Aimim News : औरंगाबाद शहराचे नाव आधी संभाजीनगर आणि आता छत्रपती संभाजीनगर हे अधिकृतपणे झाले आहे. परंतु महानगर पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या एमआयएम आणि त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी सरकारी कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या आपल्या पत्रांमध्ये 'औरंगाबाद' असाच उल्लेख करणे सुरू ठेवले आहे. यावरून आता स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी एमआयएमची कोंडी सुरू केली आहे.
आपापल्या भागाचा विकास करायचा असेल आणि त्यासाठी निधी हवा असेल तर मागणी पत्रावर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करावा लागेल. ज्या पत्रावर हा उल्लेख नसेल त्या नगरसेवकांना निधी दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मकरिये यांनी दिला आहे. मकरिये यांच्या या भूमिकेनंतर एमआयएम अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिकेत बहुमतासह सत्ता काबीज केल्यानंतर भाजपाकडून सगळी सूत्रं हाती घेतली जात आहेत. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी आपल्या कामकाजाला सुरूवात केली आहे. सुरुवातीलाच शहरातील अतिक्रमणांवरून शिवसेना-एमआयएम आमने-सामने आले होते.
शहागंज भागात अतिक्रम हटाव पथकाला विरोध केल्याने एमआयएमच्या 13 नगरसेवकांवर अपत्रातेच्या कारवाईची टांगती तलवार असताना आता अनिल मकरिये यांच्या आक्रमक पावित्र्याने एमआयएमची अधिक कोंडी होणार आहे. स्थायी समितीची बैठक आज पार पडल्यानंतर सभापती मकरिये यांनी एमआयएमला विकास निधी हवा असेल तर पत्र देताना त्यावर छत्रपती संभाजीनगर उल्लेख करावा लागेल.
या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर हे अधिकृतपणे झाले आहे. या संदर्भात विरोधात गेलेल्यांच्या याचिकाही कोर्टाने निकाली काढल्या आहेत. त्यामुळे औरंगाबाद या नावाचा उल्लेख पत्रात चालणार नाही. अशा उल्लेखाच्या पत्रांचा विचार केला जाणार नाही, त्यांना विकास निधी दिला जाणार नाही, असे मकरिये यांनी बजावले.
दरम्यान, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ओबीसी मंत्री अतुल सावे यांना उद्देशून 'सुन लो अतुल सावे, ये शहर का नाम औरंगाबाद है, और हमारे लिये औरंगाबादही रहेंगा' अशा शब्दात आव्हान दिले होते. आता महापालिकेकडून निधी मिळवायचा असेल तर एमआयएमला आता आपला हा आग्रह सोडावा लागणार आहे.
कर वसुली तिथेच विकास..
महापालिकेची मालमत्ता करवसुली मोठ्या प्रमाणात थकीत आहे. याचा थेट परिणाम शहराच्या विकासावर होतो. त्यामुळे यापुढे ज्या भागातून मालमत्ता कराची वसुली होईल, त्याच भागाचा विकास केला जाईल. ज्या भागातून मालमत्ता कर भरला जाणार नाही, तिथे विकास कामे होणार नाही, असेही मकरिये यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.