MP Kalyan Kale News Sarkarnama
मराठवाडा

Kalyan Kale News : काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, खासदार कल्याण काळेंवर पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप करत कार्यालयात घातला राडा!

Congress Politics : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही कल्याण काळे हे सत्ताधारी पक्षांना पूरक अशा भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीवरून फुलंब्री तालुक्यात तीव्र असंतोष उफाळून आला.

सरकारनामा ब्युरो

नवनाथ इधाटे

ZP Election News : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीनंतर महापालिकेत लातूर, परभणी, नांदेड वगळता काँग्रेस पक्षाची जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पिछेहाट झाली. विशेष म्हणजे जालन्यात काँग्रेसचे खासदार कल्याण काळे असताना पक्षाची सुमार कामगिरी राहिली. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही कल्याण काळे हे सत्ताधारी पक्षांना पूरक अशा भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीवरून फुलंब्री तालुक्यात तीव्र असंतोष उफाळून आला.

तिकीट वाटपात डावलल्याने नाराज झालेल्या काँग्रेस (Congress) समर्थकांनी फुलंब्री येथील खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन जोरदार राडा घातला. केवळ उमेदवारी नाकारल्याचा संतापच नव्हे, तर खासदाराने पैसे घेऊन तिकीट विकल्याचा गंभीर आरोप करत कार्यालयाच्या काचा फोडल्या. पाल जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे इच्छुक उमेदवार वरुण पाथ्रीकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.

या निर्णयाच्या निषेधार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्या कार्यालयावर धडक देत घोषणाबाजी केली. यावेळी कार्यालयातील काचांना लाथा मारून नुकसान करण्यात आले, तर पक्षाच्या निर्णयावर संताप व्यक्त करत काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी देताना आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप खासदार काळे यांच्यावर केला. दरम्यान, बाबरा गटातील बाबरा गणासाठी इच्छुक असलेले माजी सभापती कचरू मेंद, खामगाव गणाचे आजिनाथ सोनवणे यांनाही काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांनीही संतापाला वाट मोकळी करून दिली.

या वेळी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे, तालुकाध्यक्ष संतोष मेटे यांच्या वाहनासमोर काही कार्यकर्ते आडवे झाले व त्यांना उमेदवारी देताना आम्हाला का डावलले? याबाबत जाब विचारला. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संतोष मेटे तसेच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. या राड्यानंतर नाराज उमेदवार वरूण पाथ्रीकर, राजेंद्र पाथ्रीकर यांनी हस्तक्षेप करत जगन्नाथ काळे यांना त्यांच्या वाहनात बसवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र, संतप्त कार्यकर्त्यांनी तालुका व जिल्हा पातळीवरील काँग्रेसच्या नेत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, 'सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून पैसेवाल्यांना तिकीट दिले जात आहे असा आरोप केला.

या घटनेमुळे फुलंब्री तालुक्यात काँग्रेस पक्षातील अंतर्गत खदखद या निमित्ताने बाहेर आली. जिल्हा परिषद, पंचायत समिती तिकीट वाटपातील पारदर्शकतेवर या गदारोळामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐन निवडणुकीत खासदारावरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अविश्वास व्यक्त केल्यामुळे पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT