Dnyanraj Chougule|| Pravin Swami Sarkarnama
मराठवाडा

Omerga Water Issue : उमरगा शहरात पाणी पेटले! भूमिपूजनावरून आजी, माजी आमदारात शितयुद्ध

Omerga Water Project Political Controversy : उमरगा शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजना महायुतीच्या काळात मंजूर होऊन शुभारंभही झाला. त्यानंतर कामेही सुरु झाले. आता नवनिर्वाचित आमदार स्वामी यांनी याच योजनेचे पुन्हा भूमिपूजन करून नवीन चर्चेला जणू संधी दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

अविनाश काळे

Dharashiv News : विधानसभा निवडणुका नुकत्याच संपल्या. उमरगा-लोहारा विधानसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारात चुरशीची लढत झाली. शिवसेनेचे तीनवेळा आमदार राहिलेल्या ज्ञानराज चौगुले यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रविण स्वामी यांनी पराभव केला. विकास कामांच्या मुद्द्याला बगल देत, भावनिक मुद्द्यावर मतदारसंघात बदल झाला. आता विकास कामांच्या श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

उमरगा शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजना महायुतीच्या काळात मंजूर होऊन शुभारंभही झाला. त्यानंतर कामेही सुरु झाले. आता नवनिर्वाचित आमदार स्वामी यांनी याच योजनेचे पुन्हा भूमिपूजन करून नवीन चर्चेला जणू संधी दिली आहे.

उमरगा शहरासाठी माकणी ( ता. लोहारा) येथील निम्न तेरणा धरणातून मंजूर असलेल्या समांतर (अमृत २) पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी आमदार प्रविण स्वामी यांच्या शहराजवळील राष्ट्रीय महामार्गालगत हस्ते झाले. यावेळी उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एम. ए. सुलतान अध्यक्षस्थानी होते. माजी नगराध्यक्ष अब्दुल रज्जाक अत्तार, काँग्रेसचे (Congress) जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, युवा नेते अजिंक्य पाटील, बाजार समितीचे सभापती रणधीर पवार, माजी सभापती नानाराव भोसले, ॲड. दिलीप सगर आदींची उपस्थिती होती.

.. तर जल आंदोलन होईल !

उमरगा शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ निवडणुकीच्यापूर्वी घाईगडबडीत झाल्याचे ऐकिवात आहे. योजना कुणी आणली, याचा काही संबंध नाही, असे म्हणत आमदार स्वामी यांनी माजी आमदार चौगुले यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आता योजनेचे काम जलदगतीने, दर्जेदार व्हावे. शहरातील यापूर्वी झालेल्या कामे कशी झालीत, यात खोलवर जाणार नाही पण येथून होणाऱ्या कामाच्या दर्जेबाबत तडजोड करू नये. लोकांच्या मनाप्रमाणे कामे होत नसतील तर जल आंदोलन होईल. असा इशारा त्यांनी पालिका प्रशासनाला दिला.

पाणी पुरवठा योजनेचे दुसऱ्यांदा भूमिपूजन

उमरगा शहरासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत 185 कोटीची नवीन पाणी पुरवठा योजना माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली. दोन ऑक्टोबर 2024 रोजी योजनेच्या कामाचा शुभारंभ माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड (), चौगुले यांच्या हस्ते झाले होते. शहरात अंतर्गत जलवाहिनीचे 20 किलोमीटर अंतराचे तर मुख्य जलवाहिनीचेही जवळपास अडीच किलोमीटर अंतराचे काम झाले आहे. योजनेसाठी 35 कोटीचा निधीही प्राप्त झाला आहे, असे असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा भूमिपूजन करण्याची झालेली घाई आणि श्रेय घेण्याच्या केविलवाणी प्रयत्नाची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

185 कोटी खर्चाची उमरगा शहर समांतर पाणीपुरवठा योजना महायुती शासनाकडून मंजूर करून घेतली. शहरातील सर्व स्तरातील नागरिकांच्या साक्षीने त्याचे भूमीपूजन यापूर्वी झाले आहे, असे असताना नूतन आमदार महोदयांनी त्या कामाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन किंवा उद्घाटन करणे म्हणजे लोकांच लेकरू माझेच आहे, असे म्हणण्याचा आणि फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांच्या बाबतीत आयत्या बिळावर नागोबा ही म्हण तंतोतंत लागू होते. त्यांनी लागलीच तसे वागू नये, असा माझा सल्ला असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT