Norwayan Journalist Helle Lyng Ask question to MEA Official in Press Conference  
देश

PM Modi Norway Visit: नॉर्वे दौऱ्यात थेट PM मोदींनाच महिला पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नांमुळं तणाव! पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयानं नेमकं काय दिलं उत्तर?

PM Modi Norway Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या नॉर्वे देशाच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी द्वीपक्षीय चर्चेदरम्यान, पत्रकारांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधानांनी आपलं भाषण केलं आणि ते थेट सभागृहाबाहेर निघून गेले.

Amit Ujagare

PM Modi Norway Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या नॉर्वे देशाच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी द्वीपक्षीय चर्चेदरम्यान, पत्रकारांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधानांनी आपलं भाषण केलं आणि ते थेट सभागृहाबाहेर निघून गेले. याला कारण ठरलं ते म्हणजे नॉर्वोतील एका पत्रकार तरुणीनं त्यांना भारतातील मानवाधिकारांबाबत प्रश्न विचारले त्यानंतर या प्रश्नांकडं दुर्लक्ष करत पंतप्रधान तिथून निघून जातानाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियातून समोर आला आहे. यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं नॉर्वेमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतही त्याच पत्रकार महिलेनं परराष्ट्र मंत्रालायच्या अधिकाऱ्यांना पुन्हा तेच प्रश्न विचारले. यामुळं ही पत्रकार परिषद चांगलीच तणावपूर्ण बनली होती. यावेळी भारतीय अधिकाऱ्यांनी तिच्या प्रश्नांना उत्तरंही दिली. पण या पत्रकार महिलेचं या उत्तरनानं समाधान न झाल्यानं तिनं थेट तिथून काढता पाय घेतला. या प्रकारामुळं नॉर्वेतला मोदींचा दौरा चर्चेत राहिला.

नेमकं काय घडलं?

हेले लेंग असं या नॉर्वेअन महिला पत्रकाराचं नाव आहे. या पत्रकारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी डायसवर उभे राहून आपलं भाषण केल्यानंतर थेट प्रश्न विचारले, पण या प्रश्नांची मोदींनी दखल न घेता ते तिथून निघून गेले. त्यानंतर नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी याच महिला पत्रकारानं पुन्हा एकदा प्रश्न विचारला की, भारतातील मानवाधिकारांचे उल्लंघन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कठीण प्रश्नांना समोरं का जात नाहीत? दोन्ही देशांमध्ये जर चांगली भागिदारी होणार असली तरी आम्ही तुमच्यावर का विश्वास ठेवावा? कारण भारतातील मानवाधिकारांचे उल्लंघन, माध्यम स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचे हक्कांचे उल्लंघन थांबवण्याचं तुम्ही वचन द्याल का? या ही काही प्रश्नांचा यात समावेश होता.

परराष्ट्र मंत्रालयाची संबधित पत्रकाराला सविस्तर उत्तरं

हेले लेंग यांनी सातत्यानं अशा प्रकारे प्रश्नांची सरबत्ती केल्यानं पत्रकार परिषदेचं वातावण काही काळ तणावाचं बनलं होतं. पण त्यांच्या प्रश्नांचा परराष्ट्र खात्यानं उत्तरं दिली. पण त्यांच्या या उत्तरावरुनही आता टीका व्हायला लागली आहे. कारण थेट विचारलेल्या प्रश्नांना तितकीच थेटपणे उत्तरं देण्याऐवजी फिरुन फिरुन वेगळ्याच पद्धतीनं उत्तरं दिल्याचं यातून दिसून आलं. परराष्ट्र खात्याचे अधिकारी सिबी जॉर्ज यांनी उत्तरं देताना म्हटलं की, तुम्हाला माहितीए का? की भारतात दररोज किती बातम्या तयार होतात. आमच्याकडं पुष्कळ ब्रेकिंग न्यूज घडतात, एका दिल्लीमध्येच इंग्रजीत, हिंदी आणि इतर भाषांमधले एकूण २०० टीव्ही चॅनेल आहेत. लोकांना भारताच्या स्केलची अद्याप माहिती नाही. भारतानं स्वातंत्र्यानंतर लगेचच महिलांना मतदानाचा हक्क बहाल केला. पण इतर अनेक देशांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांनंतर महिलांना असा मतदानाचा अधिकार देण्यात आला.

भारताची मतदानाद्वारे निवडली जाणारी लोकशाही प्रक्रिया हेच सर्वात ठाम उत्तरं आहे की, भारतात समानता आणि मानवी हक्कांप्रती बांधिलकी आहे. यांपेक्षा मानवी हक्कांचं मोठं उदाहरण काय असेल? की सरकार बदलण्याचा जनतेला अधिकार आहे, मतदानाचा प्रत्येकाला अधिकार आहे, हेच अद्यापही भारतात घडतंय आणि आयाच आम्हाला अभिमानही आहे. प्राचीन संस्कृती असलेला भारत एक महान देश आहे. याच भारतानं कोरोना सारख्या जागतीक संकटाच्या काळात अनेक देशांना जीवदान देणारी लस पुरवली. या कामगिरीमुळं जगातील अनेक देशांचा भारतावर विश्वास निर्माण झाला आहे. यावर हेले लेंग यांनी या अधिकाऱ्यांना म्हटलं की, माझ्या प्रश्नांच्या अनुषंगानंच तुम्ही उत्तरं द्यायला हवीत.

हेले लेंग यांच्याकडून व्हिडिओ शेअर

दरम्यान, हेले लेंग यांनी अखेर आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलं आणि त्यात म्हटलं की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत. मला त्यांच्याकडून उत्तरं येतील अशी अपेक्षाही नव्हती. कारण वर्ल्ड प्रेस फ्रिडम इंडेक्समध्ये नॉर्वेचा क्रमांक प्रथम क्रमांक आहे तर भारताचा क्रमांक हा १५७ वा आहे. पॅलेस्टिन, इमिरेट्स आणि क्युबासोबत त्यांची तुलना होऊ शकते. हे आपलं काम आहे की सत्तेला प्रश्न विचारत राहिलं पाहिजे, आम्ही त्यांना सहकार्य करत राहू.

राहुल गांधींची टीका

पण हेले लेंग यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतात विरोधकांनी सरकारविरोधात राळ उठवली. राहुल गांधी यांनी या नॉर्वेतील पत्रकार महिलेचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, जेव्हा काहीही लपवण्यासारखं नसतं तेव्हा कशाचीही भीती राहत नाही. भारताच्या प्रतिमेचं काय झालं असेल जेव्हा पंतप्रधान मोदी हे पॅनिक झाले होते आणि काही प्रश्नांची उत्तर देण्याऐवजी तिथून पळून गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT