालमध्येही काँग्रेसला मोठी आशा होती. मात्र, पक्षाच्या निष्ठावंतांनी भाजपशी जवळीक केल्याने काँग्रेसचे प्रकाश जोशी आणि भाजपचे अजय भट यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT