Devendra fadnavis Abhimanyu Pawar Sambhaji patil Nilangekar Sarkarnama
मराठवाडा

Loksabha Election : फडणवीसांच्या दोन शिष्यांमधून विस्तवही जाईना, लातूरमध्ये भाजप 'हॅटट्रिक' करणार?

Jagdish Pansare

Latur : लातूर लोकसभा ( Latur Loksabha Election ) मतदारसंघात हॅट्रिक करण्याच्या निर्धारानं भाजप उतरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर ( Sambhaji Patil Nilangekar ) यांच्या खांद्यावर लातूर लोकसभेची जबाबदारी पुन्हा देणार का? अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. महायुतीच्या मेळाव्यापासून गायब असलेले निलंगेकर भाजपच्या 'गाव चलो अभियाना'च्या निमित्तानं पुन्हा सक्रिय झाले. यावेळी निलंगेकरांनी लोकसभेला भाजपच्या विजयाचा दावा केला आहे.

गेल्या काही काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या दोन शिष्यांमध्ये वाद आहेत. आमदार निलंगेकर आणि औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांची मन काही केल्या जुळत नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांनी विरुद्ध दिशेला असलेली टोकं जुळवल्याशिवाय भाजपला लातूरमधून हॅट्रिक गाठणं शक्य होणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीत भाजपचे वरिष्ठ नेते कुठल्याही प्रकारची नाराजी, गटबाजी, हेवे-दावे, रुसवे-फुगवे खपवून घेण्याच्या मनस्थितीत नाही. 'अब की बार, चार सौ पार'चा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ( 5 फेब्रुवारी ) संसदेतील भाषणात केला. "एकटी भाजप लोकसभेच्या 370 जागा जिंकणार," असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. अशावेळी स्थानिक पातळीवरील गटबाजी, नेत्यांमधील भांडणाला थारा दिला जाणार नाही, असं दिसतं.

त्यामुळे कितीही मतभेद असले, तरी आमदार निलंगेकर ( Sambhaji Patil Nilangekar ) आणि आमदार पवार यांना लोकसभेतील विजयासाठी इच्छा नसली तरी गळ्यात गळे घालून काम करावेच लागणार आहे. विशेष म्हणजे निलंगेकर-पवार हे दोघेही फडणवीसांचे शिष्य म्हणून ओळखले जातात. दोघेही त्यांच्या शब्द खाली पडू देत नाहीत. पण, मतदारसंघाच्या हद्दी, शासकीय कार्यालयांचे विभाजन, ढवळाढवळ या प्रकारामुळे निलंगेकर-पवार यांच्यातून सध्या विस्तवही जात नाही.

निलंगेकरांनी 'गाव चलो अभियाना'ची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा भाजपचा जिल्ह्यातील एकही मोठा नेता, आमदार तिथे हजर नव्हता. यावरून जिल्हा भाजपमध्ये 'ऑल इज नॉट वेल' हे स्पष्ट होते. लोकसभा निवडणूक जिंकायची म्हटलं तर निलंगेकरांना बाजूला सारून ते शक्य नाही, याची जाणीव राज्यातील वरिष्ठ नेतृत्वालाही आहे. त्यामुळेच महायुतीच्या मेळाव्यापासून लांब राहिलेल्या निलंगेकरांवर 'गाव चलो अभियाना'ची जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे.

यातून निलंगेकरांच्याच खांद्यावर लोकसभेची मुख्य जबाबदारी असेल असे बोलले जाते. 'गाव चलो अभियाना'च्या पत्रकार परिषदेपासून आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड व इतर नेते लांब राहिले. तर, दुसरीकडे याचाच फायदा घेत निलंगेकरांनी, "लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि आमचे सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत. ही जागा मराठवाड्यात सर्वाधिक मतांनी निवडून आणणार," असा दावा निलंगेकरांनी केला.

मागील निवडणुकीत लातूर येथील लोकसभेची जागा तब्बल 2 लाख 89 हजारांच्या मोठ्या मताधिक्याने जिंकली होती. यावेळी त्यापेक्षा अधिक मतांनी जिंकण्याचा निर्धार निलंगेकरांनी बोलून दाखवला आहे. अर्थात पक्षांतर्गत गटबाजी, स्थानिक नेत्यांमधील मतभेद मिटवून त्यांना एकत्र आणण्याचे काम राज्यातील वरिष्ठ नेत्यांना करावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT