

Islam Party enter in Sambhaji Nagar : दोन वर्षापूर्वी राजकारणात सक्रीय झालेल्या इस्लाम पार्टी (इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र) या पक्षाने मालेगाव शहरात प्रस्थापित एमआयएम मोठा झटका दिला. 35 नगरसेवक निवडून आणत या पक्षाने महापालिकेत जोरदार मुसंडी मारली. विधानसभा निवडणुकीत केवळ 162 मतांनी पराभूत झालेल्या माजी आमदार आसिफ शेख यांनी महापालिकेतील यशानंतर आपल्या पक्षाच्या कक्षा रुंदावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता या पक्षानं औरंगजेबच्या कबरीवर डोकं टेकवून छत्रपती संभाजीनगरमध्ये एन्ट्री केली आहे.
दहा वर्षापूर्वी हैदराबादेतून नांदेड मार्गे एमआयएम पक्षाची महाराष्ट्रात एन्ट्री झाली होती. या काळात पक्षाने मराठवाडा, मुंबई, विदर्भासह राज्यात हळूहळू हातपाय पसरायला सुरूवात केली. स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा आणि महाराष्ट्रातून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून एकमेव खासदार निवडून पाठवत एमआयएमने इतिहास रचला होता. पण आता राज्यात चांगला जम बसलेल्या एमआयएमला मालेगावमधून धक्का देत इस्लाम पार्टीनेही पक्षाच्या विस्तारासाठी छत्रपती संभाजीनगर शहराचीच निवड केली. हिंदू-मु्स्लिम या दोन समाजाभोवती या शहराचे राजकारण कायम फिरत राहिले आहे. आताही या परिस्थिती फारसा बदल झालेला नाही. याचा फायदा घेत एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे, असा आरोप करत इस्लाम पार्टी एमआयएमला नवा पर्याय म्हणून पुढे येऊ पाहत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेबाची कबर आहे. यावरून कायम वाद निर्माण होऊन राजकीय वातावरण तापवले जाते. इस्लाम पार्टीचे आसिफ शेख यांनी हे हेरले आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकतच आपल्या पक्षाच्या विस्ताराला सुरुवात केली. एमआयएमने सध्या तरी या पक्षाची दखल घेतल्याचे दिसत नाही. एमआयएमचा एकही नेता यावर भाष्य करताना दिसत नाहीये. मालेगाव शहरात 35 नगरसेवक निवडून आणत मुस्लिम महिलेला महापौरपदावर बसवल्यापासून इस्लाम पार्टीची चर्चा राज्यभरात सुरू झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख आसिफ यांनी महाराष्ट्रात संघटनेचा विस्तार करण्याची घोषणा करत आपला पहिला दौरा एमआयएम पक्षाला ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये यश मिळाले त्या शहरातच केला. रमजान महिन्याच्या दावत-ए-इफ्तार पार्टीच्या निमित्ताने शहरात दाखल झाले.
खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवल्यानंतर याची एकच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्यही केले. आमचा पक्ष सेक्युलर आहे, मालेगावात आमच्या पक्षाचे तीन हिंदू नगरसेवकही निवडून आले आहेत. मालेगाव येथून येताना नमाजाची वेळ झाली असताना औरंगजेब कबरीजवळ मशिदीत नमाज अदा केली. खुलताबाद येथे आणखी दर्गा आहे तेथेही भेट दिली. मुस्लिम धर्माच्या शिकवणीनुसार दर्गावर जावून दरुद शरीफचे वाचन केले यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. आमच्या पक्षाचा हेतू हा जनतेचे प्रश्न सोडवणे हा आहे. सर्व जाती धर्मातील लोकांसाठी आमचा पक्ष काम करणार आहे. एमआयएम मुस्लिम व भाजपा जसा हिंदू धर्मासाठीच काम करत आहे, तसे आम्ही करणार नाही, असे आसिफ शेख यांनी स्पष्ट केले.
पक्षाचा विस्तार ईदनंतर मुंबईत बैठक घेऊन सुरू करणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कार्यकारिणी तयार करण्याआधी कोअर कमिटीची घोषणा त्यांनी केली. कोअर कमिटीच्या माध्यमातून जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवले जातील. एमआयएम पक्षाला शहरातील जनतेने एकदा खासदार, आमदार व नगरसेवक निवडून दिले तरीही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. सत्ताधारी पक्ष भाजपा व शिवसेना यांनीही पाणी प्रश्न सोडवला नाही. आपण पाण्याच्या योजनेचा अभ्यास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील 2,700 कोटींच्या पाणी योजनेची किंमत भरमसाठ वाढली आहे. या योजनेतील भ्रष्टाचारामुळे साडेतीन वर्षानंतरही काम पूर्ण होऊ शकलेले नाही. ईदनंतर पाणी प्रश्नावर आपला पक्ष इथे मोठे आंदोलन उभे करणार आहे. कोअर कमिटीच्या माध्यमातून मतदार यादी पुन:निरीक्षण कार्यक्रमात मतदारांना सहकार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमआयएमने तेलंगणा राज्यातून छत्रपती संभाजीनगर व राज्यात विस्तार केला आहे. मग आम्हालाही राजकीय पक्ष म्हणून आमच्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. आमचा मुकाबला हा भाजपा व एमआयएमशी असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.