Dharshiv Loksabha Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Loksabha : धाराशिव लोकसभेसाठी अजित पवारांची दादागिरी ; भाजपही अनुकूल ?

Mahayuti Seat Allocation : अदलाबदल केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते संकेत.

Jagdish Pansare

Dharshiv Loksabha : आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी अजित पवार गटाची दादागिरी चालणार असे दिसते. महायुतीतील कोणत्याही पक्षावर जागा वाटपाच्याबाबतीत अन्याय होणार नाही. पण काही लोकसभा मतदारसंघांबद्दल वेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात. अदलाबदल केली जाईल, असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

त्यानूसार मराठवाड्याती धाराशिव लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी अजित पवार आग्रही असल्याची माहिती आहे. धाराशिव मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ओमराजे निंबाळकर हे निवडून आले होते. शिवसेनेच्या बंडानंतरही ओमराजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी एकनिष्ठ राहिले. शिवाय त्यांना मतदारसंघात मोठा पाठिंबा असून ते लोकप्रियही आहेत.

महायुतीला ही जागा जिंकायची असेल तर त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिघेही या जागेसाठी आग्रही आहेत. ओमराजे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आल्यामुळे व पक्ष फुटीनंतर हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यामुळे ही जागा आम्हाला सोडावी, असा आग्रह आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे.

तर दुसरीकडे भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत ही जागा भाजपनेच लढवावी. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे, असा दावा केला आहे. तर अजित पवार यांनी धाराशीवची जागा आम्हालाच द्या, असा आग्रह महायुतीच्या राज्यातील नेत्यांकडे धरला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढलेल्या राणाजगजीतसिंह पाटील यांनी युतीच्या ओमराजे निंबाळकर यांना चांगली लढत दिली होती. शिवसेना-भाजप युती आणि मोदी लाट असतांना राणा पाटील यांनी 4 लाख सत्तर हजार मते घेतली होती. आता तर महायुतीतील तीन पक्ष एकत्र आहेत, शिवाय ओमराजे यांना पराभूत करायचे असले तर जातीची समीकरणं लक्षात घेता उमेदवाराची निवड करावी लागेल.

राष्ट्रवादीसाठी हा मतदारसंघ सोडला तर महायुतीच्या एकत्रित प्रयत्ननाने हा मतदारसंघ आपण जिंकू शकतो, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जातो आहे. अजित पवार यांची राज्यातील शिंदे गटात एन्ट्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी महत्वाची खाती आणि स्वतःकडे अर्थखाते घेतले, ते पाहता महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवारांची दादागिरी चालते हे दिसून आले आहे. भाजपचे नेतेही धाराशिवची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यास अनुकूल असल्याचे बोलले जाते.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT