Manoj Jarange Patil- Nitesh Rane Sarkarnama
कोकण

Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नात आता काही उरले नाही, जरागेंनी आंदोलन संपवावे; राणेंचा सल्ला

Vijaykumar Dudhale

Sindhudurg News : मनोज जरांगे-पाटील हे 24 तारखेला मुंबईला येणार नाहीत, असा समाज बांधव म्हणून त्यांच्यावर माझा विश्वास आहे. आमच्या सरकारने त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, सरसकट किंवा आईच्या नात्यातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी भविष्याचा विचार करून मोठ्या मनाने मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलन आता संपवावे, असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. (Manoj Jarange Patil should end Maratha reservation agitation now : Nitesh Rane)

सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेले आमदार नितेश राणे हे माध्यमांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी जरांगे-पाटील यांना आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात सल्ला दिला. ते म्हणाले की, आमचे सरकार मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण देणारच आहे. त्यासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे आता त्या प्रश्नात काही उरलेले नाही. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी केलेल्या मेहनतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी आता पुढे बघावं. अल्टिमेटम देण्याची वेळ आता राहिलेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. त्यांना 24 तासाचे आरक्षण हवं आहे का?. सोमवारी आरक्षण दिले आणि मंगळवारी त्याला स्टे मिळाला, असे आरक्षण सरकार तर उद्यासुद्धा देऊ शकते. आम्ही सर्वांनी टिकणारे मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या 27 टक्के आरक्षणाला कोठेही हात न लावता सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. त्यात कुठलेही दुमत नाही, असेही राणेंनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, जरांगे-पाटील यांनी आता पुढचा विचार करावा. कारण मुंबईत आंदोलन करणे, सोपे नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असतो. मुंबईत सेन्सिटिव्ह आणि सुरक्षेचे विषय असतात. या सगळ्यांचा विचार करून त्यांनी स्वतःच्या मनाला विचारून निर्णय घ्यावा. इकडे तिकडे बघून त्यांनी निर्णय घेऊ नये, असे मी त्यांना समाज बांधव म्हणून सुचवेन.

गिरीश महाजन हे आमचे वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांचे अनुभवाचे बोल जरांगे-पाटील यांनी ऐकावेत आणि पुढे जावे. आरक्षणासंदर्भात आम्ही सरकार म्हणून सकारात्मक आहोत. आता चर्चेला वाव राहिलेला नाही. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी शिंदे समिती महाराष्ट्राचा दौरा करत आहे. त्यासाठी वेळ लागतो. आम्हाला टाईमपास करायला वेळ नको आहे. मात्र टिकणारे आरक्षण द्यायचे आहे, असेही नितेश राणे यांनी सांगितले.

जरांगे-पाटील यांनी आता बस करावे. तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. आम्ही सर्वजण सकारात्मक आहोत. जरांगे यांनी योग्य निर्णय घेऊन जल्लोष करण्याचा वेळ आलेला आहे, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT