Ashatai Shinde-Pratap Patil Chikhlikar
Ashatai Shinde-Pratap Patil Chikhlikar Sarkarnama
मराठवाडा

Nanded Politics : भाजप खासदाराची आमदाराच्या पत्नीने भरसभेत लाज काढली

सरकारनामा ब्यूरो

कंधार (जि. नांदेड) : नांदेडचे (Nanded) भाजप (BJP) खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांना आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) यांच्या पत्नी, शेतकरी कामगार पक्षाच्या (PWP) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे (Ashatai Shinde) यांनी भर व्यासपीठावर खडे बोल सुनावले. एका महिलेचा अपमान करून बोलणाऱ्या खासदाराला लाज वाटते का, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, आशाताई शिंदे या खासदार चिखलीकरांच्या भगिनी आहेत. राजकीय वाटा वेगळ्या असल्याने दोघांमध्ये तीव्र मतभेद आहेत. (Ashatai Shinde's criticism of BJP MP Pratap Patil Chikhlikar)

शिवजयंतीनिमित्त रविवारी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या उद्‍घाटक म्हणून कंधार-लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे उपस्थित होते.

आशाताई शिंदे यांच्यासह कंधारचे उपनगराध्यक्ष जबर बाहोदिन, भाजप शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष धनराज पाटील लुंगारे, शिवसेना तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव, बळीराम पवार, पांडू पाटील लुंगारे, नितीन कोकाटे आदी व्यासपीठावर होते.

लोहा येथे छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचा विषय तीन दिवसांपासून चर्चेचा बनला होता. खासदार व आमदार यांच्यात श्रेयवादाची जुगलबंदी सुरू होती. शिवजंयतीनिमित्त लोह्यात झालल्या कार्यक्रमात खासदार चिखलीकर यांनी आपल्या भाषणात आमदार शिंदे व त्यांच्या पत्नीविषयी टीका केली होती. त्याचे प्रतिबिंब कंधारच्या कार्यक्रमात उमटले.

आशाताई शिंदे यांनी नाव न घेता चिखलीकरांना व्यासपीठावरच खडे बोल सुनावले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना मोठा सन्मान, चांगली वागणूक दिली होती. आजचे राजकारणी लोक शिवरायांच्या पुतळा अनावरणप्रसंगी स्वतःच्या बहिणीची टिंगलटवाळी करीत होते. अशा राजकीय लोकांचा जनतेने काय आदर्श घ्यावा? स्वतःच्या बहिणीला बोलता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्या बहिणीला तुम्ही सोनिया गांधी म्हणत होता, त्याच बहिणीला तुळजाभवानी म्हणता. स्वतःच्या बहिणीला बोलणाऱ्यांची मानसिक प्रवृत्ती काय असेल? अशा शब्दांत त्यांनी कडाडून स्वतच्या भावावर म्हणजेच चिखलीकरांवर टीका केली.

बहिणीने एका खासदार भावाला सुनावलेले खडे बोल मोठा जनसमुदाय स्तब्ध होऊन ऐकत होता. दरम्यान, कार्यक्रमानंतर नांदेड जिल्ह्यात हा विषय चर्चेचा झाला आहे.

पैशाची मस्ती दाखवणाऱ्यांना बघून घेतो

आशाताई शिंदे यांच्या टीकेला खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही उत्तर दिले. ते म्हणाले की, प्रत्यक्ष शनी असे आले किती गेले किती. पैशाची मस्ती मी बघून घेतो. लोहा येथील शिवाजी महाराजांचा पुतळा मी स्वतः उभारला आहे, हे जनतेला माहीत आहे. असे पाण्याचे बुडबुडे किती येतात, किती जातात, सरकारी नोकरीतून पैशाची मस्ती दाखवणाऱ्यांना मी पाहून घेतो. कोण तुझा नवरा, तू कोण अशा शब्दांत कडाडून टीका या वेळी केली. त्यामुळे कंधारचे आमदार शिंदे व नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा वाद टोकाला गेल्याची चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT