MLA Ranajagjitsinha Patil News Sarkarnama
मराठवाडा

MLA Ranajagjitsinha Patil News : धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्ग प्रकल्प तीन हजार कोटींवर, रेल्वेस्थानकही होणार तिप्पट मोठे!

The Dharashiv-Tuljapur-Solapur railway project, valued at 3000 crores, aims to enhance connectivity and infrastructure across Maharashtra. : ठाकरे सरकारच्या कालावधीत तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी तातडीने या महत्वपूर्ण रेल्वे मार्गासाठी राज्य वाट्याचा हिस्सा देण्यासाठी पावले उचलली असती तर हा प्रकल्प आतापर्यंत पूर्णही झाला असता.

Jagdish Pansare

Dharashiv News : धाराशिव रेल्वेस्थानक प्रस्तावित होते त्यापेक्षा तिप्पट मोठे होणार आहे. नवीन पर्यायी रेल्वेमार्ग (लूप लाईन) उभारला जाणार असून प्रवाशांसह रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा येथे निर्माण केल्या जाणार आहेत. रस्त्याच्या वरून आणि खालून जाणाऱ्या पुलांची संख्येतही वाढ करण्यात आली आहे. सोलापुर शहरातील जागा संपादन करताना तिथले प्रचलित दर गृहीत धरले आहेत. तसेच वाढलेल्या कामांसाठी लागणारे वाढीव भूसंपादन या सर्व बाबींचा विचार करत भूसंपादनासाठी तब्बल 1 हजार कोटी रुपयांचा आराखडा अंतिम करण्यात आल्याची माहिती तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली.

ठाकरे सरकारने राज्य हिस्स्याचा पन्नास टक्के वाटा न दिल्याने रेल्वेमार्गाचे काम अडीच वर्ष रखडले. त्यामुळे प्रकल्प किंमतीत 117.49% म्हणजेच रु.1063.23 कोटींनी वाढल्याची टीकाही पाटील यांनी केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 900 कोटी रूपयांच्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी आता 3000 कोटी रुपये लागणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव प्रकल्प किंमतीनुसार रेल्वे बोर्डाने निधीची तरतूद करावी, अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली असल्याचे (MLA Ranajagjitsinha Patil) राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणणाऱ्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाला 2019 मध्ये मंजूरी मिळाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभही झाला. (Dharashiv) 84.44 किमी अंतराच्या महत्वपूर्ण प्रकल्पाचे 2019 मध्ये भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर राज्यात ठाकरे सरकार आले त्यांनी राज्याचा हिस्सा तातडीने देणे अपेक्षित असताना एक छदामही दिला नाही. परिणामी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाचे काम पुन्हा अडीच वर्ष रखडले.

पूर्वी एकूण 84.44 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी एकूण 904 कोटी 92 लाख रुपयांची मंजूरी देण्यात आली होती. आता त्यात साधारणपणे दुपटीने वाढ झाली आहे. आपण सातत्याने विधिमंडळात हा विषय लावून धरला होता. ठाकरे सरकारच्या कालावधीत तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी तातडीने या महत्वपूर्ण रेल्वे मार्गासाठी राज्य वाट्याचा हिस्सा देण्यासाठी पावले उचलली असती आणि निर्णय घेतला असता तर कदाचित हा प्रकल्प आतापर्यंत पूर्णही झाला असता.

जून 2022 मध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आल्याने या रेल्वे मार्गाबाबत सर्व अनुषंगिक बाबींची पूर्तता तातडीने करवून घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तीर्थक्षेत्र तुळजापूरला रेल्वेच्या नकाशावर आणण्याचा जिल्हावासीयांना दिलेला शब्द लवकरच पूर्णत्वाला जाईल, असा विश्वास राणा पाटील यांनी व्यक्त केला. या नवीन रेल्वे मार्गामुळे प्रवासी संख्या निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे पायाभूत सोयी सुविधांची अडचण होऊ नये याकडे आपण लक्ष वेधले होते. त्यानुसार धाराशिवचे रेल्वेस्थानक आता अधिक सुसज्ज आणि अद्ययावत होणार आहे.

मुख्य रेल्वेस्थानकाची इमारत 4000 चौरस मीटरवरून तब्बल 12630 चौरस मीटर होणार आहे. एकंदरीत मुख्य रेल्वेस्थानकाची इमारत तिप्पट मोठी होणार आहे. वेगात जाणाऱ्या जलदगती रेल्वे गाड्यांना तात्काळ मार्ग मिळावा यासाठी आवश्यक असणारी पर्याय व्यवस्थाही हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार यार्डाच्या आवश्यकतेनुसार मोठ्या लांबीची लूप लाईन अंथरली जाणार आहे. विविध रस्त्यांखालून जाणाऱ्या पुलांची संख्या यापूर्वी 20 होती त्यात वाढ करण्यात आली असून 31 रस्त्यांच्या खालून रेल्वे मार्गासाठी पूल तयार केले जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात महत्वाचा पुलाची लांबीदेखील वाढणार आहे.

385 मीटर ऐवजी आता हा पूल 399 मीटर लांबीचा असणार आहे. प्रवाशांसाठी अनेक महत्वपूर्ण सोयीसुविधांचा यात अंतर्भाव करण्यात आला आहे. पथमार्ग, दादरा, प्लॅटफॉर्म यासह जमिनीखाली आणि वर पाण्याच्या मोठ्या टाक्यांची उभारणीही केली जाणार आहे. यासाठी दुप्पट जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची संख्याही 342 वरून 373 एवढी करण्यात आली आहे. त्यासाठी सुधारित आराखड्यानुसार 3000 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे रेल्वे बोर्डाने सादर केलेल्या प्रस्तावात नमूद केले असल्याचेही राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

रेल्वेमंत्री वैष्णव यांना मुख्यमंत्र्यांचे पत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून या प्रकल्पाकडे लक्ष दिले आहे. राज्यात सत्ताबदल झाल्याबरोबर त्यांनी प्राधान्याने हा विषय अजेंड्यावर घेतला. तुळजाभवानीच्या चरणी हा रेल्वेमार्ग समर्पित करण्यासाठी तातडीने राज्याच्या वाट्याचा 50 % हिस्सा देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री महोदयांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना 20 जानेवारी रोजी पत्र लिहून सुधारित किंमतीनुसार सादर करण्यात आलेल्या आराखड्यानुसार केंद्राच्या वाट्याचा निधी लवकर देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT