छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधानसभेच्या सिल्लोड मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे मंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार हे अवघ्या 2420 मतांनी विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश बनकर यांनी सत्तार यांना कडवी झुंज देत जेरीस आणले. मात्र शेवटच्या फेरीत निकाल जाहीर झाला तेव्हा अब्दुल सत्तार यांनी निसटता विजय मिळवला. अब्दुल सत्तार यांना एक लाख 37 हजार 960 तर महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांना एक लाख 35 हजार 540 मते मिळाली.
सिल्लोड- सोयगाव मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली. इतर उमेदवारांना मात्र आपली डिपॉझिट गमवावे लागले. लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात महायुतीचे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात भूमिका घेत (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांनी खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून 'दानवे विरुद्ध सत्तार' असे वातावरण मतदारसंघात बघायला मिळाले. रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या सुरेश बनकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करायला लावून उमेदवारी मिळवून दिली.
उद्धव ठाकरे यांनी सिल्लोड च्या जाहीर सभेत सत्तार यांना पराभूत करण्यासाठी भाजपच्या नेत्यांशी चर्चा करण्याची तयारीही दर्शवली. मात्र निवडणूक मतदानाच्या दोन दिवस आधी अब्दुल सत्तार यांनी मतदार संघातील वातावरण आपल्या बाजूने फिरवल्याचा दावा केला गेला. (Shivsena) मात्र शेवटच्या फेरीपर्यंत निकाल काय लागणार? याचा अंदाज लागत नसल्याने सुरेश बनकर यांनी सत्तार यांना किती कडवी झुंज दिली हे स्पष्ट होते. फेरीनिहाय निकाल जाहीर होत असताना कधी अब्दुल सत्तार तर कधी सुरेश बनकर आघाडी पिछाडीवर होते.
दरम्यान सुरेश बनकर विजयी झाल्याच्या चर्चा मतदारसंघात पसरल्या. मात्र पोस्टल मतदान आणि शेवटच्या फेरीतील काही मतमोजणी शिल्लक असल्यामुळे हा निकाल जाहीर झालेला नव्हता. अखेरच्या फेरीची मतमोजणी आणि पोस्टल मतांचा निकाल हाती आल्यानंतर अब्दुल सत्तार यांना 2420 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून सिल्लोड- सोयगाव मतदारसंघात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात वातावरण तापले होते. सत्तार यांच्याकडून वाटप करण्यात आलेल्या साड्यांची काही गावांमध्ये होळी करण्यात आली होती.
तर सत्तार यांची हुकूमशाही, दडपशाही आणि जमिनी बळकवण्याच्या आरोपाने मतदारसंघातील प्रचार गाजला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिल्लोड मध्ये सभा घेत गद्दाराला गाडा, असे आव्हान केले. तर गावागावात सुरेश बनकर यांना निवडून आणण्याचे आवाहन करत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते फिरत होते. मतदारसंघातील एकूणच वातावरण पाहता यावेळी सत्तारांना ही निवडणूक सोपी नाही याचा अंदाज आला होता. प्रत्यक्ष मतदान त्यानंतरची मतमोजणी आणि जाहीर झालेला निकाल पाहता तो खराही ठरला.
अब्दुल सत्तार यांचा या मतदारसंघातील हा सलग चौथा विजय ठरला आहे. प्रचार सभे दरम्यान अब्दुल सत्तार यांनी केलेल्या काही वादग्रस्त विधानांचीही मोठी चर्चा झाली. जो मला मतदान करणार नाही, त्याचे नाव मला लिहून द्या. त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे मला चांगले माहित आहे, अशी जाहीर धमकी देणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर एका सभेत मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो, तर हे किडे-मकोडे माझे काय करणार? अशी भाषा सत्तार यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून केली होती.
या सगळ्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यंदा पराभूत होतील, असा दावा केला जात होता. मात्र साम, दाम, दंड, भेद अशा राजकारणासाठी ओळखला जाणाऱ्या सत्तार यांनी शेवटच्या क्षणात निकाल आपल्या बाजूने फिरवला. पुन्हा एकदा सत्तार यांना पराभूत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला. 2019 मध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सिल्लोड मध्ये सत्ताविरोधी वातावरण तयार झाले होते.
तेव्हाही सत्तार यांनी 24 हजारांची लीड घेत विजयाची हॅट्रिक केली होती. यावेळी सुरेश बनकर यांनी मात्र सत्तार यांना शेवटपर्यंत विजयासाठी झुंजायला लावले. बनकर यांच्या पराभवाने त्यांच्या समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. सत्तार यांनी सलग चौथा विजय मिळवल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आता त्यांचे राजकीय वजन अधिकच वाढणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.