Nisthavant Shiv sampark Abhiyan News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : हनुमानासारखी निष्ठा उद्धव ठाकरेंवर ठेवा, सगळ्या निवडणुकीत भगवा फडकवू!

A call for unwavering loyalty to Uddhav Thackeray with the pledge to hoist the saffron flag in every election : सातत्याने शिवसेनेचा येथे दबदबा राहिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून आणू.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छत्रपती संभाजीनगर शहरावर विशेष प्रेम होते. त्यांचे विचार आणि कट्टर हिंदुत्वावर शहर आणि जिल्ह्यातील जनतेने कायम प्रेम केले. बाळासाहेबांच्या सभांनीच या शहराला आतापर्यंत 14 महापौर दिले आहेत. हनुमानाची जशी श्रीरामांवर निष्ठा होती, तशीच प्रत्येक शिवसैनिकाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ठेवावी, मग येणार्‍या सगळ्या निवडणुकांमध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास निष्ठावंत शिवसंपर्क मोहिमेच्या प्रशिक्षण शिबिरात व्यक्त करण्यात आला.

शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या पुढाकारातून आज शहरात निष्ठावंत शिवसंपर्क अभियानासाठी प्रशिक्षण शिबीर पार पडले. शिवसेनेचे नेते अनिल देसाई, रविंद्र मिर्लेकर महिला आघाडीच्या ज्योती ठाकरे, चंद्रकांत खैरे आदी नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. विविध विषयांवर मार्गदर्शन करताना नेत्यांनी गद्दारी करणाऱ्या एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार, मंत्र्‍यांवरही टीका केली.

शिबीराच्या सुरवातीला युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल डमाळे पाटील यांनी 'युवा वायुगतीने धावणार' या विषयावर मनोगत व्यक्त केले. (Shivsena) महाराष्ट्राच्या तरुणाला शासन व्यसनाधीनतेमध्ये अडकवत असताना ते वायुगतीने धावणार कसे? असा प्रश्न उपस्थित करत जपान देश अणुबॉम्ब हल्ल्यानंतर उभा राहू शकतो तर शिवसेना पक्ष या छोट्याशा गद्दारीनंतर उभा राहू शकणार नाही का? जिद्दीने प्रत्येकाने काम केले तर आपण देखील पुन्हा फिनिक्स भरारी घेऊ शकतो, युवासेना यात आघाडीवर असेल, असा विश्वास विश्वास डमाळे यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावातानंतर मराठवाड्यात शिवसेना वाढली. बाळासाहेबांच्या सभांनी संभाजीनगर महापालिकेला आतापर्यंत 14 महापौर दिले आहेत. सातत्याने शिवसेनेचा येथे दबदबा राहिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून आणू असा विश्वास महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी आपल्या भाषणात केला. तर 'जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक' या विषयावर भूमिका मांडतांना जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी गद्दार गटाच्या हातात सत्ता गेल्यामुळे शिवसैनिकांचे खच्चीकरण होणे साहजिक आहे. मात्र सातत्य आणि प्रमाणिक हेतू ठेवला तर आपला पक्ष चांगल्या पद्धतीने निवडणूक जिंकू शकतो, असा दावा त्यांनी व्यक्त केला.

कौरव-पांडवांची लढाई

शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी शिंदे गटाविरोधातील आपली लढाई ही कौरव-पांडवांची लढाई असल्याचे म्हटले. शिंदे गट कौरवांच्या तर शिवसेना पांडवाच्या भूमिकेत आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचा संकल्प केला होता, मात्र दुप्पटीने आत्महत्या होत आहेत. देशाचे जवान शहीद होत आहेत याकडे वडले यांनी लक्ष वेधले. सैन्याप्रमाणे शिस्तीने लढाई लढल्यास युद्ध जिंकता येते, तसेच शिंदे गटाविरोधात सुद्धा आपण युद्ध जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी 'आम्ही शिवसेने सोबतच' या विषयावर भूमिका मांडली शिवसेनेवर लोकांचे प्रेम कायम आहे. हनुमान प्रमाणे आमची निष्ठा आहे. गद्दार गट हनुमान चालीसा पठण करतात मात्र त्यांच्यामध्ये निष्ठा आहे का? शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे खरी शिवसेना, असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. शिवसेना तळगालातील लोकांचे विचार करते, शिवसेनेने मराठी माणसाला मान दिला. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला व्यापक रूप दिलं. महाराष्ट्र धर्माचा विचार पुढे नेण्याचे काम आदित्य ठाकरे करत आहेत. शिवसेनेला इतिहास, वसा आणि वारसा असून शिवसेनेला उज्वल भविष्य असल्याचे त्या म्हणाल्या.

शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी 'राजकीय आव्हाने' या विषयावर आपले विचार व्यक्त केले. शिवसेनेनेसमोर आव्हाने नाही, तर संधी आहे. आमदाराच्या जाचातून शिवसेना बाहेर पडली आहे, असे सांगत त्यांनी संजय शिरसाट यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची आहे. गद्दार गट प्रभाग रचना आपल्याला पोषक करण्यासाठी योजना आखतील. प्रभाग रचनाकडे लक्ष देऊन हरकती नोंदवा, अशा सूचना त्यांनी उपस्थितांना केल्या.

भ्रष्टाचाराचे मुद्दे जनतेत मांडा..

अंबादास दानवे यांनी 'संघटन आणि पुनर्बांधणी' या विषयावर शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होण्याची शक्यता आहे. साधारणतः डिसेंबर ते जानेवारीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होतील. कोरोनानंतर गद्दारीच्या रूपाने दुसरे संकट शिवसेनेवर आले होते. निवडणूक लढविण्यासाठी आत्मविश्वास असायला हवा. संभाजीनगर महानगरपालिकेत अडीच हजार कोटींची विकासकामे शिवसेनेने केली आहेत. राज्यातील मंत्र्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे, भ्रष्टाचाराचे हे मुद्दे आपण मांडले पाहिजे, असे आवाहन दानवे यांनी शिवसैनिकाना केले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमी म्हणायचे संकटात संधी शोधायला हवी. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात गद्दारी झाली. गद्दारांचा सामना करण्यासाठी शिवसैनिकांकडे आम्ही आशेने बघत आहोत. शिवसैनिकांनी गद्दारीचा बदला घेतला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बदला घेऊन गद्दाराना गडा, असे आवाहन खासदार अनिल देसाई यांनी केले.

तर 'संभाजीनगर आणि बाळासाहेब' या विषयावर चंद्रकांत खैरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी काही काळातच गद्दार लोकांचे वाटोळे होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मनपा निवडणूक गंभीरतेनेघेतली आहे. शिवसेनाप्रमुख यांनी गद्दार गटाला मोठे केले, तरीही ते पळून गेले, अशी टीका करतानाच विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांनी जबरदस्त काम केले असून महाराष्ट्राचे रक्षण फक्त शिवसेनाच करू शकते, असे खैरे म्हणाले,

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT